YouVersion Logo
Search Icon

लूक 19

19
जक्कय
1येशूने यरीहोत प्रवेश केला आणि त्यामधून जात होता. 2तेव्हा पाहा, जक्कय नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार असून खूप श्रीमंत होता.
3येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. 4तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि येशूला पाहण्यासाठी एका उंबराच्या झाडावर चढला कारण तो त्याच रस्त्याने पुढे जाणार होता. 5मग येशू त्याठिकाणी येताच दृष्टी वर करून त्यास म्हणाला, “जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.” 6तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत-स्वागत केले. 7हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, “पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे.” 8तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे धन गरिबांस देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असले तर ते चौपट परत करतो.” 9येशू त्यास म्हणाला, “आज या घराचे तारण झाले आहे कारण हा मनुष्यसुद्धा अब्राहामाचा मुलगा आहे. 10कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधण्यास आणि तारण्यास आला आहे.”
मोहरांचा दृष्टांत
मत्त. 25:14-30
11ते या गोष्टी ऐकत असता त्याने त्यास एक दाखलाही सांगितला कारण तो यरूशलेम शहराजवळ होता आणि देवाचे राज्य आताच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते. 12तो म्हणाला, “कोणीएक उमराव, आपण राज्य मिळवून परत यावे या उद्देशाने दूरदेशी गेला. 13त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा नाणी देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा.’ 14त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ‘ह्याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही.’ 15मग असे झाले कि, तो राज्य मिळवून पुन्हा परत आल्यावर ज्यांना त्याने व्यापाराकरिता पैसा दिला होता, त्यावर किती नफा झाला हे समजावे म्हणून दासांना आज्ञा देऊन त्यांना बोलावीले. 16पहिला पुढे आला आणि म्हणाला, ‘धनी तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी दहा नाणी मिळवली आहेत.’ 17तेव्हा तो त्यास म्हणाला, ‘चांगल्या दासा, छान केलेस, तू थोडक्यांविषयी विश्वासू झालास, म्हणून तू दहा नगरांवर अधिकारी होशील.’ 18मग दुसरा आला व म्हणाला, ‘धनी, तुमच्या पाच नाण्यांवर मी पाच नाणी आणखी मिळवली.’ 19आणि तो त्यास म्हणाला, ‘तू पाच नगरांवर अधिकारी असशील.’ 20मग आणखी एक दास आला आणि म्हणाला, ‘धनी, आपण दिलेले नाणे मी हातरुमालात बांधून ठेवले होते. 21आपण कठोर आहात, जे आपण ठेवले नाही, ते आपण काढता आणि जे पेरले नाही, ते कापता. म्हणून मला तुमची भीती वाटत होती,’ 22धनी त्यास म्हणाला, ‘दुष्ट दासा, तुझ्याच शब्दांनी मी तुझा न्याय करतो. तुला ठाऊक होते की मी कडक शिस्तीचा मनुष्य आहे. मी जे दिले नाही ते घेतो आणि जे पेरले नाही त्याची कापणी करतो, 23तर तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? मग जेव्हा मी परत आलो असतो तेव्हा ते मला व्याजासह मिळाले असते.’ 24त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना तो म्हणाला, ‘त्याच्यापासून ते नाणे घ्या आणि ज्याच्याजवळ दहा नाणी आहेत, त्यास द्या.’ 25ते त्यास म्हणाले, ‘धनी, त्याच्याजवळ दहा नाणी आहेत.’ 26धन्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हास सांगतो, ज्याच्याजवळ आहे, त्यास अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे काही असेल तेसुध्दा काढून घेतले जाईल. 27परंतु मी राज्य करू नये अशी इच्छा करणाऱ्यांचा माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर ठार मारा.’”
येशूचा यरूशलेम शहरात जयोत्सवाने प्रवेश
मत्त. 21:1-11; मार्क 11:1-11; योहा. 12:12-19
28येशूने या गोष्टी सांगितल्यावर तो वर यरूशलेम शहरापर्यंत गेला. 29तो वर जातांना, जेव्हा तो जैतून डोंगर म्हटलेल्या टेकडीनजीक असलेल्या बेथफगे आणि बेथानीजवळ आला तेव्हा त्याने आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठवले, 30व म्हटले, “तुमच्यासमोर असलेल्या खेड्यात जा. तुम्ही प्रवेश करताच, ज्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु तुम्हास बांधलेले आढळेल. ते सोडून येथे आणा. 31जर तुम्हास कोणी विचारले की, ‘तुम्ही ते का सोडता? तर म्हणा की, प्रभूला याची गरज आहे.’” 32ज्यांना पाठवले होते, ते गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्यास आढळले. 33ते शिंगरु सोडीत असता त्याचा मालक त्यांना म्हणाला, “तुम्ही शिंगरु का सोडता?” 34ते म्हणाले, “प्रभूला याची गरज आहे.” 35त्यांनी ते येशूकडे आणले. त्यांनी आपले झगे शिंगरावर घातले आणि येशूला त्याच्यावर बसविले. 36येशू रस्त्यावरुन जात असता लोक आपली वस्त्रे रस्त्यावर पसरीत होते. 37तो जेव्हा जैतून डोंगराच्या उतरावर आला तेव्हा सर्व शिष्यसमुदाय, त्यांनी जे चमत्कार पाहिले होते त्याबद्दल मोठ्या आनंदाने देवाची स्तुती करू लागला.
38ते म्हणाले, “प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो! स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव.” 39जमावातील काही परूशी येशूला म्हणाले, “गुरुजी, आपल्या शिष्यांना गप्प राहण्यास सांगा.” 40त्याने उत्तर दिले, “मी तुम्हास सांगतो, जर ते शांत बसतील तर हे धोंडे ओरडतील.”
यरूशलेम शहराकडे पाहून येशूने केलेला विलाप
41तो जेव्हा जवळ आला व त्याने शहर पाहिले, तेव्हा तो त्यासाठी रडला आणि म्हणाला, 42“कोणत्या गोष्टी तुला शांती देतील ते जर आज तू जाणून घेतले असते तर! परंतु आता त्या तुझ्या नजरेपासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत. 43तुझ्यावर असे दिवस येतील की, तुझे शत्रू तुझ्याभोवती कोट उभारतील. तुला वेढतील आणि सर्व बाजूंनी तुला कोंडीत पकडतील. 44ते तुला, तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवतील व दगडावर दगड राहू देणार नाही कारण तू देवाचा तुझ्याकडे येण्याचा समय तू ओळखला नाही.”
येशू परमेश्वराच्या भवनाचे शुद्धीकरण करतो
मत्त. 21:12-17; मार्क 11:15-19; योहा. 2:12-25
45येशूने परमेश्वराच्या भवनात प्रवेश केला व विक्री करीत होते त्यांना बाहेर घालवू लागला. 46आणि त्यांना म्हणाला, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, माझे घर प्रार्थनेचे घर होईल, पण तुम्ही ते लुटारुची गुहा केली आहे.”
47तो दररोज परमेश्वराच्या भवनात शिकवीत असे. मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक, लोकांचे पुढारी त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते. 48पण तसे करण्यासाठी त्यांना काही मार्ग सापडत नव्हता कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत.

Currently Selected:

लूक 19: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in