मत्त. 24
24
मंदीराची धूळधाण व युगाची समाप्ती याविषयीचे येशूचे भविष्य
मार्क 13:1, 2; लूक 21:5, 6
1मग येशू परमेश्वराच्या भवनातून बाहेर येऊन पुढे जात होता, त्याचे शिष्य त्याच्याकडे त्यास परमेश्वराचे भवन दाखवायला आले. 2परंतु त्याने, त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही या सर्व गोष्टी पाहता ना? आता, मी तुम्हास खरे सांगतो, येथे एक दगड दुसऱ्या दगडावर राहू दिला जाणार नाही.”
3मग तो जैतूनाच्या डोंगरावर बसला असताना, त्याचे शिष्य त्याच्याशी एकांतात येऊन म्हणाले, “आम्हास सांगा की या गोष्टी कधी होतील? आपल्या येण्याचा आणि युगाचा शेवट होण्याचा समय जवळ आला आहे हे आम्ही कोणत्या चिन्हावरून ओळखावे?” 4येशूने त्यांना उत्तर दिले, “सांभाळ कोणीही तुम्हास फसवू नये. 5कारण माझ्या नावाने पुष्कळजण येतील आणि म्हणतील, मी ख्रिस्त आहे आणि ते पुष्कळ लोकांस फसवतील.
6 सांभाळ, तुम्ही लढायांबद्दल आणि लढायांच्या अफवांबद्दल ऐकाल पण त्यामुळे तुम्ही त्यांना भिऊ नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. तरी इतक्यात शेवट जवळ येणार नाही. 7कारण, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल. अनेक ठिकाणी भूकंप व दुष्काळ येतील. 8पण या सर्व गोष्टी प्रसूतीवेदनांची सुरूवात अशा आहेत. 9ते तुम्हास छळणुकीसाठी धरून देतील आणि तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावाकरता सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. 10मग पुष्कळांना अडथळा होईल. ते एकमेकांविरुद्ध उठतील आणि एकमेकांचा द्वेष करतील. 11अनेक खोटे संदेष्टे उठतील आणि, ते पुष्कळांना फसवतील. 12सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. 13पण जो मनुष्य शेवटपर्यंत टिकून राहिल तोच तारला जाईल. 14सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगभर गाजवली जाईल आणि मग शेवट होईल.
15 तर दानीएल संदेष्ट्याने सांगितले होते, ओसाड करणारी अमंगळ गोष्ट, पवित्र जागी परमेश्वराच्या भवनामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.” (वाचकाने हे ध्यानात घ्यावे.) 16त्यावेळी यहूदीया प्रांतातील लोकांनी डोंगरावर पळून जावे. 17जो कोणी छतावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी खाली येऊ नये. 18जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी माघारी परत जाऊ नये. 19त्याकाळी गर्भवती असलेल्या किंवा अंगावर पाजीत असतील अश्या स्त्रियांना फार कठीण जाईल. 20जेव्हा या गोष्टी होतील तेव्हा थंडीचे दिवस अथवा शब्बाथ दिवस नसावा यासाठी प्रार्थना करा. 21कारण जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुन्हा कधी होणार नाही अशी मोठी संकट त्याकाळी येतील. 22आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीही मनुष्य वाचला नसता. परंतु त्याच्या निवडलेल्यांसाठी तो ते दिवस थोडे करील. 23त्यावेळी जर एखाद्याने तुम्हास म्हटले, पाहा! ख्रिस्त येथे आहे किंवा तो तेथे आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 24खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांस ते चिन्हे दाखवतील व लोकांस एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील. 25या गोष्टी होण्याअगोदरच मी तुम्हास सावध केले आहे. 26एखादा मनुष्य तुम्हास सांगेल, पाहा, ख्रिस्त अरण्यात आहे. तर तेथे जाऊ नका. किंवा जर ते म्हणाले, पाहा, तो आतल्या खोलीत आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 27मी हे म्हणतो कारण वीज जशी पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकताना सर्वांना दिसते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे देखील होईल. 28जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधाडेही जमतील.
29 सांभाळत्या दिवसातल्या छळानंतर लगेच असे घडेल; सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातील तारे गळून पडतील, आकाशातील सर्व बळे डळमळतील, आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल. 30तेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व वंश आपले ऊर बडवून घेतील. मनुष्याच्या पुत्राला आकाशांतल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवाने येताना पाहतील. 31मनुष्याचा पुत्र कर्ण्याच्या मोठ्या नादात आपले देवदूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.
जागृतीची आवश्यकता
मार्क 13:28-31; लूक 21:29-33
32 अंजिराच्या झाडापासून शिका; अंजिराच्या झाडाच्या फांद्या जेव्हा हिरव्या आणि कोवळ्या असतात आणि पाने फुटू लागतात तेव्हा उन्हाळा जवळ आला हे तुम्हास कळते. 33त्याचप्रमाणे तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा हे जाणा की, तो दरवाजाजवळ आहे. 34मी तुम्हास खरे सांगतो, या सर्व गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. 35आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत. 36पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणीही काही जाणत नाही. स्वर्गातील देवदूतही जाणत नाही किंवा स्वतः पुत्रही जाणत नाही. 37नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल. 38तेव्हा जसे महापूर येण्याअगोदर लोक खातपीत होते, लोक लग्न करीत होते, लग्न करून देत होते. नोहा तारवात जाईपर्यंत लोक या गोष्टी करीत होते. 39आणि महापूर येऊन त्यांना घेऊन गेला तोपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. 40दोघे जण शेतात एकत्र काम करत असतील तर त्यातला एकजण वर घेतला जाईल आणि दुसरा तेथेच राहील. 41दोन स्त्रिया जात्यावर दळीत असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील. 42म्हणून तुम्ही जागृत असा, कारण तुम्हास माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे, 43हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते. 44या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हास अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल.
विश्वासू दास व दुष्ट दास यांचा दृष्टांत
लूक 12:41-48
45 तर ज्याला त्याच्या धन्याने आपल्या परिवाराला, त्यांना त्याचे अन्न वेळेवर द्याव म्हणून नेमल आहे तो विश्वासू आणि विचारी दास कोण आहे? 46जो दास त्याच्या धन्याला तो येईल तेव्हा तसे करताना आढळेल तो धन्य आहे! 47मी तुम्हास खरे सांगतो की, मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या चाकराची नेमणूक करील. 48पण जर तो दुष्ट दास आपल्या मनात असे म्हणेल की, माझा धनी विलंब करीत आहे, 49तो चाकर इतर चाकरांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर जेवण करील आणि दारू पिऊन मस्त होईल. 50आणि तो चाकर तयारीत नसेल तेव्हा मालक येईल. 51मग मालक त्या चाकराचे तुकडे करील. त्या चाकराला मालक ढोंगी लोकांबरोबर राहायला पाठवील आणि त्याठिकाणी रडणे व दात खाणे चालेल.
Currently Selected:
मत्त. 24: IRVMar
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.