गण. 11
11
परमेश्वर मांस देण्याचे आश्वासन देतो
1इस्राएल लोक आपल्या त्रासाबद्दल कुरकुर करू लागले तसे परमेश्वराने ऐकले. परमेश्वराने लोकांचे ऐकले आणि तो रागावला. परमेश्वरापासूनचा अग्नी त्यांच्यात पेटला आणि त्याने छावणीच्या हद्दीवरचे काही भाग भस्म केले. 2तेव्हा लोकांनी मोशेकडे मदतीसाठी ओरड केली. मोशेने परमेश्वरास विनंती केली तेव्हा अग्नी विझला. 3त्यामुळे त्या ठिकाणाचे नांव तबेरा असे पडले. लोकांनी त्या ठिकाणाला तसे नांव दिले कारण परमेश्वराच्या अग्नीमुळे छावणीचा भाग जळून गेला.
4जे परराष्ट्रीय इस्राएल लोकाबरोबर राहत होते, त्यांना चांगले अन्न खावेसे वाटू लागले. इस्राएल लोकांनी तक्रार व रडण्यास करण्यास सुरवात केली. “आम्हांला मांस खावयास कोण देईल? 5मिसरमध्ये आम्हास मासे फुकट खाण्यास मिळत होते. त्याचप्रमाणे तेथे आम्हास काकड्या, खरबूजे, फळभाजी, कांदे, लसूण मिळत असे त्याची आठवण आम्हास येते. 6आता आम्ही कमजोर झालो आहोत. मान्न्याशिवाय आम्ही येथे काहीच पाहत नाही!”
7हा मान्ना धण्याच्या बीसारखा होता, त्याचा रंग मोत्यासारखा होता. 8लोक तो चोहोकडे फिरून गोळा करीत. तो जात्यात दळीत किंवा उखळात कुटीत, भांड्यात शिजवीत व त्याच्या भाकरी करीत. त्याची चव ताज्या जैतून तेलात तळलेल्या पुरीसारखी लागत असे.
9जेव्हा रात्री छावणीवर दहिवर पडले म्हणजे मान्नासुध्दा पडत असे. 10सर्व लोक त्यांच्या कुटुंबात रडत असल्याचा आवाज मोशेने ऐकला. आणि प्रत्येक मनुष्य आपापल्या तंबूच्या दाराशी बसून रडत होते. परमेश्वराचा राग भयंकर भडकला आणि मोशेच्या दृष्टीने त्यांची तक्रार चूक होती.
11मोशे परमेश्वरास म्हणाला, तू आपल्या दासास इतके वाइट का वागवतोस? तू माझ्यावर प्रसन्न नाहीस का? या सर्व लोकांचा भार तू मला वाहण्यास सांगतोस. 12मी या लोकांचे गर्भधारण केले काय? मी त्यांना जन्म दिला आहे का म्हणून तू म्हणतोस की, जसा पिता आपल्या बाळाला छातीशी धरून घेऊन जातो तसे मी त्यांना न्यावे? जो देश देण्याविषयी त्यांच्या पूर्वजांना तू शपथ दिली त्यांना मी घेऊन जावे का?
13एवढ्या लोकांस पुरेल एवढे मांस देण्यासाठी मी कोठे शोधू? ते माझ्याकडे आसवे गाळून रडत आहेत, ते म्हणतात आम्हास खावयास मांस दे! 14मी एकटा या सर्वांची काळजी घेऊ शकत नाही. हे माझ्यासाठी फारच जड आहे. 15जर तू मला अशा मार्गाने वागवतोस, तुझी दया माझ्यावर असल्यास मला आता मारुन टाक आणि माझे दुःख दूर कर.
16परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्राएलाच्या वडिलांचे सत्तर मनुष्ये मजकडे आण. मंडळीचे नेते असलेल्या या लोकांस दर्शनमंडपाच्या दारापाशी आण; व तुझ्याबरोबर त्यांना उभे कर. 17मग मी खाली येऊन तेथे तुझ्याशी बोलेन. मग तुझ्यावर असलेल्या आत्म्यातून काही भाग मी त्यांनाही देईन. मग लोकांची काळजी घेण्यास ते तुला मदत करतील. ह्याप्रकारे इस्राएल लोकांची जबाबदारी केवळ तुझ्या एकट्यावर राहणार नाही.
