YouVersion Logo
Search Icon

2 थेस्सलनीकाकरांस 3

3
प्रार्थना विषयी विनंती
1आता इतर गोष्टीसंबंधाने, बंधू आणि भगिनींनो, आमच्यासाठी प्रार्थना करा यासाठी की जसा तुमच्यामध्ये झाला तसा प्रभुचा संदेश वेगाने पसरावा व त्यास सन्मान मिळावा. 2दुष्ट व वाईट माणसांकडून आमची सुटका व्हावी म्हणूनही प्रार्थना करा, कारण प्रत्येकजण प्रभुवर विश्वास करणारा असतोच असे नाही. 3परंतु प्रभू विश्वासू आहे, ते तुम्हाला सामर्थ्यवान करतील आणि त्या दुष्टापासून तुमचे रक्षण करतील, 4आणि आम्हाला प्रभुमध्ये भरवसा आहे की आम्ही आज्ञापिलेल्या गोष्टी तुम्ही करता आणि करीतच राहाल. 5प्रभू तुमची अंतःकरणे परमेश्वराच्या प्रीतिकडे आणि ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो.
आळशाविषयी इशारा
6प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा करतो की, जो प्रत्येक विश्वासणारा बंधू आळशी आणि फूट पाडणारा आणि आमच्याद्वारे जे शिक्षण मिळाले त्याप्रमाणे जीवन न जगणारा त्यापासून दूर राहा. 7कारण तुम्हा स्वतःला आमचे अनुकरण कसे करायचे हे चांगले माहीत आहे. आम्ही तुम्हामध्ये राहात असताना आळशी नव्हतो. 8आम्ही कोणाचेही अन्न विकत घेतल्याशिवाय खाल्ले नाही; याउलट, तुमच्यातील कोणावरही आम्ही ओझे होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस परिश्रम आणि कष्ट केले. 9याचा अर्थ तुमच्यापासून मदत मिळण्याचा अधिकार आम्हाला नाही असे नाही, परंतु आम्ही हे यासाठी केले की तुम्ही आमचे अनुकरण करावे म्हणून आम्ही तुम्हाला आदर्श झालो. 10आम्ही तुम्हाजवळ होतो, तेव्हाही आम्ही तुम्हाला हाच नियम दिला होता: “जो कोणी काम करू इच्छित नाही, त्याने खाऊ नये.”
11तुमच्यापैकी काहींची जीवनशैली आळशी आहे आणि काही लोक व्यत्यय आणणारे व इतरांच्या कामात लुडबुड करतात असे आम्ही ऐकतो. 12अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने विनंती नव्हे, आज्ञा करतो की त्यांनी शांत व्हावे, आणि आपल्या अन्नासाठी श्रम करावेत. 13बंधू आणि भगिनींनो, तुम्ही सत्कृत्य करीत असताना खचून जाऊ नका.
14जो कोणी या पत्रात लिहिल्याप्रमाणे आमच्या बोधाचे पालन करणार नाही त्याची विशेष दखल घ्या व त्याला लाज वाटावी म्हणून त्याच्यापासून दूर राहा. 15त्याला शत्रूप्रमाणे लेखू नका, तर तुम्ही विश्वासी बंधुला द्याल त्याप्रमाणे त्याला ताकीद द्या.
समाप्तीच्या शुभेच्छा
16आता सर्व शांतीचा प्रभू स्वतः सर्ववेळी आणि सर्वप्रकारे आपली शांती तुम्हाला देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो.
17आता मी पौल माझ्या स्वतःच्या हाताने या शुभेच्छा तुम्हाला लिहित आहे, माझ्या सर्व पत्रात हे चिन्ह आहे आणि मी अशाप्रकारे लिहित असतो.
18आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांवर असो.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in