तीत 3
3
ख्रिस्तशिष्याला साजेशा वर्तनाचा पाया
1ख्रिस्ती लोकांनी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे, आज्ञाधारक असावे, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे. 2कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता शांतिप्रिय व स्नेहपूर्ण वर्तन ठेवून सर्व माणसांबरोबर सौजन्याने वागावे, ह्याचे त्यांना स्मरण दे; 3कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालविणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. 4जेव्हा आपल्याला तारणाऱ्या देवाचा चांगुलपणा व दयाळूपणा प्रकट झाला, 5तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर त्याच्या दयेनुसार त्याने आपले तारण केले, पवित्र आत्म्याद्वारे मिळालेले नव्या जन्माचे स्नान व त्याने केलेले नूतनीकरण ह्यांमधून अभिव्यक्त झाले. 6देवपित्याने हा पवित्र आत्मा आपल्या तारणाऱ्या येशू खिस्ताद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे. 7ह्यासाठी की, आपण त्याच्या कृपेने देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित करून ज्या शाश्वत जीवनाची आपण आशा धरली आहे, ती प्राप्त करून घ्यावी.
8हे वचन विश्वसनीय आहे आणि तू ह्या गोष्टींविषयी खातरीने सांगत राहावे, अशी माझी इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कृत्ये करीत राहावे कारण ही कृत्ये सर्वांकरता उचित व हितकारक आहेत 9परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्राविषयींची भांडणे, ह्यांपासून दूर राहा कारण ती अहितकारक व व्यर्थ आहेत. 10तट पाडणाऱ्या माणसाला निदान दोनदा इशारा दे आणि नंतर त्यांच्याशी संबंध ठेवू नको. 11असला माणूस विकृत आहे, हे तुला ठाऊक आहे आणि त्याची पापे त्याचा न्यायनिवाडा करतात.
12मी अर्तमला किंवा तुखिकला तुझ्याकडे पाठविल्यावर जमेल तितक्या लवकर तू माझ्याकडे निकपलिस येथे निघून ये, कारण तेथे हिवाळा घालविण्याचे मी ठरविले आहे. 13जेना वकील व अपुल्लो ह्यांना काही उणीव भासणार नाही अशा तयारीने शक्य तितक्या लवकर रवाना कर. 14आपल्या लोकांनी आपल्या निकडीच्या गरजा पुरविल्या जाव्यात म्हणून चांगली कृत्येही करण्यास शिकावे, म्हणजे ते निष्फळ ठरणार नाहीत.
15माझ्याबरोबर असलेले सर्व जण तुला शुभेच्छा कळवतात. आपल्या श्रद्धावंत स्नेह्यांना आमच्या शुभेच्छा कळव.
तुम्हां सर्वांवर देवाची कृपा असो.
Currently Selected:
तीत 3: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.