18लोकांस सांग उद्या तुम्ही स्वत: शुद्ध राहा म्हणजे तुम्हास मांस खावयास मिळेल. परमेश्वराने तुमचे रडगाणे ऐकले आहे. आम्हास मांस खाण्यास पाहिजे! आम्ही मिसरमध्ये होतो ते बरे होते, असे तुम्ही म्हणाला ते शब्दही परमेश्वराने ऐकले आहेत. तेव्हा आता परमेश्वर तुम्हास मांस देईल आणि तुम्ही ते खाल. 19तुम्ही ते एक, किंवा दोन, किंवा पाच, किंवा दहा दिवस, वीस दिवसच नाही तर, 20परंतु तुम्ही ते पूर्ण महिनाभर तुमच्या नाकपुड्यातून निघेपर्यंत आणि तुम्हास शिसारी येईपर्यंत तुम्ही ते खाल. कारण तुम्ही जो परमेश्वर तुम्हामध्ये राहतो त्यास तुम्ही नाकारले आहे. तुम्ही त्याच्यासमोर रडला. तुम्ही म्हणाला, आम्ही मिसर देश का सोडला?
21नंतर मोशे म्हणाला, परमेश्वरा येथे सहा लाख लोक आहेत आणि तू म्हणतोस की, ह्याना पूर्ण महिनाभर पुरेल एवढे मांस मी खावयास देईन! 22आम्ही त्यांना तृप्त करावे म्हणून शेरडेमेंढरे व गुरेढोर कापावीत काय? किंवा समुद्रातील सर्व मासे त्यांच्यासाठी गोळा करून आणावे काय? 23परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझा हात तोकडा आहे काय? आता माझे शब्द खरे आहेत की नाही हे तू पाहशील.”
लोकांचे वडील संदेश सांगू लागतात
24मोशे बाहेर गेला आणि परमेश्वर जे बोलला ते लोकांस सांगितले. मग मोशेने मंडळीच्या सत्तर वडिलांना एकत्र जमविले आणि त्याने त्यांना तंबू सभोवती उभे केले. 25मग परमेश्वर ढगात उतरून आला आणि मोशेशी बोलला. मोशेवर परमेश्वराचा आत्मा होता. त्यातून काही घेऊन परमेश्वराने ते त्या सत्तर वडिलावर ठेवला. तो आत्मा आल्यावर ते संदेश सांगू लागले. परंतु त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही.
26त्यातील दोन वडील एलदाद व मेदाद छावणीच्या बाहेर गेले नाहीत. त्यांची नांवे वडीलांच्या यादीत होती. परंतु ते छावणीतच राहिले; त्यामुळे आत्मा त्यांच्यावरही आला आणि ते छावणीतच संदेश सांगू लागले. 27तेव्हा एका तरुणाने पळत जाऊन मोशेला हे सांगितले. तो म्हणाला, एलदाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत.
28तेव्हा नूनाचा मुलगा यहोशवा मोशेला म्हणाला, मोशे, माझे स्वामी तुम्ही त्यांना बंदी घाला. यहोशवा तरुण असल्यापासून मोशेचा मदतनीस होता. 29मोशेने त्यास उत्तर दिले, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने त्या सर्वांवर आपला आत्मा ठेविला असता तर किती बरे होते. 30मग मोशे व इस्राएलाच्या वडीलजनासह छावणीत परत गेला.
परमेश्वर लावे पक्षी पाठवतो
31मग परमेश्वराने समुद्रावरुन जोरदार वारा वाहावयास लाविला. त्या वाऱ्याने लावे पक्षी त्या भागात वाहून आणले. ते लावे पक्षी सर्व छावणीच्या भोंवती उडत राहिले. ते इतके होते की छावणीचे अंगण व सारा परिसर त्यांनी भरुन गेला. त्यांचा जमिनीपासून दोन हात उंचीचा थर साचला. मनुष्य एक दिवसभरात जितका दूर चालत जाईल तिथपर्यंत तो थर होता. 32लोक बाहेर पडले व त्यांनी दिवसभर व रात्रभर लावे पक्षी गोळा केले आणि त्यांनी पूर्ण दुसरा दिवसभरही ते गोळा केले. ज्याने सर्वात कमी गोळा केले पक्षी त्यांचे दहा होमर भरले. त्यांनी लावे पक्षी सर्व छावणी सभोवती पसरून ठेवले.
33ते मांस त्यांच्या दातात होते, ते चावण्याच्या आधीच परमेश्वराचा राग त्यांच्यावर भयंकर भडकला. त्यांने लोकांचा भयंकर आजाराने संहार केला. 34त्या जागेला किब्रोथ-हत्तव्वा असे नांव दिले. कारण ज्या लोकांस मांस खाण्याची अतिशय तीव्र इच्छा झाली होती त्यांना तेथे पुरण्यात आले. 35किब्रोथ-हत्तव्वापासून लोकांनी हसेरोथ गावापर्यंत प्रवास केला व तेथे त्यांनी मुक्काम केला.
Currently Selected:
गण. 11: IRVMar
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.