YouVersion Logo
Search Icon

उत्प. 31

31
याकोब लाबानाच्या घरून पळून जातो
1लाबानाचे पुत्र आपसात बोलत असताना याकोबाने ऐकले ते म्हणाले, “जे आपल्या बापाचे त्यातून सर्वकाही याकोबाने घेतले आहे आणि जे आमच्या वडिलाच्या त्या मालमत्तेतून तो संपन्न झाला आहे.” 2याकोबाने लाबानाचा चेहरा पाहिला. त्याच्या वागण्यात बदल झाल्याचे त्याच्या लक्षात आले. 3परमेश्वर याकोबाला म्हणाला, “तुझ्या वडिलाच्या देशात आपल्या नातलगांकडे तू परत जा, आणि मी तुझ्याबरोबर असेन.” 4तेव्हा याकोबाने राहेल व लेआ यांना, तो आपले शेरडामेंढरांचे कळप राखीत होता, तेथे शेतात बोलावले, 5आणि त्यांना म्हणाला, “तुमच्या वडिलाच्या वागण्यात मला बदल झालेला जाणवला आहे. परंतु माझ्या बापाचा देव माझ्याबरोबर आहे. 6तुम्हास माहीत आहे की, मी आपल्या सर्व शक्तीने तुमच्या बापाची सेवा केली आहे. 7तुमच्या वडिलाने मला फसवले आणि त्याने माझ्या वेतनात दहा वेळा बदल केलेला आहे. परंतु देवाने माझे नुकसान करण्याची परवानगी त्यास दिली नाही. 8जेव्हा तो म्हणाला, सर्व ठिपकेदार शेळ्यामेंढ्या तुझे वेतन होतील, सर्व शेळ्यामेंढ्यांना ठिपकेदार करडे होऊ लागली. परंतु मग लाबान म्हणाला, तू बांड्या बकऱ्या घे; त्या तुला वेतनादाखल होतील. त्याने असे म्हटल्यानंतर सर्व बकऱ्यांना बांडी करडे होऊ लागली, 9तेव्हा अशा रीतीने देवाने तुमच्या वडिलाच्या कळपातून गुरेढोरे काढून घेऊन ती मला दिलेली आहेत. 10एकदा शेळ्यामेंढ्यांचा कळप निपजण्याच्या वेळेस मी आपली दृष्टी वर करून स्वप्नात पाहिले, तो पाहा, कळपातल्या माद्यांवर नर उडत होते ते फक्त ठिपकेदार व बांडे, करडे होते.” 11देवाचा दूत मला स्वप्नात म्हणाला, “याकोबा,” मी म्हणालो, “काय आज्ञा आहे?” 12तो म्हणाला, “आपले डोळे वर करून पाहा, ‘फक्त ठिपकेदार व बांडे, करडे असलेलेच नर माद्यांवर उडत आहेत. लाबान तुला काय करीत आहे ते सर्व मी पाहिले आहे. 13बेथेलचा मी देव आहे. जेथे तू एका स्मारकस्तंभास अभिषेक केलास, जेथे नवस करून तू मला वचन दिले, आणि आता तू हा देश सोड आणि आपल्या जन्मभूमीस परत जा.’” 14राहेल व लेआ यांनी त्यास उत्तर दिले आणि त्यास म्हणाल्या, “आमच्या वडिलाच्या घरी आम्हांला वारसा किंवा तेथे काही भाग नाही. 15आम्ही परक्या असल्यासारखे त्याने आम्हांला वागवले नाही काय? त्याने आम्हास तुम्हास विकून टाकले, आणि आमचे पूर्ण पैसे खाऊन टाकले आहेत. 16देवाने ही सर्व संपत्ती आमच्या पित्याकडून घेतली आणि आता ती आपली व आपल्या मुळाबाळांची संपत्ती झाली आहे. तेव्हा देवाने तुम्हास जे करावयास सांगितले आहे ते करा.” 17तेव्हा याकोब उठला आणि त्याने आपल्या स्त्रिया व मुलांना उंटांवर बसवले. 18तो आपली सर्व गुरेढोरे आणि आपण मिळवलेले सर्व धन, म्हणजे जे गुरांढोरांचे कळप त्याने पदन-अरामात मिळवले होते, ते घेऊन आपला बाप इसहाक याच्याकडे कनान देशास जाण्यास निघाला. 19त्याच वेळी लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला होता. तेव्हा राहेलने आपल्या वडिलाच्या कुलदेवतांच्या मूर्ती चोरल्या. 20याकोबानेही अरामी लाबानाला फसवले. आपण येथून सोडून जात आहो हे त्यास सांगितले नाही. 21याकोब आपली बायकामुले व सर्व चीजवस्तू घेऊन ताबडतोब पळाला. त्यांनी फरात नदी ओलांडली आणि ते गिलाद डोंगराळ प्रदेशाकडे निघाले.
