योहान 3
3
निकदेमबरोबर संभाषण
1निकदेम नावाचा परुशी यहुदी लोकांचा एक अधिकारी होता. 2तो एकदा रात्रीच्या वेळी येशूकडे येऊन म्हणाला, “गुरुवर्य, आपण देवाकडून आलेले गुरू आहात, हे आम्हांला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करता, ती कोणालाही देव त्याच्या बरोबर असल्याशिवाय करता येणे शक्य नाही.”
3येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुला खातरीपूर्वक सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणीही देवाचे राज्य पाहू शकत नाही.”
4निकदेम त्याला म्हणाला, “वयात आलेला मनुष्य पुन्हा कसा जन्म घेऊ शकेल? त्याला दुसऱ्यांदा मातेच्या उदरात जाणे व जन्म घेणे शक्य आहे काय?”
5येशूने उत्तर दिले, “मी तुला ठामपणे सांगतो, पाण्याने व आत्म्याने जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. 6देहापासून जन्मलेला देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेला आत्मा आहे. 7तुला नव्याने जन्मले पाहिजे, असे मी तुला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नकोस. 8वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कुठून येतो व कुठे जातो, हे तुम्हांला कळत नाही, जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे, त्याचे असेच आहे.”
9निकदेमने त्याला विचारले, “हे कसे शक्य आहे?”
10येशूने त्याला उत्तर दिले, “तुम्ही इस्राएलचे गुरू असूनही तुम्हांला हे समजत नाही काय? 11मी तुम्हांला सत्य सांगतो, जे आम्हांला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे, त्याविषयी साक्ष देतो, परंतु तुम्ही आमची साक्ष मानत नाही. 12मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हांला सांगितल्या असताना तुम्ही विश्वास धरीत नाही, मग स्वर्गातल्या गोष्टी तुम्हांला सांगितल्या तर विश्वास कसा धराल? 13स्वर्गातून उतरलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्याशिवाय कोणीही स्वर्गात चढून गेला नाही.
14जसा मोशेने अरण्यात सर्प वर उचलला होता, तसा मनुष्याचा पुत्रही वर उचलला गेला पाहिजे. 15ह्यासाठी की, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला शाश्वत जीवन मिळावे; 16कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर श्रद्धा ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला शाश्वत जीवन प्राप्त व्हावे. 17देवाने त्याच्या पुत्राला जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले.
18जो पुत्रावर श्रद्धा ठेवतो, त्याचा न्याय होत नाही, परंतु जो श्रद्धा ठेवत नाही, त्याचा न्याय होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर श्रद्धा ठेवली नाही. 19न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे, परंतु माणसांना प्रकाशापेक्षा अंधार आवडला, कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. 20जो कोणी वाईट कृत्ये करतो, तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. 21परंतु आपली कृत्ये देवाच्या आज्ञेनुसार केलेली आहेत, हे उघड व्हावे म्हणून जो सत्य आचरतो, तो प्रकाशाकडे येतो.”
योहानची येशूविषयी साक्ष
22ह्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य यहुदिया प्रांतात गेले. तेथे तो त्यांच्याबरोबर राहिला आणि तेथे त्याने लोकांना बाप्तिस्मा दिला. 23योहानही शालिमजवळचे एनोन येथे बाप्तिस्मा देत होता कारण तेथे पाणी मुबलक होते. लोक त्याच्याकडे येऊन बाप्तिस्मा घेत असत; 24कारण योहानला तोपर्यंत तुरुंगात टाकले नव्हते.
25एकदा योहानच्या शिष्यांचा एका यहुदी माणसाबरोबर शुद्धीकरणाच्या विधीविषयी वादविवाद झाला. 26ते योहानकडे येऊन म्हणाले, “गुरुवर्य, पाहा, यार्देनच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता, ज्याच्याविषयी आपण साक्ष दिली आहे, तो आता बाप्तिस्मा देतो आणि सर्व लोक त्याच्याकडे जात आहेत!”
27योहानने उत्तर दिले, “मनुष्याला स्वर्गातून दिेल्यावाचून काहीच मिळू शकत नाही. 28‘मी ख्रिस्त नाही तर त्याच्यापुढे पाठवलेला आहे’, असे मी म्हणालो होतो, ह्याविषयी तुम्ही माझे साक्षी आहात. 29वधू ज्याची आहे, तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो, तो वराचा मित्र आहे. वराची वाणी ऐकून त्याला आनंद होतो. तशाच प्रकारे माझा आनंद पूर्ण झाला आहे. 30त्याची वृद्धी व्हावी व माझी घट व्हावी, हे आवश्यक आहे.
31जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे, जो पृथ्वीपासून आहे तो पृथ्वीचा आहे व तो ऐहिक गोष्टी बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर असतो. 32जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे, त्याविषयी तो साक्ष देतो परंतु त्याची साक्ष कोणी मानत नाही. 33मात्र ज्याने त्याची साक्ष मान्य केली आहे त्याने देव सत्यवचनी आहे, ह्या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे. 34ज्याला देवाने पाठवले आहे, तो देवाची वचने बोलतो; कारण तो त्याला आत्मा मोजमाप न करता देतो. 35पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे. 36जो पुत्रावर श्रद्धा ठेवतो, त्याला शाश्वत जीवन प्राप्त झाले आहे; जो पुत्रावर श्रद्धा ठेवत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, तर देवाचा क्रोध त्याच्यावर राहील.”
Currently Selected:
योहान 3: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.