YouVersion Logo
Search Icon

उत्प. 42

42
धान्य मिळवण्यासाठी योसेफाचे भाऊ मिसर देशास येतात
1मिसरमध्ये धान्य असल्याचे याकोबाला समजले. तेव्हा याकोब आपल्या मुलांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांकडे असे का बघत बसलात?” 2“इकडे पाहा, मिसर देशात धान्य आहे असे मी ऐकले आहे. तुम्ही खाली जाऊन आपणासाठी तिकडून धान्य विकत आणा म्हणजे आपण जगू, मरणार नाही.” 3तेव्हा योसेफाचे दहा भाऊ धान्य विकत घेण्यासाठी मिसरला गेले. 4याकोबाने, योसेफाचा भाऊ बन्यामीन याला त्याच्या भावाबरोबर पाठवले नाही, कारण तो म्हणाला, “कदाचित त्यास काही अपाय होईल.” 5कनान देशात फारच तीव्र दुष्काळ पडला होता, पुष्कळ लोक धान्य विकत घ्यावयास मिसराला गेले त्या लोकात इस्राएलाचे पुत्रही होते. 6त्या वेळी योसेफ मिसरचा अधिपती होता. तो देशातल्या सर्व लोकांस धान्य विकत असे. योसेफाचे भाऊ त्याच्याकडे आले आणि त्यांनी आपली तोंडे भूमीकडे करून खाली वाकून नमन केले. 7योसेफाने आपल्या भावांना पाहिल्याबरोबर ओळखले, परंतु ते कोण आहेत हे माहीत नसल्यासारखे दाखवून तो त्यांच्याशी कठोरपणाने बोलला. त्याने त्यांना विचारले, “तुम्ही कोठून आला?” त्याच्या भावांनी उत्तर दिले, “महाराज, आम्ही कनान देशातून धान्य विकत घेण्यासाठी आलो आहो.” 8योसेफाने आपल्या भावांना ओळखले, परंतु त्यांनी त्यास ओळखले नाही. 9आणि मग योसेफाला आपल्या भावांविषयी पडलेली स्वप्ने आठवली. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही हेर आहात. तुम्ही धान्य खरेदी करण्यास नव्हे तर आमच्या देशाचा कमजोर भाग हेरण्यास आला आहात.” 10परंतु त्याचे भाऊ म्हणाले, “आमचे धनी, तसे नाही. आम्ही आपले दास अन्नधान्य विकत घ्यावयास आलो आहोत. 11आम्ही सर्व भाऊ एका पुरुषाचे पुत्र आहोत. आम्ही प्रामाणिक माणसे आहोत. आम्ही तुमचे दास हेर नाही.” 12नंतर तो त्यांना म्हणाला, “नाही, तुम्ही आमच्या देशाचा कमकुवत भाग पाहण्यास आलेले आहात.” 13ते म्हणाले, “आम्ही तुमचे दास, बारा भाऊ, कनान देशातील एकाच मनुष्याचे बारा पुत्र आहोत. पाहा, आमचा सर्वांत धाकटा भाऊ घरी बापाजवळ आहे आणि आमच्यातला एक जिवंत नाही.” 14परंतु योसेफ त्यांना म्हणाला, “मी तुम्हास म्हणालो तसेच आहे; तुम्ही हेरच आहात. 15यावरुन तुमची पारख होईल. फारोच्या जीविताची शपथ, तुमचा धाकटा भाऊ येथे आल्याशिवाय तुम्हास येथून जाता येणार नाही. 16तुमच्यातील एकाने मागे घरी जाऊन तुमच्या धाकट्या भावाला येथे घेऊन यावे, आणि तोपर्यंत तुम्ही येथे तुरुंगात रहावे. मग तुम्ही कितपत खरे बोलता हे आम्हांला कळेल. नाही तर फारोच्या जिवीताची शपथ खात्रीने तुम्ही हेर आहात.” 17मग त्याने त्या सर्वांना तीन दिवस तुरुंगात अटकेत ठेवले. 18तीन दिवसानंतर योसेफ त्यांना म्हणाला, “मी देवाला भितो, म्हणून मी सांगतो तसे करा आणि जिवंत राहा. 19तुम्ही जर खरेच प्रामाणिक असाल तर मग तुम्हातील एका भावाला येथे तुरुंगात ठेवा व बाकीचे तुम्ही तुमच्या घरच्या मनुष्यांकरिता धान्य घेऊन जा. 20मग तुमच्या धाकट्या भावाला येथे माझ्याकडे घेऊन या. यावरुन तुम्ही माझ्याशी खरे बोलता किंवा नाही याची मला खात्री पटेल आणि तुम्हास मरावे लागणार नाही.” तेव्हा त्यांनी तसे केले. 21ते एकमेकांना म्हणाले, “खरोखर आपण आपल्या भावाविषयी अपराधी आहोत. कारण आपण त्याच्या जिवाचे दुःख पाहिले तेव्हा त्याने काकुळतीने रडून आपणास विनंती केली, परंतु आपण त्याचे ऐकले नाही. त्यामुळेच आता आपणांस हे भोगावे लागत आहे.” 