YouVersion Logo
Search Icon

1 पेत्र 2

2
1तर मग सर्व दुष्टपणा, सर्व खोटारडेपणा, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे सोडून, 2,3प्रभू कृपाळू आहे ह्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नव्याने जन्मलेल्या बालकासारखे निरश्या दुधाची इच्छा धरा.
4माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो सजीव दगड त्याच्याजवळ येत असता, 5तुम्हीही स्वतः सजीव दगडासारखे आध्यात्मिक मंदिर म्हणून रचले जात आहात, ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताद्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. 6असा धर्मशास्त्रलेख आहे:
पाहा, निवडलेली मूल्यवान अशी
कोनशिला मी सीयोनमध्ये बसवितो,
तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्याची
फजिती होणार नाही.
7म्हणून तुम्हां विश्वास ठेवणाऱ्यांना ती मूल्यवान आहे, परंतु जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना,
बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड
तोच कोनशिला झाला.
8तसेच दुसरा धर्मशास्त्रलेख म्हणतो,
हाच दगड ठेच लागण्याचा धोंडा
व अडखळण्याचा खडक झाला.
ते वचन मानीत नसल्यामुळे ठेचकाळतात. हीच त्यांच्यासाठी देवाची इच्छा होती.
9पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजेशाही याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही जाहीर करावेत. 10तुम्ही पूर्वी देवाचे लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. पूर्वी तुमच्यावर दया झाली नव्हती, आता तर दया झाली आहे.
11प्रियजनहो, जे तुम्ही ह्या जगात परके व निराश्रित आहात, त्या तुम्हांला मी विनंती करतो की, आत्म्याविरुद्ध लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. 12यहुदीतर लोकांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून त्याच्या आगमनाच्या दिवशी देवाचा गौरव करावा.
सरकारी अधिकाऱ्यांच्या अंकित राहणे
13प्रभूकरिता तुम्ही, माणसांनी स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा. राजा श्रेष्ठ, म्हणून त्याच्या अधीन राहा. 14अधिकारी, हे वाईट करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी व चांगले करण्यासाठी व चांगले करणाऱ्यांची प्रशंसा करण्यासाठी त्याने पाठविलेले आहेत, म्हणून त्यांच्याही अधीन असा. 15देवाची इच्छा अशी आहे की, तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध माणसाचे अज्ञान दूर करावे. 16दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास असे राहा. 17सर्वांना मान द्या. बंधुवर्गावर प्रीती करा. देवाचे भय धरा. राजाचा मान राखा.
सेवेचा अर्थ
18घरच्या चाकरांनो, तुम्ही पूर्ण आदरभावाने आपल्या धन्याच्या अधीन असा, जे कोणी चांगले व समंजस आहेत केवळ त्यांच्याच नव्हे, तर जे कठोर आहेत त्यांच्याही अधीन असा. 19जर कोणी अन्याय सोसताना परमेश्वराचे स्मरण ठेवून दुःख सहन करत असेल, तर देव त्याला आशीर्वाद देईल. 20चूक केल्याबद्दल मिळालेली शिक्षा तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा? पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे, हे देवाच्या दृष्टीने आशीर्वादपात्र आहे. 21ह्याचकरिता तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख भोगले. तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरिता कित्ता घालून दिला आहे. 22त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात असत्य आढळले नाही. 23त्याचा अपमान होत असता, त्याने उलट अपमान केला नाही, दुःख भोगत असता, त्याने धमकाविले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्यावर भिस्त ठेवली. 24त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही क्रुसावर वाहिली, ह्यासाठी की, आपण पाप करणे सोडून देऊन सदाचरणासाठी जगावे. त्याच्या जखमांनी तुम्ही निरोगी झाला आहात. 25तुम्ही बहकलेल्या मेंढरांसारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या आत्म्याचा मेंढपाळ व संरक्षक ह्यांच्याकडे तुम्हांला परत आणण्यात आले आहे.

Currently Selected:

1 पेत्र 2: MACLBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in