लाबान याकोबाचा पाठलाग करतो
22तीन दिवसानंतर याकोब पळून गेल्याचे लाबानास कळाले. 23तेव्हा त्याने आपले नातलग एकत्र जमवले आणि याकोबाचा पाठलाग सुरू केला. सात दिवसानंतर गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाजवळ त्यास याकोब सापडला. 24त्या रात्री देव अरामी लाबानाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नये म्हणून काळजी घे.” 25लाबानाने याकोबाला गाठले. याकोबाने डोंगराळ प्रदेशात तळ दिला होता. लाबानानेही आपल्या बरोबरच्या नातलगासह गिलादाच्या डोंगराळ भागात तळ दिला. 26लाबान याकोबाला म्हणाला, “तू मला हे काय केले? तू मला फसवलेस. आणि युद्धकैदी केलेल्या स्त्रियांप्रमाणे तू माझ्या मुलींना का घेऊन आलास? 27तू मला न सांगता का पळून गेलास? मला का फसवले? तू मला सांगितले नाही. मी तर उत्सव करून आणि गाणी, डफ व वीणा वाजवून तुला पाठवले असते. 28तू मला माझ्या नातवांचा व माझ्या मुलींचा निरोप घेण्याची किंवा त्यांची चुंबने घेण्याची संधी दिली नाहीस. आता हा तू मूर्खपणा केला आहे. 29खरे तर अपाय करण्याची माझ्यात ताकद आहे, परंतु काल रात्री तुझ्या बापाचा देव माझ्या स्वप्नात बोलला आणि म्हणाला, ‘तू याकोबाला बरे किंवा वाईट बोलू नको म्हणून काळजी घे.’ 30तुला तुझ्या वडिलाच्या घरी जायचे आहे हे मला माहीत आहे आणि म्हणूनच तू जाण्यास निघालास, परंतु तू माझ्या घरातील कुलदेवता का चोरल्यास?” 31याकोबाने उत्तर दिले आणि लाबानास म्हणाला, “मी गुप्तपणे निघालो कारण मला भीती वाटली, आणि मी विचार केला की, तुम्ही तुमच्या मुली माझ्यापासून हिसकावून घ्याल. 32ज्या कोणी तुमच्या कुलदेवता चोरल्या आहेत तर तो जगणार नाही. तुमच्या नातलगासमोर माझ्याबरोबर जे काही तुमचे आहे ते तुम्ही आपले ओळखा आणि ते घ्या.” राहेलीने त्या मूर्ती चोरल्या होत्या ते याकोबास माहीत नव्हते. 33लाबान याकोबाच्या तंबूत गेला, लेआच्या तंबूत गेला आणि दासींच्या तंबूत गेला परंतु त्यास त्या सापडल्या नाहीत. त्यानंतर तो राहेलीच्या तंबूत गेला. 34राहेलीने त्या कुलदेवता उंटाच्या खोगिरात लपवून ठेवल्या होत्या आणि ती त्यांच्यावर बसली होती. लाबानाने सगळा तंबू शोधला परंतु त्या सापडल्या नाहीत. 35ती आपल्या पित्यास म्हणाली, “मी आपल्यासमोर उभी राहू शकत नाही म्हणून माझ्यावर रागावू नका, कारण माझी मासिकपाळी आली आहे.” अशा रीतीने त्याने शोध केला परंतु त्यास कुलदेवता सापडल्या नाहीत. 36मग याकोबाला राग आला आणि त्याने लाबानाशी वाद केला, तो त्यास म्हणाला, “माझा गुन्हा काय आहे? माझे पाप कोणते आहे, म्हणून तुम्ही माझा रागाने पाठलाग केलात? 37माझ्या मालकीच्या सर्व चीजवस्तू तुम्ही शोधून पाहिल्या आहेत. तुम्हास तुमच्या मालकीची एकतरी चीजवस्तू आढळली का? जर तुम्हास तुमचे काही मिळाले असेल तर ते आपल्या नातलगासमोर ठेवा. यासाठी की ते आपल्या दोघांचा न्याय करतील. 38मी वीस वर्षे तुमच्याबरोबर होतो. त्या सर्व काळात एकही करडू किंवा कोकरू मरण पावलेले जन्मले नाही आणि तुमच्या कळपातील एकही बकरा मी खाल्ला नाही. 39जनावरांनी फाडलेले ते मी तुमच्याकडे आणले नाही. त्याऐवजी ते नुकसान मी भरून दिले. दिवसा किंवा रात्री चोरी गेलेले, प्रत्येक हरवलेले जनावर ते तुम्ही नेहमी माझ्या हातून भरून घेत होता. 