YouVersion Logo
Search Icon

प्रेषि. 23

23
1मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, “बंधुजनहो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे.” 2तेव्हा महायाजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांस त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली. 3तेव्हा पौल त्यास म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील; तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय?” 4तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, “तू देवाच्या महायाजकाची निंदा करितोस काय?” 5पौलाने म्हटले, “बंधुजनहो, हा महायाजक आहे हे मला ठाऊक नव्हते; कारण तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्याविरुद्ध वाईट बोलू नको असे शास्त्रात लिहिले आहे.”
6तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदूकी व एक भाग परूशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, “बंधुजनहो, मी परूशी व परुश्यांचा पुत्र आहे; आमची आशा व मरण पावलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे.” 7तो हे बोलत आहे तोंच परूशी व सदूकी ह्यांच्यात भांडण लागून लोकात फुट पडली. 8कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात; परूशी तर या दोन्ही गोष्टी मान्य करतात. 9तेव्हा मोठी गडबड उडाली; आणि जे नियमशास्त्र शिक्षक, परूश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काहीजण उठून तणतण करीत म्हणाले, “या मनुष्याच्या ठायी आम्हास काही वाईट दिसत नाही; जर आत्मा किंवा देवदूत त्यांच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे?” 10असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता; ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकुम केला की, खाली जाऊन त्यास त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.
11त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर; जशी तू यरूशलेमे शहरात माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरांतही तुला द्यावी लागेल.”
यहूद्यांचा पौलाविरुद्ध कट
12मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही. 13हा कट रचणारे इसम चाळीसांहून अधिक होते. 14ते मुख्य याजक लोक व वडील ह्यांच्याकडे येऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही, अशा कडकडीत शपथेने आम्ही आपणास बद्ध करून घेतले आहे. 15तर आता त्याच्याविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाची आहे, या निमित्ताने त्यास आपणाकडे आणावे असे तुम्ही न्यायसभेतही सरदाराला समजवावे; म्हणजे तो जवळ येतो न येतो तोंच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहोत.”
16तेव्हा ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या बहिणीच्या मुलाने ऐकले आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले. 17तेव्हा पौलाने एका शताधीपतीला बोलावून म्हटले, या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा, ह्याला त्यास काही सांगावयाचे आहे. 18तेव्हा त्याने त्यास सरदाराकडे नेऊन म्हटले, बंदिवान पौल ह्याने मला बोलावून विनंती केली की, या तरूणाला आपणाकडे आणावे, त्यास आपणाबरोबर काही बोलावयाचे आहे. 19तेव्हा सरदाराने त्याचा हात धरून त्यास एकीकडे नेऊन विचारले, “तुला काय सांगावयाचे आहे?” 20तो म्हणाला, “यहूद्यांनी असा एकोपा केला आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाच्या निमित्ताने त्यास उद्या खाली सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी. 21तर आपण त्यांचे ऐकू नका; कारण त्यांच्यापैकी चाळीसांहून अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत; त्यांनी शपथ घेतली आहे की, त्यास जिवे मारीपर्यंत आपण खाणार पिणार नाही; आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहे.” 22तेव्हा, “तू हे मला कळविले आहे हे कोणाला सांगू नको, असे त्या तरूणाला निक्षून सांगून सरदाराने त्यास निरोप दिला.” 23मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरीयास जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी प्रहर रात्रीस तयार ठेवा.” 24आणि पाठाळे मिळवा, त्यावर पौलाला बसवून फेलिक्स सूभेदाराकडे सांभाळून न्या. 25शिवाय त्याने अशा मजकूराचे पत्र लिहिले. 26“महाराज फेलिक्स ह्यांना सुभेदार क्लौद्य लुसिया याचा सलाम. 27या मनुष्यास यहूद्यांनी धरले होते आणि त्यांच्याकडून त्याचा घात होणार होता, इतक्यात हा रोमी आहे असे कळाल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्यास सोडवले. 28आणि ह्याच्यावर आरोप आणण्याचे काय कारण होते हे समजून घेण्याच्या इच्छेने त्यास त्यांच्या न्यायसभेत खाली नेले. 29तेव्हा त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टींसंबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा बंधनाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला दिसून आले. 30या मनुष्या विरुद्ध कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्यास आपल्याकडे पाठवले आहे, वादींनाही आपल्यासमोर खटला चालवण्यास सांगितले आहे, सुखरूप असावे.”
31शिपायांनी हुकुमाप्रमाणे पौलाला रात्री अंतिपत्रिसास नेले. 32आणि दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर जाण्यास स्वार ठेवून ते गढीत परत आले. 33कैसरीयात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलाला त्याच्यापुढे उभे केले. 34पत्र वाचून त्याने विचारले, हा कोणत्या प्रांताचा आहे; तो किलीकीयाचा आहे समजल्यावर, 35त्याने म्हटले, “तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन.” आणि ‘त्याला हेरोदाच्या राजवाड्यात ठेवावे’ असा त्याने हुकुम सोडला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in