YouVersion Logo
Search Icon

2 योहान 1

1
1मंडळीचा वडील याच्याकडून,
एक स्त्री जिची परमेश्वराकडून निवड झालेली आहे ती आणि तिची मुले यांच्यासाठी ज्यांच्यावर मी खरेपणाने प्रीती करतो आणि केवळ मीच नाही परंतु ते सर्वजण ज्यांना सत्याची ओळख झाली आहे, 2कारण जे सत्य आमच्यामध्ये राहते आणि तेच आमच्याबरोबर कायम राहील.
3परमेश्वर जो पिता आणि येशू ख्रिस्त जे पित्याचा पुत्र यांच्याकडून सत्य आणि प्रीती यामध्ये कृपा, दया आणि शांती तुम्हाबरोबर राहील.
4पित्याने आपल्याला आज्ञा केल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्यात चालतात हे ऐकून मला अतिशय आनंद झाला. 5आता, हे प्रिय स्त्री, मी तुला नवी आज्ञा लिहित नाही परंतु जी प्रारंभापासून देण्यात आली आहे. मी तुम्हास सांगतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. 6प्रीती हीच आहे की, आपण त्यांच्या आज्ञेचे पालन करीत जीवन जगतो. जसे तुम्ही सुरुवातीपासूनच ऐकले आहे, त्यांची आज्ञा आहे की तुम्ही प्रीतिपूर्ण जीवन जगावे.
7मी तुम्हाला सांगतो की, फसवणूक करणारे असे पुष्कळ जण जगामध्ये निघालेले आहेत, येशू ख्रिस्त देह धारण करून या जगात आले, याचा ते अंगीकार करीत नाहीत. अशा प्रकारची कोणीही व्यक्ती फसवणूक करणारी आणि ख्रिस्तविरोधक आहे. 8काळजी घ्या की ज्यासाठी आम्ही परिश्रम केले आहेत ते तुम्ही हरवू नये, परंतु तुम्हाला त्याचा संपूर्ण मोबदला मिळावा. 9जे कोणी सर्वांच्या पुढे जात राहतात आणि ख्रिस्ताच्या शिक्षणात राहत नाहीत त्यांच्याकडे परमेश्वर नाही; जो कोणी शिक्षणात राहतो त्यांच्याकडे पिता आणि पुत्र दोघेही आहेत. 10जर कोणी तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला असे शिक्षण देत नाही, तर त्यांना तुमच्या घरात घेऊ नका किंवा त्यांचे स्वागतही करू नका. 11तुम्ही जर त्यांचे स्वागत केले, तर तुम्ही त्यांच्या दुष्कर्मामध्ये भागीदार व्हाल.
12माझ्याकडे तुमच्यासाठी पुष्कळ काही लिहिण्यासारखे आहे, परंतु कागद आणि शाई यांचा वापर करावा असे मला वाटत नाही. त्याऐवजी तुमची भेट घ्यावी आणि समोरासमोर तुमच्याबरोबर बोलावे अशी आशा करतो म्हणजे आपला आनंद परिपूर्ण होईल.
13तुझी बहीण जिला परमेश्वराने निवडले आहे तिची मुले त्यांच्या शुभेच्छा पाठवितात.

Currently Selected:

2 योहान 1: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in