YouVersion Logo
Search Icon

1 करिंथ 5

5
भयंकर स्वरूपाच्या अनीतीचे एक उदाहरण
1मला अशी खबर मिळाली आहे की, तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की, जे परराष्ट्रीयांमध्येदेखील आढळत नाही. म्हणजे तुमच्यामधील एकाचे स्वतःच्या सावत्र आईबरोबर अनैतिक संबंध आहेत! 2तरीही तुम्ही अहंकार बाळगता! हे कर्म करणाऱ्याला आपणांतून घालवून देण्याइतका उद्वेग तुम्ही प्रकट केला नाही. 3मी शरीराने गैरहजर असलो, तरी आत्म्याने हजर आहे आणि मी तर हजर असल्याप्रमाणे निर्णय करून चुकलो आहे. 4-5तो असा की, तुम्ही एकत्र जमता तेव्हा मीसुद्धा मनाने तुमच्यात असतो. अशा प्रकारे अनीतीने वागणाऱ्याला त्याच्या देहाचा नाश व्हावा म्हणून प्रभू येशूच्या सामर्थ्याच्या बळावर सैतानाच्या स्वाधीन करावे, म्हणजे प्रभूच्या दिवशी त्याचा आत्मा तारला जावा.
6तुमचे हे बढाईखोर वर्तन बरे नव्हे. थोडेसे खमीर पिठाचा सगळा गोळा फुगविते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? 7तर पापाचे जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की, तुम्ही नवीन बेखमीर गोळ्यासारखे पूर्णपणे शुद्ध व्हावे. माझी खातरी आहे की, तुम्ही खरोखर तसेच आहात; कारण आपला ओलांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त, त्याचे अर्पण झाले आहे. 8ह्यामुळे आपण सण पाळावा तो जुन्या खमिराने म्हणजे अप्रामाणिकपणा व दुष्टपणा ह्यांच्या खमिराने नव्हे, तर प्रामाणिकपणा व सत्य ह्या बेखमीर भाकरीने तो पाळावा.
9तुम्ही अनैतिक लैंगिक वर्तन करणाऱ्यांची संगत धरू नये, असे मी माझ्या पत्रात तुम्हांला लिहिले होते. 10तथापि ह्या जगाचे अनैतिक, लोभी, लुटारू व मूर्तिपूजक ह्यांची संगत मूळीच धरू नये, असे माझे म्हणणे नाही; कारण तसे कराल तर तुम्हांला जगातून निघून जावे लागेल. 11म्हणून मी तुम्हांला जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की, बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाडखोर, मद्यपी किंवा लुटारू असला तर त्याची संगत धरू नये. त्याच्या पंक्तीसही बसू नये.
12जे बाहेर आहेत त्यांचा न्याय करण्याचा मला हक्व नाही. 13जे बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करीत नाही काय? ‘त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या’, असे धर्मशास्त्र सांगते.

Currently Selected:

1 करिंथ 5: MACLBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in