1 पेत्र 5
5
देवाच्या कळपाचे पालन
1ख्रिस्तमंडळीमधील नेत्यांनो, मी तुमच्या सोबतीचा नेता असून ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षीदार व प्रकट होणाऱ्या वैभवाचा सहभागी म्हणून तुम्हांला असा बोध करतो: 2तुमच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करा, करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्यलोभाने नव्हे तर सेवावृत्तीने करा. 3तुमच्या हाती सोपविलेल्या लोकांवर सत्ता चालवणारे असे नव्हे, तर कळपापुढे आदर्श निर्माण करा. 4म्हणजे जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हांला वैभवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल.
5तसेच तरुणांनो, वडीलजनांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंध बांधा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीन लोकांवर कृपा करतो.
सर्वसामान्य बोध
6देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, म्हणजे योग्य वेळी तो तुम्हांला उच्च स्थान देईल. 7त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.
8सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा एखाद्याला गिळावे म्हणून शोधत फिरतो आहे. 9त्याच्याविरुद्ध दृढ विश्वासाने असे उभे राहा, कारण तुम्हांला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. 10आपल्या शाश्वतवैभवात तुम्ही यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो कृपावंत देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला परिपूर्ण करील व तुम्हांला स्थैर्य, शक्ती व अढळ आधार देईल. 11त्याच्या सामर्थ्याचा युगानुयुगे गौरव असो. आमेन.
12माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहून पाठवीत आहे. ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की, ही देवाची खरी कृपा आहे, हिच्यात तुम्ही दृढ राहा.
13बाबेलमधील तुमच्यासारखी निवडलेली ख्रिस्तमंडळी तसेच माझा मुलगा मार्क तुम्हांला शुभेच्छा पाठवीत आहेत. 14बंधुप्रीतीच्या चुंबनाने एकमेकांना वंदन करा. सर्व ख्रिस्ती बंधुभगिनींना शांतीचे वरदान मिळो.
Currently Selected:
1 पेत्र 5: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.