1 थेस्सल 4
4
पवित्र वर्तनाविषयी बोध
1बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये विनंती व आवाहन करतो की, तुम्ही कसे वागून देवाला प्रसन्न करून घ्यावे हे तुम्ही आमच्याकडून ऐकून घेतले व तुम्ही खरोखर त्याप्रमाणे वागत आहात, त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी; 2कारण प्रभू येशूच्या अधिकाराने आम्ही तुम्हांला कोणते निर्देश दिले, ते तुम्हांला ठाऊक आहेत. 3देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही लैंगिक अनैतिकतेपासून स्वतःस अलिप्त ठेवावे. 4तुमच्यामधील प्रत्येकाने स्वत:च्या शरीरावर ताबा मिळवून पवित्र व सन्माननीय जीवन कसे जगावे, हे जाणून घ्यावे. 5देवाला न ओळखणाऱ्या यहुदीतरांप्रमाणे कामवासनेने तुम्ही वागू नये. 6कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूंचा गैरफायदा घेऊ नये, हे आम्ही तुम्हांला अगोदरच सांगितले होते व प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, असे तुम्हांला शपथपूर्वक बजावले होते. 7देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्र्यासाठी पाचारण केले आहे. 8म्हणून जो कोणी ह्या शिकवणीचा अव्हेर करतो, तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो.
9बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हांला लिहावे, ह्याची तुम्हांला गरज नाही, कारण एकमेकांवर कशी प्रीती करावी, हे तुम्हांला देवाने शिकविले आहे. 10अखिल मासेदोनियातील सर्व बंधुजनांवर तुम्ही प्रीती करीतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हांला आवाहन करतो की, ती उत्तरोत्तर अधिक करावी. 11आम्ही तुम्हांला पूर्वी सांगितल्याप्रमाणे शांतीने जीवन जगणे, आपापल्या व्यवसायात मग्न असणे व स्वतः मेहनत करणे, हे तुमचे ध्येय असू द्या. 12अशा प्रकारे जे बाहेरील आहेत त्यांच्या सन्मानास तुम्ही पात्र ठराल व तुमच्या गरजांसाठी तुम्हांला कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.
निधन पावलेल्या ख्रिस्तशिष्यांबद्दल सांत्वन
13बंधुजनहो, निधन पावलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशा नाही अशा इतर लोकांसारखा तुम्ही शोक करू नये. 14येशू मरण पावला व पुन्हा उठला, असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूवर श्रद्धा ठेवून जे निधन पावले आहेत, त्यांना देव त्याच्याबरोबर आणील.
15आम्ही तुम्हांला आता जे काही शिकवीत आहोत, ती प्रभूची शिकवण आहे:प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत उरलेले ते आपण निधन पावलेल्यांच्या पुढे जाणार नाही. 16आज्ञेचा ध्वनी, आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तावर श्रद्धा ठेवून जे मेलेले आहेत, ते प्रथम उठतील. 17नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे जाण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू. 18म्हणून ह्या शब्दांनी एकमेकांना प्रोत्साहन द्या.
Currently Selected:
1 थेस्सल 4: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.