प्रेषितांचे कार्य 9
9
शौलाचे परिवर्तन
1दरम्यानच्या काळात शौलाने प्रभूच्या शिष्यांना खुनाच्या धमक्या देणे चालूच ठेवले होते. 2त्याने उच्च याजकाकडे जाऊन त्याच्याकडून दिमिष्कमधल्या सभास्थानांसाठी अशी पत्रे मागितली की, प्रभुमार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेम येथे आणावे.
3तो दिमिष्कजवळ येऊन पोहचला, त्या वेळी त्याच्या सभोवती आकाशातून अकस्मात प्रकाश चमकला. 4तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी आकाशवाणी ऐकली की, “शौल, शौल, तू माझा छळ का करतोस?”
5तो म्हणाला, “प्रभो, तू कोण आहेस?” त्याने म्हटले, “ज्या येशूचा तू छळ करतोस, तो मी आहे, 6ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे ते तुला सांगण्यात येईल.”
7त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी, पण त्यांना कोणी दिसले नाही. 8शौल जमिनीवरून उठला, तेव्हा त्याने डोळे उघडले, परंतु त्याला काही दिसेना. त्यांनी त्याला हात धरून दिमिष्क नगरात नेले. 9तेथे तो तीन दिवस आंधळ्यासारखा होता व त्याने काही अन्नपाणी घेतले नाही.
दिमिष्क नगरात शौल
10इकडे दिमिष्क नगरात हनन्या नावाचा एक शिष्य होता, त्याला प्रभू दृष्टान्तात म्हणाला, “हनन्या!” त्याने म्हटले, “काय प्रभो?”
11प्रभू त्याला म्हणाला, “उठून सरळ नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तार्स येथील शौल नावाच्या मनुष्याचा शोध घे. पाहा, तो प्रार्थना करत आहे, 12आणि हनन्या नावाचा एक मनुष्य, आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून आपणावर हात ठेवत आहे, असे त्याने दृष्टान्तात पाहिले.”
13हनन्याने उत्तर दिले, “प्रभो, यरुशलेममधल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे, हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे 14आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बेड्या घालाव्यात असा अधिकार त्याला महायाजकांकडून मिळाला आहे.”
15परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा, परराष्ट्रीय, राजे व इस्राएलची प्रजा ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता मी त्याला निवडले आहे. 16माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागते, हे मी त्याला दाखवीन.”
17हे ऐकून हनन्या निघाला आणि त्या विशिष्ट घरी गेला. शौलाच्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला, “भाऊ शौल, तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने मला पाठवले आहे.” 18त्याच्या डोळ्यांवरून खपल्यांसारखे काही पडले व त्याला दृष्टी आली. त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. 19मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. ह्यानंतर तो दिमिष्क नगरात शिष्यांबरोबर काही दिवस राहिला. 20त्याने प्रार्थनामंदिरात येशूविषयी घोषणा करावयास त्वरित सुरुवात केली की, तो देवाचा पुत्र आहे.
21ऐकणारे सर्व विस्मित होऊन म्हणू लागले, “ह्या नावाची उपासना करणाऱ्यांची ज्याने यरुशलेममध्ये त्रेधा उडवली, तोच हा नव्हे काय आणि येशूची उपासना करणाऱ्यांना बांधून महायाजकांकडे न्यावे म्हणून हा येथे आला होता ना?”
22पण शौलाला तर अधिक सामर्थ्य प्राप्त होत गेले आणि हाच ख्रिस्त आहे, असे सिद्ध करून तो दिमिष्क नगरात राहणाऱ्या यहुदी लोकांना निरुत्तर करू लागला.
23असे बरेच दिवस गेल्यानंतर यहुदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा कट रचला. 24पण त्यांचा तो कट शौलाला समजला. यहुदी लोकांनी तर त्याला मारण्याकरिता वेशीवर रात्रंदिवस पाळत ठेवली होती. 25परंतु त्याच्या शिष्यांनी रात्रीच्या वेळी त्याला नेले व गावकूस फोडून त्याला पाटीतून खाली उतरवले.
यरुशलेममध्ये शौल
26शौल यरुशलेममध्ये आला आणि शिष्यांबरोबर मिळण्यामिसळण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु हा येशूचा शिष्य आहे असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते. 27तेव्हा बर्णबा त्याला घेऊन प्रेषितांकडे आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले, प्रभू त्याच्याबरोबर कसा बोलला आणि येशूच्या नावाने दिमिष्कमध्ये त्याने धैर्याने कसे भाषण केले, हे सर्व त्यांना सांगितले. 28त्यामुळे तो यरुशलेममध्ये प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जाऊयेऊ लागला. 29तो ग्रीक भाषिक यहुदी लोकांबरोबरही चर्चा व वादविवाद करीत असे, म्हणून ते त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करू लागले. 30बंधुजनांना हे समजल्यावर त्यांनी त्याला कैसरिया येथे नेले व पुढे तार्स येथे पाठवले.
31अशा प्रकारे सर्व यहुदिया, गालील व शोमरोन ह्या ठिकाणच्या ख्रिस्तमंडळ्यांना स्वस्थता मिळाली आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ती बळकट होत गेली आणि प्रभूविषयीच्या आदरभावनेत जगत असताना त्यांची वाढ होत गेली.
लोद व यापो या ठिकाणी पेत्राचे सेवाकार्य
32पेत्र सर्वत्र फिरत असता लोद गावात जे पवित्र जन राहत होते त्यांच्याकडेही तो गेला. 33तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला. त्याला पक्षाघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अंथरुणाला खिळलेला होता. 34त्याला पेत्राने म्हटले, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करत आहे, ऊठ व स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर.” तो तत्काळ उठला. 35त्याला पाहून लोद व शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळले.
36आणखी यापोमध्ये टबीथा (ग्रीक भाषेत दुर्कस म्हणजेच हरिणी) नावाची कोणी एक स्त्री होती. ती सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर असे. 37त्या दिवसांत ती आजारी पडून निधन पावली, तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवण्यात आले. 38लोद हे गाव यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे, असे जेव्हा शिष्यांनी ऐकले, तेव्हा त्यांनी दोघा जणांना पाठवून त्याला विनंती केली की, “आमच्याकडे यायला उशीर करू नकोस.” 39पेत्र उठून त्यांच्याबरोबर गेला. तेथे पोहचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले, त्याच्यासभोवती सर्व विधवा जमा झाल्या आणि दुर्कस त्यांच्याजवळ असता, ती जे अंगरखे व जी वस्त्रे तयार करत असे ती त्यांनी रडत रडत त्याला दाखवली. 40पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली मग शवाकडे वळून म्हटले, “टबीथा, ऊठ.” तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. 41त्याने तिला हात देऊन उठवले आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्यापुढे तिला जिवंत असे उभे केले. 42यापोमधील सर्वांना हा चमत्कार कळला आणि पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला. 43त्यानंतर यापो येथील शिमोन नावाच्या एका चर्मकाराच्या घरी पेत्र बरेच दिवस राहिला.
Currently Selected:
प्रेषितांचे कार्य 9: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.