40दिवसा उन्हाच्या तापाने व रात्री गारठ्यामुळे मला त्रास होई. आणि माझ्या डोळ्यावरून झोप उडून जाई, अशी माझी स्थिती होती. 41वीस वर्षे मी तुमच्या घरी राहिलो; पहिली चौदा वर्षे तुमच्या दोन मुलींसाठी आणि सहा वर्षे तुमच्या कळपांसाठी. दहा वेळा तुम्ही माझ्या वेतनात फेरबदल केला. 42परंतु माझ्या पूर्वजांचा देव; अब्राहामाचा देव आणि इसहाकाचा देव ज्याचे मी भय धरतो, तो माझ्या बरोबर होता. तो जर माझ्याबरोबर नसता तर तुम्ही मला नक्कीच रिकामे पाठवले असते. देवाने माझ्यावर झालेला जुलूम पाहिला आणि मी कष्टाने केलेले काम पाहिले आणि काल रात्री त्याने तुम्हास धमकावले.”
याकोब व लाबान ह्यांच्यात सलोखा
43लाबानाने उत्तर दिले आणि तो याकोबाला म्हणाला, “या मुली माझ्या मुली आहेत आणि ही नातवंडे माझी नातवंडे आहेत आणि हे कळप माझे कळप आहेत. जे काही तू पाहतोस ते सर्व माझे आहे. परंतु आज मी या मुलींसाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी ज्यांना त्यांनी जन्म दिला त्यांना मी काय करू शकतो? 44म्हणून मी व तू आता आपण करार करू आणि तो माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्षी होवो.” 45तेव्हा याकोबाने मोठा दगड घेऊन स्मारकस्तंभ उभा केला. 46याकोब त्याच्या नातलगांना म्हणाला की, “दगड गोळा करा.” मग त्यांनी दगड गोळा करून त्याची रास केली. नंतर त्या दगडांच्या राशीशेजारी बसून ते जेवले. 47लाबानाने त्या राशीला यगर-सहादूथा#अर्थ-साक्षिचा ढीग असे नाव ठेवले. परंतु याकोबाने त्या जागेचे नाव गलेद ठेवले. 48लाबान म्हणाला, “ही दगडांची रास आज माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्षी आहे.” म्हणून त्याचे नाव गलेद ठेवले. 49मग लाबान म्हणाला, “आपण एकमेकापासून दूर होत असताना परमेश्वर माझ्यावर व तुझ्यावर लक्ष ठेवो.” म्हणून त्या जागेचे नाव मिस्पा #टेहळणी बुरूजठेवण्यात आले. 50जर का तू माझ्या मुलींना दुःख देशील किंवा माझ्या मुलींशिवाय दुसऱ्या स्त्रिया करून घेशील. तर पाहा, “जरी आमच्याबरोबर कोणी नाही पण तुझ्यात व माझ्यात देव साक्षी आहे.” 51लाबान याकोबास म्हणाला, या राशीकडे पाहा आणि स्मारकस्तंभाकडे पाहा, जो मी तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये ठेवला आहे. 52ही रास व हा स्तंभ ही दोन्ही आपल्यातील कराराची साक्ष होवो, की हानी करायला मी तुझ्याकडे ही रास ओलांडून येणार नाही आणि तू ही माझ्याविरुद्ध ही रास ओलांडून कधीही येऊ नये. 53अब्राहामाचा देव, नाहोराचा देव आणि त्यांच्या वडिलांचा देव आमचा न्याय करो. याकोबाने त्याचा बाप इसहाक, ज्या देवाचे भय धरत असे त्याची शपथ घेतली. 54मग याकोबाने त्या डोंगरावर यज्ञ केला आणि त्याने आपल्या सर्व नातलगांना भोजनासाठी आमंत्रण दिले. भोजन संपल्यावर त्यांनी ती रात्र डोंगरावरच घालवली. 55दुसऱ्या दिवशी लाबान पहाटेस उठला. त्याने आपल्या मुली व आपली नातवंडे यांची चुंबने घेऊन त्यांचा निरोप घेतला. त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो आपल्या घरी परत गेला.

Currently Selected:

उत्प. 31: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in