YouVersion Logo
Search Icon

तीत. 2

2
ख्रिस्तशिष्याला साजेशी वागणूक
1तू तर सुशिक्षणास शोभणार्‍या गोष्टी बोलत जा. 2त्या अशा की, वृद्ध पुरुषांनी संयमशील, गंभीर व समंजस व्हावे आणि विश्वास, प्रीती व सहनशीलता ह्यात दृढ व्हावे.
3वृद्ध स्त्रियांनी, त्याचप्रमाणे, आपल्या आचरणात पवित्रेस शोभणाऱ्या असाव्या; चुगलखोर, मद्य पिणाऱ्या नसाव्या; चांगले शिक्षण देणार्‍या असाव्या; 4आणि आपल्यातील तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या पतींवर व मुलांवर प्रेम करावे. 5आणि त्यांनी समंजस, शुद्धाचरणी, घर संभाळणार्‍या, ममताळू व पतीच्या अधीन राहणार्‍या व्हावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.
6आणि तसेच तरुण पुरुषांनी समंजस मनाचे व्हावे म्हणून, तू त्यांना बोध कर.
7तू सर्व गोष्टींत चांगल्या कामांचे उदाहरण असे स्वतःला दाखव; तुझ्या शिक्षणात निर्मळपणा, गंभीरता, 8आणि निरपवाद चांगली शिकवण दिसू दे, म्हणजे तुझ्यावर टिका करणार्‍याला तुझ्याविषयी बोलण्यास काही वाईट न मिळून तो लज्जित व्हावा.
9आणि दासांनी सर्व गोष्टींत त्यांच्या स्वामीच्या आज्ञेत रहावे, त्यांना संतोष देणारे व्हावे आणि उलट बोलू नये; 10त्यांनी चोर्‍या करू नयेत तर सर्व गोष्टींत चांगला विश्वासूपणा दाखवावा; आणि आपल्या तारक देवाच्या शिकवणीस, सर्व लोकात, त्यांनी शोभा आणावी; असा तू त्यांना बोध कर.
ख्रिस्त शिष्याला साजेसे हेतू
11कारण, सर्व लोकांस तारणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. 12ती आपल्याला असे शिकवते की, अभक्तीचा व जगीक वासनांचा त्याग करून, आपण या आताच्या युगात संयमाने, नीतिने व सुभक्तीने वागले पाहिजे. 13आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी; 14आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करावेत.
15तू या गोष्टी समजावून सांग, बोध कर आणि सर्व अधिकार पूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुझा उपहास करू नये.

Currently Selected:

तीत. 2: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in