YouVersion Logo
Search Icon

अनु. 10

10
दगडाच्या नव्या पाट्या
निर्ग. 34:1-9
1तेव्हा हुबेहूब पहिल्यासारख्या दोन सपाट दगडी पाट्या परमेश्वराने मला घडवायला सांगितल्या. “त्या घेऊन माझ्याकडे डोंगरावर ये आणि एक लाकडाचा कोशही कर असे सांगितले. 2तो पुढे म्हणाला, तू फोडून टाकलेल्या पाट्यांवर होता तोच मजकूर मी या पाट्यांवर लिहीन मग तू या नवीन पाट्या कोशात ठेव.” 3मग मी बाभळीच्या लाकडाची एक कोश बनवला. पहिल्यासारख्याच दोन दगडी पाट्या केल्या आणि डोंगरावर गेलो. पाट्या माझ्या हातातच होत्या. 4मग, डोंगरावर सर्व जमले होते तेव्हा ज्या दहा आज्ञा परमेश्वराने अग्नीतून तुम्हास दिल्या त्याच त्याने पहिल्या लेखाप्रमाणे या पाट्यांवर लिहिल्या आणि त्या माझ्या स्वाधीन केल्या. 5मी डोंगर उतरुन खाली आलो. त्या पाट्या मी केलेल्या कोशात ठेवल्या. त्या तशा ठेवायला मला परमेश्वराने सांगितले होते. आणि अजूनही त्या तिथे आहेत. 6इस्राएल लोक प्रवास करत बनेयाकान विहिरीवरुन मोसेरोथला आले. तेथे अहरोन मरण पावला. त्यास तेथेच दफन केले. त्याच्या जागी त्याचा मुलगा एलाजार याजकाचे काम करु लागला. 7इस्राएल लोक मग मोसेराहून गुदगोदा येथे आणि तेथून पुढे याटबाथा या नद्यांच्या प्रदेशात आले. 8त्यावेळी परमेश्वराने एका खास कामगिरीसाठी लेवीचा वंश इतरांपेक्षा वेगळा केला. परमेश्वराच्या आज्ञापटाचा तो कोश वाहून नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. याजक म्हणून परमेश्वराची सेवा करणे, परमेश्वराच्या वतीने लोकांस आशीर्वाद देणे ही त्यांची कामे होती. ती ते अजूनही करतात. 9त्यामुळेच लेवींना इतरांसारखा जमिनीत व वतनात वाटा मिळाला नाही. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे परमेश्वरच त्यांचे वतन आहे. 10मी पहिल्या वेळेप्रमाणेच चाळीस दिवस आणि रात्र डोंगरावर राहिलो. यावेळी परमेश्वराने माझे ऐकले व तुमचा नाश न करायचे ठरविले. 11तेव्हा परमेश्वराने मला सांगितले, “ऊठ आणि लोकांस पुढच्या प्रवासास घेऊन जा. म्हणजे मी त्यांच्या पूर्वजांना जो प्रदेश द्यायचे वचन दिले तेथे ते जाऊन राहतील.”
देवाची अपेक्षा
12आता, हे इस्राएल लोकहो! तुम्ही तुमचा देव परमेश्वर याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांने चालावे, आणि त्याच्यावर प्रीती करावी, आणि तुम्ही आपल्या सर्व हृदयाने आणि आपल्या सर्व जिवाने परमेश्वर तुमचा देव याची सेवा करावी. 13परमेश्वराच्या आज्ञा आणि त्याचे जे नियम मी आज तुमच्या बऱ्यासाठी तुम्हास आज्ञापिले ते तुम्ही पाळावे, याशिवाय तुमचा देव तुमच्याकडून काय मागतो? 14सर्वकाही तुमचा देव परमेश्वर ह्याचे आहे. आकाश, आकाशापलीकडचे आकाश, पृथ्वी व पृथ्वीवरचे सर्वकाही परमेश्वर देवाचे आहे. 15परमेश्वराचे तुमच्या पूर्वजांवर फार प्रेम होते. त्या प्रेमाखातीर त्याने इतरांना वगळून तुम्हास आपले मानले. आजही वस्तूस्थिती तिच आहे. 16तेव्हा हट्टीपणा सोडा, आपली अंत:करणे परमेश्वरास द्या. 17कारण परमेश्वर तुमचा देव आहे, तो देवांचा देव व प्रभूंचा प्रभू आहे. तो महान व भययोग्य परमेश्वर आहे. तो विस्मयकारी आहे. त्यास सर्वजण सारखेच आहेत. तो पक्षपात करत नाही की लाच घेत नाही. 18अनाथांना, विधवांना इतकेच काय शहरात आलेल्या परकीयानांही अन्नवस्त्र पुरवून आपले प्रेम दाखवतो. 19म्हणून तुम्ही परक्यांशी प्रेमाने वागले पाहिजे. कारण मिसर देशात तुम्हीही उपरेच होतात. 20तुम्ही फक्त तुमचा देव परमेश्वर याचेच भय धरा व त्याचीच सेवा करा, त्याच्याबद्दल आदर बाळगा. त्यास धरुन राहा, शपथ वाहाताना त्याच्याच नावाने शपथ घ्या. 21फक्त परमेश्वराची स्तुती करा. तो तुमचा देव आहे. त्याने केलेले चमत्कार आणि भयानक थोर कृत्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहिली आहेत. 22तुमचे पूर्वज खाली मिसरमध्ये गेले तेव्हा ते फक्त सत्तरजण होते. आता तुमचा देव परमेश्वर याच्या कृपेने तुम्ही त्याच्या कितीतरी पटीने अधिक, आकाशातील ताऱ्यांइतके झाला आहात.

Currently Selected:

अनु. 10: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in