YouVersion Logo
Search Icon

उत्प. 32

32
याकोब एसावाला भेटण्याची तयारी करतो
1याकोबही आपल्या मार्गाने गेला आणि त्यास देवाचे दूत भेटले. 2जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले तेव्हा तो म्हणाला, “ही देवाची छावणी आहे.” म्हणून त्याने त्या जागेचे नाव महनाईम #देवाचा तळठेवले. 3याकोबाने आपला भाऊ एसाव याच्याकडे सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपले निरोपे पाठवले. 4त्याने त्यांना आज्ञा देऊन म्हटले, “तुम्ही माझे धनी एसाव यांना सांगा, आपला सेवक याकोब असे म्हणतो की, ‘आजपर्यंत अनेक वर्षे मी लाबानाकडे राहिलो. 5माझ्यापाशी पुष्कळ गाई-गुरे, गाढवे, शेरडामेंढरांचे कळप आणि दास व दासी आहेत. आपली कृपादृष्टी माझ्यावर व्हावी म्हणून मी आपल्या धन्याला हा निरोप पाठवीत आहे.’” 6निरोपे याकोबाकडे परत आले आणि म्हणाले, “आम्ही आपला भाऊ एसाव याच्याकडे गेलो व त्यास भेटलो. तो आपणाला भेटावयास येत आहे. त्याच्या बरोबर चारशे माणसे आहेत.” 7तेव्हा याकोब घाबरला आणि अस्वस्थ झाला. त्याने आपल्या सोबत असणाऱ्या लोकांच्या दोन टोळ्या केल्या, तसेच शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि उंट व गाढवे यांच्याही त्याने दोन टोळ्या केल्या. 8तो म्हणाला, “जर एसावाने एका टोळीवर हल्ला करून मार दिला तर दुसरी टोळी निसटून जाईल व वाचेल.” 9याकोब म्हणाला, “माझा बाप अब्राहाम याच्या देवा, आणि माझा बाप इसहाक याच्या देवा, परमेश्वर देवा, तू मला माझ्या देशात व माझ्या कुटुंबात परत येण्यास सांगितलेस. तसेच तू माझी भरभराट केलीस, 10तू माझ्यावर करुणा व सर्व सत्य विश्वसनीयता दाखवून, करार पाळून, आपल्या दासासाठी जे काही केले आहेस, त्यास मी पात्र नाही. आणि मी यार्देनेच्या पलीकडे गेलो तेव्हा माझ्याजवळ एका काठीशिवाय काहीही नव्हते. परंतु आता माझ्या दोन टोळ्या आहेत. 11कृपा करून तू माझा भाऊ एसाव याच्यापासून मला वाचव. तो येऊन मला, व मायलेकरांना मारून टाकील, अशी मला भीती वाटते. 12परंतु तू मला म्हणालास की, ‘मी नक्कीच तुझी भरभराट करीन. मी तुझी संतती वाढवीन आणि जिची गणना करता येणार नाही, अशी समुद्राच्या वाळूइतकी ती करीन.’” 13त्या रात्री याकोब त्या ठिकाणी राहिला. त्याने आपल्याजवळ जे होते त्यातून, आपला भाऊ एसावाला देण्यासाठी भेट तयार केली. 14त्याने दोनशे शेळ्या व वीस बोकड, दोनशे मेंढ्या व वीस एडके, 15तसेच तीस दुभत्या सांडणी व त्यांची शिंगरे, चाळीस गाई व दहा बैल, वीस गाढवी व दहा गाढवे घेतली. 16त्याने प्रत्येक कळप एकेका नोकराच्या ताब्यात दिला. मग तो नोकरांना म्हणाला, “प्रत्येक कळप वेगळा करा आणि कळपाकळपात थोडे अंतर ठेवून माझ्यापुढे चाला.” 