YouVersion Logo
Search Icon

उप. 1

1
सर्वकाही व्यर्थ
1 राजे 4:20-28
1ही शिक्षकाकडून आलेली वचने आहेत, जो यरूशलेमेतील राजा आणि दावीदाचा वंशज होता. 2शिक्षक हे म्हणतो,
धुक्याच्या वाफेसारखी,
वाऱ्यातील झुळूकेसारखी
प्रत्येक गोष्ट नाहीशी होईल, पुष्कळ प्रश्न मागे ठेवून जातील.
3भूतलावर मानवजात जे सर्व कष्ट करते त्यापासून त्यास काय लाभ?
4एक पिढी जाते,
आणि दुसरी पिढी येते,
परंतु पृथ्वीच काय ती सर्वकाळ राहते.
5सूर्य उगवतो
आणि तो मावळतो.
आणि जेथे तो उगवतो तेथे आपल्या स्थानाकडे पुन्हा त्वरेने मागे जातो.
6वारा दक्षिणेकडे वाहतो
आणि उत्तरेकडे वळतो,
नेहमी त्याच्यामार्गाने सभोवती जाऊन फिरून
आणि पुन्हा माघारी येतो.
7सर्व नद्या सागरात जाऊन मिळतात
पण सागर कधीही भरून जात नाही.
ज्या स्थानाकडून नद्या वाहत येतात,
तेथेच त्या पुन्हा जातात.
8सर्व गोष्टी कष्टमय आहेत.
आणि कोणीही त्याचे स्पष्टीकरण करू शकत नाही.
डोळे जे काय पाहतात त्याने त्यांचे समाधान होत नाही,
किंवा जे काय कानाने ऐकतो त्यानेही त्यांची पूर्तता होत नाही. 9जे काही आहे तेच होणार,
आणि जे केले आहे तेच केले जाईल.
भूतलावर काहीच नवे नाही.
10कोणतीही अशी गोष्ट आहे का ज्याविषयी असे म्हणता येईल,
पाहा, हे नवीन आहे?
जे काही अस्तित्वात आहे ते फार काळापूर्वी अस्तित्वात होते,
आम्हांपूर्वीच्या युगामध्ये आधीच ते आले आहे.
11प्राचीन काळी घडलेल्या गोष्टी कोणाच्या लक्षात राहत नाहीत.
आणि त्यानंतर ज्या गोष्टी घडणार
आणि भविष्यात ज्या गोष्टी घडतील
त्यादेखील आठवणीत राहणार नाही.
उपदेशकाचा अनुभव
12मी शिक्षक आहे, आणि यरूशलेमेमध्ये इस्राएलावर राजा होतो. 13आकाशाखाली जे सर्वकाही करतात त्याचा मी ज्ञानाने अभ्यास केला आणि त्यांचा शोध घेण्याकडे मी आपले चित्त लावले. देवाने मनुष्यांच्या पुत्रामागे त्याचा शोध घेण्याचे बिकट कष्ट लावून दिले आहेत. 14भूतलावर जी काही कामे चालतात ती मी पाहिली आणि पाहा, ते सर्व वायफळ आहेत आणि वाऱ्याचा पाठलाग करण्यासारखे ते आहे.
15जे वाकडे आहे ते सरळ करू शकत नाही!
जे गमावले आहे ते जमेस धरू शकत नाही!
16मी आपल्या मनाशीच बोलून म्हणालो, “पाहा, माझ्या आधी ज्या राजांनी यरूशलेमेवर राज्य केले त्या सर्वांपेक्षा मी अधिक ज्ञान प्राप्त करून घेतले आहे. माझ्या मनाने महान ज्ञान व विद्या यांचा अनुभव घेतला आहे.” 17याकरिता ज्ञान समजायला आणि वेडेपण व मूर्खपण जाणायला मी आपले मन लावले, मग हेही वाऱ्याचा पाठलाग करण्यासारखे आहे असे मी समजलो. 18कारण विपुल ज्ञानात अधिक खेद आहे आणि जो कोणी ज्ञानात वाढतो तो दुःख वाढवतो.

Currently Selected:

उप. 1: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in