YouVersion Logo
Search Icon

रोमकरांना 13

13
अधिकाऱ्यांच्या आज्ञा पाळण्याविषयी
1प्रत्येकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे कारण देवापासून नाही असा अधिकार नाही. जे अधिकारी आहेत, ते देवाने नेमलेले आहेत. 2म्हणून जो अधिकाराला आड येतो तो देवाच्या व्यवस्थेच्या आड येतो आणि आड येणारे आपणावर दंड ओढवून घेतील. 3चांगल्या वागणुकीसाठी अधिकाऱ्यांची भीती असते असे नाही, तर गैरवागणुकीसाठी असते. तेव्हा अधिकाऱ्याची भीती नसावी अशी तुझी इच्छा असल्यास चांगले ते कर म्हणजे त्याच्याकडून तुला मान्यता मिळेल. 4तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. पण जर तू वाईट करशील तर त्याची भीती बाळग, कारण तो अधिकार व्यर्थ धारण करत नाही तर क्रोध दाखविण्याकरिता वाईट करणाऱ्यांना शिक्षा करणारा असा तो देवाचा सेवक आहे. 5शिक्षा करील म्हणून नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळेही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन राहणे अगत्याचे आहे.
6म्हणूनच तर तुम्ही करही देता कारण जेव्हा अधिकारी सेवेत तत्पर असतात, तेव्हा ते देवाची सेवा करीत असतात. 7ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या, ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या, ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या, ज्याचा आदर राखायचा त्याचा आदर राखा व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा.
बंधुप्रेम
8एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका. जो दुसऱ्यांवर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. 9व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, लोभ धरू नकोस ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, ह्या वचनात सामावलेला आहे. 10प्रीती शेजाऱ्याचे काही वाईट करत नाही म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय.
प्रभूच्या दिनाचे आगमन
11समय ओळखून हे करा कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या अधिक जवळ आले आहे. 12रात्र सरत चालली आहे, दिवस जवळ येत आहे, म्हणून आपण अंधकाराची कृत्ये टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी. 13दिवसाढवळ्या उचित ठरेल अशा शिष्टाचाराने आपण चालावे. चैनबाजी व मद्यपान, विषयविलास व कामासक्ती, कलह व मत्सर ही टाळावीत. 14परंतु तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची शस्रसामग्री धारण करा आणि देहवासना तृप्त करण्याची तरतूद करू नका.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in