YouVersion Logo
Search Icon

गल. 4

4
ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे देवपुत्रत्वाची प्राप्ती
1आता मी म्हणतो की, वारीस लहान बाळ आहे, तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व दासामध्ये काही फरक नसतो. 2पण पित्याने ठरवलेल्या मुदतीपर्यंत तो शिक्षकांच्या व कारभाऱ्याच्या स्वाधीन असतो. 3अशाप्रकारे आपणदेखील बाळ असताना, आपण जगाच्या प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो. 4पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला, 5ह्यात उद्देश हा होता की, नियमशास्त्राखाली असलेल्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे; म्हणजे आपल्याला पुत्र होण्याचा हक्क मिळावा. 6आणि तुम्ही पुत्र आहात म्हणून, देवाने अब्बा-पिता, अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्याआमच्या अंतःकरणात पाठवले आहे; 7म्हणून तू आतापासून दास नाही तर पुत्र आहेस; आणि पुत्र आहेस, तर देवाच्याद्वारे वारीसही आहेस.
ख्रिस्ताकडून मिळालेली स्वतंत्रता दवडू नये
8तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा, जे स्वभावतः देव नाहीत त्यांचे दास होता; 9पण आता तुम्ही देवाला ओळखीत असताना किंवा देव तुम्हास ओळखीत असताना तुम्ही त्या दुर्बळ व निःसत्व प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे परत जाता? आणि पुन्हा त्यांच्या दास्यात राहण्याची इच्छा करता? 10तुम्ही दिवस, महिने, ऋतू आणि वर्षे पाळता. 11तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्याविषयी भीती वाटते.
12बंधूंनो, मी तुम्हास विनवणी करतो की, तुम्ही माझ्यासारखे व्हा, कारण मीही तुमच्यासारखा होतो. तुम्ही माझे काहीच वाईट केले नाही. 13प्रथम तुम्हास शुभवर्तमान सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरीक व्याधीमुळे मिळाला हे तुम्हास माहित आहे. 14आणि माझ्या देहाच्या अशक्तपणात तुमची परीक्षा होत असता, तुम्ही तिरस्कार केला नाही पण माझा देवाच्या दूतासारखा, ख्रिस्त येशूसारखा स्वीकार केला. 15तर तेव्हाचा तुमचा तो आशीर्वाद कोठे आहे? कारण, मी तुमच्याविषयी साक्ष देतो की, शक्य असते तर तुम्ही मला तुमचे स्वतःचे डोळे काढून दिले असते. 16मग मी तुम्हास खरे सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय? 17ते लोक तुमच्याविषयी आवेशी आहेत तरी चांगल्या प्रकारे नाही पण तुम्ही त्यांच्याविषयी आवेशी असावे म्हणून ते तुम्हास आमच्यापासून वेगळे करू पाहतात. 18तर चांगल्या कारणांसाठी सर्वदा आवेशी असणे हे चांगले आणि मी तुम्हाजवळ प्रत्यक्ष आहे तेव्हाच मात्र आवेशी असावे असे नाही. 19माझ्या मुलांनो, तुमच्यात ख्रिस्ताचे रूप निर्माण होईपर्यंत मला तुमच्यासाठी पुन्हा प्रसूती वेदना होत आहेत. 20ह्यावेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो आणि आवाज चढवून बोलता आले असते तर मला बरे वाटले असते कारण तुमच्याविषयी मी संशयात आहे.
दोन करार
उत्प. 21:8-21; यश. 54:1
21जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय? हे मला सांगा. 22कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन पुत्र होतेः एक दासीपासून व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. 23पण दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्माला आला होता; तर स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला. 24या गोष्टी दृष्टांतरूपाने समजावल्या जावू शकतात. त्या स्त्रिया दोन करारासारख्या आहेत एक सीनाय पर्वतावरून केलेला व दास्यासाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार होय. 25कारण ही हागार अरबस्तानातील सीनाय पर्वत आहे आणि ती आत्ताच्या यरूशलेमेच्या जोडीची आहे. आपल्या मुलांबाळांसह दास्यात आहे. 26नवीन वरील यरूशलेम स्वतंत्र आहे; ही आपल्या सर्वांची आई आहे. 27पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, “अगे वंध्ये, तुला मूल होत नसले तरी, तू आनंदित हो! ज्या तुला प्रसूतिवेदना होत नाही, ती तू आनंदाने जयघोष कर! आनंदाची आरोळी मार! कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा, आशा सोडलेल्या स्त्रीची मुले अधिक आहेत.”
जुन्या करारांतले एक उदाहरण
28आता बंधूनो, इसहाकासारखे तुम्ही अभिवचनाची संतती आहात. 29परंतु त्यावेळेस देहस्वभावानुसार जो जन्मला होता, त्याने जो आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला, तसा आताही होत आहे. 30पण शास्त्रलेख काय सांगतो? ‘तू त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे; कारण दासीचा मुलगा स्वतंत्र स्त्रीच्या मुलाबरोबर वारीस होणारच नाही.’ 31तर मग, बंधूंनो, आपण दासीची मुले नाही, पण स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.

Currently Selected:

गल. 4: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in