YouVersion Logo
Search Icon

इब्री 11

11
विश्वासाच्या सामर्थ्याची उदाहरणे
1विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खातरी आहे. 2विश्वासानेच आपले पूर्वज देवाच्या पसंतीस उतरले.
3विश्वासाने आपल्याला कळते की, देवाच्या शब्दाने विश्वाची निर्मिती झाली, अशी की, जे दिसते ते अदृश्य वस्तूपासून झाले. 4विश्वासाने हाबेलने काइनपेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पण केला, त्यावरून तो नीतिमान आहे, अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने त्याची दाने स्वीकारून दिली आणि तो निधन पावला असला, तरी त्याच्या विश्वासाद्वारे तो अजूनपर्यंत बोलत आहे.
5हनोखला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासामुळे लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही; कारण त्याला देवाने लोकांतरी नेले; लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की, तो देवाला प्रसन्न करीत असे; 6विश्वासावाचून परमेश्वराला प्रसन्न करणे अशक्य आहे; देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास बाळगला पाहिजे की, देव आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो पारितोषिक देणारा आहे.
7जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली व तिच्याप्रमाणे त्याने आपल्या कुटुंबाच्या बचावासाठी विश्वासाने तारू तयार केले; त्या विश्वासाद्वारे त्याने जगाला दोषी ठरविले आणि विश्वासाने प्राप्त होणाऱ्या नीतिमत्त्वाचा तो वतनदार झाला.
8अब्राहामला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते, तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने तयार झाला; आणि आपण कोठे जातो, हे ठाऊक नसताही तो निघाला. 9परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला; त्याच वचनाचे सहभागी वारस म्हणून इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर डेऱ्यात त्यांची वसती होती; 10कारण दृढ पाया असलेल्या, देवाने योजिलेल्या व बांधलेल्या नगराची अब्राहाम वाट पाहत होता.
11वयोमर्यादेपलीकडे असताही त्याला बाप होण्याची क्षमता मिळाली व सारालादेखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली, कारण त्याने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानले. 12अब्राहाम जणू काही निर्जीव झालेला असतानाही ह्या एकापासून संख्येने आकाशातल्या ताऱ्यांइतकी व समुद्रतीरावरील वाळूइतकी अगणित संतती निर्माण झाली.
13हे सर्व जण विश्वास ठेवून देवाघरी गेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, मात्र त्यांनी ती दुरून पाहिली व तिचे स्वागत केले आणि आपण पृथ्वीवर परके व निराश्रीत आहोत हे स्वीकारले. 14असे म्हणणारे स्वतःच्या देशाचा शोध करीत असल्याचे दाखवितात. 15ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते, तर त्यांना परत जाण्याची संधी होती; 16पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा बाळगत होते; ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यावयास देवाला लाज वाटत नाही; कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे.
17अब्राहामने आपली कसोटी पाहिली जात असता विश्वासाने इसहाकचे अर्पण केले; अब्राहामला वचन देण्यात आले होते तरीही तो आपल्या एकुलत्या एका पुत्राचे अर्पण करायला तयार होता; 18परमेश्वराने त्याला असे सांगितले होते, ‘इसहाकच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील’; 19तेव्हा मेलेल्यांतून उठवावयासदेखील देव समर्थ आहे, हे अब्राहामने मानले आणि लाक्षणिक अर्थाने त्या स्थितीतून तो त्याला परत मिळाला.
20इसहाकने याकोब व एसाव ह्यांना भविष्यासाठी विश्वासाने आशीर्वाद दिला.
21याकोबने मरते वेळेस योसेफच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाची आराधना केली.
22योसेफने मरतेवेळेस इस्राएलच्या संतानाच्या निर्गमनाचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या अस्थींविषयी निर्देश दिले.
23मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला तीन महिने लपवून ठेवले; कारण ते मूल गोंडस आहे, असे त्यांनी पाहिले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही.
24मोशे प्रौढ झाल्यावर त्याने स्वतःला फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले; 25पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत केले; 26ख्रिस्तासाठी विटंबना सोसणे ही इजिप्त देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती, आहे असे त्याने मानले; कारण त्याची दृष्टी भावी फलप्राप्तीवर होती.
27त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने इजिप्त देश सोडला; कारण अदृश्य देवाला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. 28त्याने वल्हांडण सण व रक्त लावणे हे विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की, इस्राएली लोकांच्या प्रथम जन्मलेल्यांचा नाश करणाऱ्याने त्यांना स्पर्श करू नये.
29तांबड्या समुद्रातून ते विश्वासाने जणू कोरड्या भूमीवरून जावे त्याप्रमाणे पार गेले; मिसरमधील लोक तसेच प्रयत्न करीत असता बुडून गेले.
30इस्राएली लोकांनी यरीहोच्या गावकुसाभोवती सात दिवस प्रदक्षिणा घातल्यावर त्यांच्या विश्वासामुळे ते नगर पडले. 31राहाब वेश्येने स्नेहभावाने व विश्‍वासाने इस्राएली हेरांचा स्वीकार केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्यांबरोबर तिचा नाश झाला नाही.
32आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफताह, दावीद, शमुवेल व संदेष्टे, ह्यांचे वर्णन करू लागलो, तर वेळ पुरणार नाही. 33त्यांनी विश्वासाद्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरणात आणले, अभिवचने मिळविली, सिंहाची तोंडे बंद केली, 34अग्नीची शक्ती नाहीशी केली; ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बल असता सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये धुळीला मिळवली.
35स्त्रियांना त्यांची मृत माणसे विश्वासामुळे पुनरुत्थान झालेली मिळाली. आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून स्वातंत्र्याचा त्याग करून हालअपेष्टा सोसल्या. 36काहींना टवाळ्या, मारहाण, बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला; 37त्यांच्यावर दगडफेक केली, त्यांना मोहपाशात टाकले, करवतीने कापले, तलवारीच्या धारेने त्यांचा वध करण्यात आला; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित व त्रासलेले असे होते; 38त्यांना जगाचे आकर्षण नव्हते. ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून निराश्रित म्हणून भटकत राहत असत.
39ह्या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही; 40कारण देवाने आपणासाठी अधिक चांगली योजना आखली होती आणि ती म्हणजे त्यांना आपणासर्वांबरोबर पूर्णत्व प्राप्त व्हावे.

Currently Selected:

इब्री 11: MACLBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in