YouVersion Logo
Search Icon

उप. 2

2
1मी आपल्या मनात म्हटले, “आता ये, मी आनंदाद्वारे तुझी पारख करतो. म्हणून आनंदाचा उपभोग घे पण पाहा, हे सुद्धा केवळ तात्पुरत्या हवेच्या झुळकेसारखे आहे.” 2मी हास्याविषयी म्हटले, ते वेडेपण आहे. आणि आनंदाविषयी म्हटले, त्याचा काय उपयोग आहे?
3जे मनुष्यास चांगले, जे त्यांनी आकाशाखाली आपल्या आयुष्याचे सर्व दिवस करावे ते मी शोधून पाहीपर्यंत माझे मन मला ज्ञानाच्या योगाने वाट दाखवीत घेऊन जात असताही, मी आपली इच्छा द्राक्षरसाने कशी पुरी करावी आणि मूर्खपणाच्या आचारांचे अवलंबन कसे करता येईल याचा मी आपल्या मनाशी शोध केला.
4नंतर मी महान गोष्टी करायला सुरुवात केली. मी स्वतःसाठी घरे बांधली, आणि स्वत:साठी द्राक्षाचे मळे लावले. 5मी बागा लावल्या आणि मोठमोठे बगीचे केले. मी सर्व प्रकारची फळझाडे त्यामध्ये लावली. 6झाडे लावलेल्या वनास पाणी पुरवावे म्हणून मी आपणासाठी तलाव निर्माण केले.
7मी पुरुष आणि स्त्री गुलाम विकत घेतले. माझ्या महालातही गुलामांचा जन्म झाला. माझ्यापूर्वी यरूशलेमेत राज्य केलेल्या कोणाही राजाजवळ नव्हते एवढे अधिक गुरांचे आणि शेरडामेंढरांच्या कळपाचे मोठे धन मजजवळ होते. 8मी माझ्यासाठी सोने आणि चांदी, राजे व राष्ट्रे यांच्या संपत्तीचा संग्रह केला. माझ्यासाठी गाणे म्हणणारे स्त्री-पुरुष माझ्याजवळ होते आणि मानवजातीस आनंदीत करणारे सर्व होते जसे पुष्कळ स्त्रिया ठेवल्या.
9जे माझ्यापूर्वी यरूशलेमेत होते त्या सर्वापेक्षा अधिक धनवान व महान झालो आणि माझे ज्ञान माझ्याबरोबर कायम राहिले.
10जे काही माझ्या डोळ्यांनी इच्छिले,
ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही.
मी माझे मन कोणत्याही आनंदापासून आवरले नाही,
कारण माझ्या सर्व कष्टांमुळे माझे मन आनंदीत होत असे;
आणि माझ्या सर्व परिश्रमाचे फळ आनंद हेच होते.
11नंतर मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे जी मी पार पाडली होती,
आणि कार्य साधायला मी जे श्रम केले होते त्याकडे पाहिले,
परंतु पुन्हा सर्वकाही व्यर्थ होते आणि वायफळ प्रयत्न करणे असे होते;
भूतलावर त्यामध्ये तेथे काही लाभ नाही.
12मग मी ज्ञान,
वेडेपणा व मूर्खपणा याकडे लक्ष देण्यास वळलो.
कारण जो राजा आल्यानंतर त्याच्या मागून येणारा राजा काय करील?
जे काही त्याने यापूर्वी केले तेच तो करणार.
13नंतर मला समजायला लागले
जसा अंधारापेक्षा प्रकाश जितका उत्तम आहे
तसे मूर्खतेपेक्षा ज्ञान हितकारक आहे.
14ज्ञानी मनुष्य काय करतो हे त्याचे डोळे पाहत असतात,
पण मूर्ख अंधारात चालतो,
असे असून सर्वांची एक सारखीच गती असते. असेही मी समजलो.
15मग मी आपल्या मनात म्हणालो,
मूर्खाविषयी जे काय घडते,
ते माझ्याही बाबतीत घडेल,
मग जर मी फार ज्ञानी झालो तरी त्याच्यात काय फरक पडेल?
मी आपल्या मनात अनुमान काढले,
हे सुद्धा व्यर्थच आहे.
16मूर्खाप्रमाणेच ज्ञान्याची आठवण सर्वकाळपर्यंत राहणार नाही.
कारण पुढे येणाऱ्या दिवसात सर्वकाही अगदी विसरून जातील
म्हणून शहाणा मनुष्य मूर्खासारखाच मरतो.
17यामुळे मला जीवनाचा तिरस्कार वाटला. जे काम भूतलावर करण्यात येते त्याचे मला वाईट वाटले. सर्व गोष्टी व्यर्थ आहेत आणि वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहेत. 18माझे अपार कष्ट, जे मी भूतलावर केले त्याचा मी तिरस्कार करू लागलो. कारण जो मनुष्य माझ्यामागून येईल त्याच्याकडे ते सोडून मला जावे लागणार.
19आणि तो मनुष्य शहाणा असेल की मूर्ख असेल कोणाला माहित? परंतु माझे सर्व श्रम, जे मी भूतलावर केले आहेत आणि ज्यात मी आपणास ज्ञान दाखवले आहे, त्यावर तो अधिकार चालवील. हेही व्यर्थ आहे. 20म्हणून जे माझे श्रम भूतलावर केले होते त्याविषयी माझे मन निराश झाले.
21कारण ज्याचे श्रम ज्ञानाने, विद्येने आणि कौशल्याने होतात असा मनुष्य कोण आहे? तरी त्यासाठी ज्याने काही श्रम केले नाहीत त्याच्या वाट्यास ते ठेऊन सोडून जावे हेही व्यर्थच आहे आणि मोठी शोकांतिका आहे. 22कारण मनुष्य सूर्याच्या खाली जे सर्व श्रम करतो आणि आपल्या मनाने जे प्रयत्न करतो त्याकडून त्यास काय फायदा होतो? 23कारण मनुष्याच्या कामाचा प्रत्येक दिवस दुःखदायक आणि तणावपूर्ण असतो. रात्रीदेखील त्याच्या मनास विसावा मिळत नाही. हेही वायफळच आहे.
24मनुष्याने खावे, प्यावे आणि श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे यापेक्षा त्यास काहीही उत्तम नाही. हे ही देवाच्या हातून घडते असे मी पाहिले. 25कारण माझ्यापेक्षा कोण उत्तम भोजन करील अथवा कोण देवापासून वेगळे राहून कोणत्या प्रकारचा सुखाचा उपभोग घेईल?
26जो मनुष्य देवासमोर चांगला आहे त्यास तो ज्ञान, विद्या आणि आनंद देतो. परंतु तो पाप्याला कष्ट देतो, अशासाठी की त्याने संग्रह करावा व साठवून ठेवावे आणि जो देवासमोर चांगला आहे त्यास ते द्यावे. हेही व्यर्थ आणि वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहे.

Currently Selected:

उप. 2: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in