22मग रऊबेन त्यांना म्हणाला, “मी तुम्हास म्हणत नव्हतो का की, ‘मुलाविरूद्ध पाप करू नका,’ परंतु तुम्ही ते ऐकले नाही. आता पाहा, त्याचे रक्त तुमच्यापासून मागितले जात आहे.” 23योसेफ दुर्भाष्यामार्फत आपल्या भावांशी बोलत असल्यामुळे, योसेफाला आपल्या भाषेतील बोलणे कळत असेल असे त्यांना वाटले नाही. 24म्हणून तो त्यांच्यापासून बाजूला जाऊन रडला. थोड्या वेळाने तो परत त्यांच्याकडे आला आणि त्यांच्याशी बोलला. त्याने शिमोनाला त्यांच्यातून काढून घेतले आणि त्यांच्या नजरेसमोरच त्यास बांधले. 25मग आपल्या भावांच्या पोत्यात धान्य भरण्यास सांगितले, तसेच त्या धान्याबद्दल त्याच्या भावांनी दिलेला पैसा ज्याच्या त्याच्या पोत्यात भरण्यास सांगितले, आणि त्यांच्या परतीच्या प्रवासात वाटेत खाण्यासाठी अन्नसामग्री देण्यास सेवकांना सांगतिले. त्यांच्यासाठी तसे करण्यात आले.
योसेफाचे भाऊ कनान देशाला परत जातात
26तेव्हा त्या भावांनी ते धान्य आपापल्या गाढवावर लादले व तेथून ते माघारी जाण्यास निघाले. 27ते भाऊ रात्रीच्या मुक्कामासाठी एका ठिकाणी थांबले. तेव्हा त्यांच्यापैकी एकाने त्याच्या गाढवाला थोडेसे धान्य देण्यासाठी आपली गोणी उघडली, तेव्हा त्याने धान्यासाठी दिलेले पैसे त्यास त्या गोणीत आढळले. 28तेव्हा तो आपल्या इतर भावांना म्हणाला, “पाहा! धान्यासाठी मी दिलेले हे पैसे कोणीतरी पुन्हा माझ्या गोणीत ठेवले आहेत!” तेव्हा ते भाऊ अतिशय घाबरले, ते एकमेकांस म्हणाले, “देव आपल्याला काय करत आहे.” 29ते भाऊ कनान देशास आपला बाप याकोब याजकडे गेले आणि त्यांनी घडलेल्या सर्व गोष्टी त्यास सांगितल्या. 30ते म्हणाले, “त्या देशाचा अधिकारी आमच्याशी कठोरपणाने बोलला. आम्ही हेर आहोत असे त्यास वाटले. 31परंतु आम्ही हेर नसून प्रामाणिक माणसे आहोत असे त्यास सांगितले. 32आम्ही त्यास सांगितले की, ‘आम्ही बारा भाऊ एका मनुष्याचे पुत्र आहोत. आमच्यातला एक जिवंत नाही, आणि तसेच धाकटा भाऊ कनान देशात आज आमच्या पित्याजवळ असतो.’ 33तेव्हा त्या देशाचा अधिकारी आम्हांला म्हणाला, ‘तुम्ही प्रामाणिक लोक आहात हे पटवून देण्याचा एक मार्ग आहे. तो असा की तुम्हातील एका भावास येथे माझ्यापाशी ठेवा. तुम्ही तुमच्या कुटुंबातील मनुष्यांसाठी धान्य घेऊन जा. 34आणि नंतर तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला येथे माझ्याकडे घेऊन या. मग तुम्ही खरेच प्रामाणिक माणसे आहात हे मला पटेल. तुम्ही जर खरे बोलत असाल तर मग मी तुमचा भाऊ परत तुमच्या हवाली करीन आणि तुम्ही देशात व्यापार कराल.’” 35मग ते भाऊ आपापल्या पोत्यातून धान्य काढावयास गेले. तेव्हा प्रत्येकाच्या पोत्यात पैशाची पिशवी मिळाली. त्या पैशाच्या पिशव्या पाहून ते भाऊ व त्यांचा बाप हे अतिशय घाबरले. 36याकोब त्यांना म्हणाला, “मी माझ्या सर्व मुलांना मुकावे अशी तुमची इच्छा आहे काय? योसेफ नाही. शिमोनही गेला. आणि आता बन्यामिनालाही माझ्यापासून घेऊन जाण्याची तुमची इच्छा आहे.” 37मग रऊबेन आपल्या पित्यास म्हणाला, “मी जर बन्यामिनाला मागे आणले नाही तर माझे दोन पुत्र तुम्ही मारून टाका. माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरोखर बन्यामिनाला परत तुमच्याकडे घेऊन येईन.” 38परंतु याकोब म्हणाला, “मी बन्यामिनाला तुमच्याबरोबर पाठविणार नाही. त्याचा भाऊ मरण पावला आणि तो एकटाच राहिला आहे. ज्या वाटेने तुम्ही जाता तेथे त्यास काही अपाय झाला तर माझे पिकलेले केस अतिशय दुःखाने कबरेत पाठवाल.”

Currently Selected:

उत्प. 42: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in