YouVersion Logo
Search Icon

नीति. 15

15
1शांतीच्या उत्तराने राग निघून जातो,
पण कठोर शब्दामुळे राग उत्तेजित होतो.
2सुज्ञाची जिव्हा सुज्ञानाची प्रशंसा करते,
पण मूर्खाचे मुख मूर्खपणा ओतून टाकते.
3परमेश्वराचे नेत्र सर्वत्र असतात,
ते चांगले आणि वाईट पाहत असतात.
4आरोग्यदायी जीभ जीवनाचा वृक्ष आहे,
परंतु कपटी जीभ आत्म्याला चिरडणारी आहे.
5मूर्ख आपल्या वडिलांचे शिक्षण तुच्छ लेखतो,
पण जो विवेकी आहे तो चुकीतून सुधारतो.
6नीतिमानाच्या घरात मोठे खजिने आहेत,
पण दुष्टाची कमाई त्यास त्रास देते.
7ज्ञानाचे ओठ विद्येविषयीचा प्रसार करते,
पण मूर्खाचे हृदय असे नाही.
8दुष्टाच्या अर्पणाचा परमेश्वर द्वेष करतो,
पण सरळांची प्रार्थना त्याचा आनंद आहे.
9दुष्टांच्या मार्गाचा परमेश्वरास वीट आहे,
पण जे नीतीचा पाठलाग करतात त्यांच्यावर तो प्रीती करतो.
10जो कोणी मार्ग सोडतो त्याच्यासाठी कठोर शासन तयार आहे,
आणि जो कोणी सुधारणेचा तिरस्कार करतो तो मरेल.
11अधोलोक आणि विनाशस्थान परमेश्वरापुढे उघडे आहे;
तर मग मनुष्यजातीच्या वंशाची अंतःकरणे त्याच्या दृष्टीपुढे किती जास्त असली पाहिजेत?
12निंदकाला शिक्षेची चीड येते;
तो सुज्ञाकडे जात नाही.
13आनंदी हृदय मुख आनंदित करते,
पण हृदयाच्या दुःखाने आत्मा चिरडला जातो.
14बुद्धिमानाचे हृदय ज्ञान शोधते,
पण मूर्खाचे मुख मूर्खताच खाते.
15जुलूम करणाऱ्याचे सर्व दिवस दुःखकारक असतात,
पण आनंदी हृदयाला अंत नसलेली मेजवाणी आहे.
16पुष्कळ धन असून त्याबरोबर गोंधळ असण्यापेक्षा
ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे चांगले आहे.
17पोसलेल्या वासराच्या तिरस्कारयुक्त मेजवाणीपेक्षा,
जेथे प्रेम आहे तेथे भाजीभाकरी चांगली आहे.
18रागीट मनुष्य भांडण उपस्थित करतो,
पण जो रागास मंद आहे तो मनुष्य भांडण शांत करतो.
19आळशाची वाट काटेरी कुंपणासारखी आहे,
पण सरळांची वाट राजमार्ग बनते.
20शहाणा मुलगा आपल्या वडिलांना आनंदीत करतो.
पण मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो.
21बुद्धिहीन मनुष्य मूर्खपणात आनंद मानतो.
पण जो समंजस आहे तो सरळ मार्गाने जातो.
22जेथे सल्ला नसतो तेथे योजना बिघडतात,
पण पुष्कळ सल्ला देणाऱ्यांबरोबर ते यशस्वी होतात.
23मनुष्यास आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद होतो;
आणि योग्यसमयीचे शब्द किती चांगले आहे!
24सुज्ञाने खाली अधोलोकास जाऊ नये
म्हणून त्याचा जीवनमार्ग वर जातो.
25परमेश्वर गर्विष्ठांची मालमत्ता फाडून काढेल,
परंतु तो विधवेच्या मालमत्तेचे रक्षण करतो.
26परमेश्वर पाप्यांच्या विचारांचा द्वेष करतो,
पण दयेची वचने त्याच्या दुष्टीने शुद्ध आहेत.
27चोरी करणारा आपल्या कुटुंबावर संकटे आणतो,
पण जो लाचेचा तिटकारा करतो तो जगेल.
28नीतिमान उत्तर देण्याआधी विचार करतो,
पण दुष्टाचे मुख सर्व वाईट ओतून बाहेर टाकते.
29परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे,
पण तो नीतिमानांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो.
30नेत्राचा प्रकाश#प्रसन्न चेहरा अंतःकरणाला आनंद देतो,
आणि चांगली बातमी शरीराला #हाडांनानिरोगी आहे.
31जर कोणीतरी तुम्हास जीवन कसे जगावे म्हणून सुधारतो त्याकडे लक्ष द्या,
तुम्ही ज्ञानामध्ये रहाल.
32जो कोणी शिक्षण नाकारतो तो आपल्या स्वत:लाच तुच्छ लेखतो,
परंतु जो कोणी शासन ऐकून घेतो तो ज्ञान मिळवतो.
33परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण देते,
आणि आदरापूर्वी नम्रता येते.

Currently Selected:

नीति. 15: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in