रोमकरांना 10
10
इस्राएलविषयी पौलाची मनीषा
1बंधुजनहो, माझ्या इस्राएली लोकांचे तारण व्हावे ही माझी मनीषा व देवाजवळ विनंती आहे. 2मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही. 3त्यांना देवाच्या नीतिमत्त्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्त्व स्थापन करू पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्त्वाचा मार्ग त्यांनी स्वीकारला नाही; 4कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्त्व प्राप्त व्हावे म्हणून ख्रिस्ताने नियमशास्त्राची परिपूर्ती केली आहे.
नीतिमत्वाचा नवा मार्ग सर्वांसाठी
5मोशे नीतिमत्वाविषयी असे लिहितो, ‘जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्त्व आचरणात आणतो, तो त्यामुळे वाचेल.’ 6परंतु विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व म्हणते, ‘तू आपल्या मनात म्हणू नकोस की, ख्रिस्ताला खाली आणायला उर्ध्वलोकी कोण चढेल 7किंवा ख्रिस्ताला मेलेल्यांतून वर आणायला अधोलोकी कोण उतरेल?’. 8तर ते नीतिमत्व काय म्हणते? ‘देवाचा शद्ब तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे,’ आमच्या विश्वासाचा विषय असलेला तो शद्ब आम्ही जगजाहीर करीत आहोत, तो हाच, 9कारण येशू प्रभू आहे, असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले, असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील, तर तुझे तारण होईल. 10जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो, तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो, त्याचे तारण होते; 11कारण धर्मशास्त्र म्हणते, ‘त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही.’ 12यहुदी व ग्रीक ह्यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात, त्या सर्वांना पुरविण्याइतका तो संपन्न आहे. 13‘जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील, त्याचे तारण होईल.’
14मात्र ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही, त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? 15घोषणा करणाऱ्यांवाचून ते कसे ऐकतील? ‘शुभवर्तमान सांगणाऱ्याचे पाय किती सुंदर असतात!’ असा धर्मशास्त्रलेख आहे. 16तथापि शुभवर्तमान सर्वांनी स्वीकारले आहे असे नाही. यशया म्हणतो, ‘प्रभो, आम्ही ऐकलेल्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे?’ 17ह्याप्रमाणे संदेश ऐकल्याने विश्वास मिळतो व संदेश ख्रिस्ताच्या शद्बाद्वारे प्राप्त होतो.
18पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खरोखर ऐकले होते; कारण धर्मशास्त्रात म्हटले आहे:
त्यांची वाणी सर्व पृथ्वीवर
व त्यांचे शद्ब दिगंतरी पोहोचले.
19पुन्हा मी विचारतो की, इस्राएलला कळले नव्हते काय? मोशे प्रथम उत्तर देतो:
मी तथाकथित राष्ट्रायोगे
तुम्हांला ईर्ष्येस पेटवीन,
एका मूढ राष्ट्रायोगे
मी तुम्हांला चीड आणीन.
20यशया तर धिटाईने म्हणतो:
ज्यांनी माझा शोध केला नाही
त्यांना मी सापडलो,
जे माझ्याविषयी विचारत नव्हते
त्यांना मी प्रकट झालो.
21पण इस्राएलविषयी तो म्हणतो:
आज्ञा मोडणाऱ्या व विरोध करणाऱ्या लोकांचे स्वागत करण्यासाठी
मी सारा दिवस माझे हात पुढे केले आहेत.
Currently Selected:
रोमकरांना 10: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.