17याकोबाने कळपाच्या पहिल्या टोळीच्या चाकराला आज्ञा देऊन तो म्हणाला, “जेव्हा माझा भाऊ एसाव तुझ्याकडे येईल व विचारील, ‘ही कोणाची जनावरे आहेत? तू कोठे चाललास? तू कोणाचा नोकर आहेस?’ 18तेव्हा तू त्यास असे उत्तर दे, ‘ही जनावरे आपला सेवक याकोब याच्या मालकीची आहेत. त्याने ही माझा धनी एसाव याला भेट म्हणून पाठवली आहेत. आणि पाहा, तो आमच्या पाठोपाठ येत आहे.’” 19याकोबाने दुसऱ्या, तिसऱ्या आणि इतर सर्व चाकरांना अशीच आज्ञा करून अशाच प्रकारे उत्तर देण्यास सांगितले. तो म्हणाला, “तुम्हास जेव्हा एसाव भेटेल तेव्हा तुम्ही असेच म्हणावे.” 20तुम्ही असेही म्हणावे की, “आपला दास याकोब आमच्या मागून येत आहे.” त्याने विचार केला, “जर मी ही माणसे भेटीसह पुढे पाठवली तर कदाचित एसावाचा राग शांत होईल. त्यानंतर जेव्हा मी त्यास भेटेन, तेव्हा कदाचित तो माझा स्विकार करील.” 21म्हणून त्याप्रमाणे याकोबाने भेट पुढे पाठवली. तो स्वतः त्या रात्री तळावर मागेच राहिला.
पनीएल येखे याकोबाने केलेले झुंज
22मग याकोब रात्री उठला. त्याने आपल्या दोन्ही स्त्रिया, दोन्ही दासी आणि अकरा मुले यांना बरोबर घेतले आणि तो यब्बोक नदीच्या उतारापाशी गेला. 23अशा रीतीने त्याने आपले जे सर्वकाही होते त्यांसह सर्वांना नदी पार करून पाठवले. 24याकोब एकटाच मागे राहिला होता, आणि एक पुरुष आला व त्याने याकोबाशी सूर्य उगवेपर्यंत कुस्ती केली. 25जेव्हा त्या मनुष्याने पाहिले की, आपण याकोबाचा पराभव करू शकत नाही, तेव्हा त्याने त्याच्या जांघेला स्पर्श केला. तेव्हा त्याच्याशी कुस्ती करीत असता याकोबाच्या जांघेचा सांधा निखळला. 26मग तो पुरुष याकोबाला म्हणाला, “आता मला जाऊ दे.” परंतु याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही.” 27तो पुरुष त्यास म्हणाला, “तुझे नाव काय आहे?” आणि याकोब म्हणाला, “माझे नाव याकोब आहे.” 28तेव्हा तो पुरुष म्हणाला, “तुझे नाव याकोब असणार नाही. येथून पुढे तुझे नाव इस्राएल #देवाशी युध्द करणाराअसेल. कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून विजय मिळवला आहेस.” 29मग याकोबाने त्यास विचारले, “कृपया तुझे नाव मला सांग.” परंतु तो पुरुष म्हणाला, “तू माझे नाव का विचारतोस?” त्या वेळी तेथेच त्या पुरुषाने याकोबाला आशीर्वाद दिला. 30म्हणून याकोबाने त्या जागेचे नाव पनीएल ठेवले. याकोब म्हणाला, “या ठिकाणी मी देवाला समक्ष पाहिले आहे, तरी माझा जीव वाचला आहे.” 31मग पनीएलाहून तो पुढे निघाला तेव्हा सूर्य उगवला. याकोब आपल्या पायामुळे लंगडत चालत होता. 32म्हणून आजपर्यंत इस्राएल लोक जनावरांच्या जांघेच्या सांध्याजवळचा स्नायू खात नाहीत कारण याच स्नायूपाशी याकोबाला दुखापत झाली होती.

Currently Selected:

उत्प. 32: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in