YouVersion Logo
Search Icon

1 शमु. 4

4
पलिष्टी कोश हस्तगत करतात
1आणि, शमुवेलाचा शब्द सर्व इस्राएलांकडे आला. आता इस्राएल पलिष्ट्यांशी लढायला गेले आणि त्यांनी एबन-एजराजवळ तळ दिला व पलिष्ट्यांनी अफेक येथे तळ दिला. 2पलिष्ट्यांनी इस्राएलाविरूद्ध लढाई केली; आणि लढाई पसरल्यावर इस्राएल पलिष्ट्यापुढे पराजित झाले; आणि त्यांनी रणांगणात सुमारे चार हजार पुरूष मारले. 3मग लोक छावणीत आल्यावर, इस्राएलांचे वडील म्हणाले, “आज परमेश्वराने आम्हांस पलिष्ट्यांच्यापुढे पराजित का केले? आपण परमेश्वराचा साक्षपटाचा कोश शिलोहून आपल्याकडे आणू, अशासाठी की त्याने येथे आम्हाबरोबर येऊन आमच्या शत्रूच्या सामर्थ्यापासून आम्हास सुरक्षित ठेवावे.” 4मग लोकांनी शिलोकडे माणसे पाठवली, आणि करुबाच्या वर राहणारा सैन्यांचा परमेश्वर याच्या साक्षपटाचा कोश तेथून आणला आणि तेथे एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराच्या कराराच्या कोशाबरोबर होते. 5परमेश्वराच्या कराराचा कोश छावणीत आला, तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी असा मोठा जल्लोश केला की, भूमिही दणाणली. 6तेव्हा पलिष्टी या मोठ्या ओरडण्याचा आवाज ऐकून म्हणाले, “इब्र्यांच्या छावणीत हा मोठा पुकारा कशाचा असेल?” मग त्यांना कळले की, परमेश्वराचा कोश छावणीत आला आहे. 7तेव्हा पलिष्टी घाबरले, कारण ते म्हणाले, “परमेश्वर छावणीत आला आहे आम्हास हायहाय! कारण असे कधी पूर्वी घडले नाही. 8आम्हास हायहाय! या समर्थ देवांच्या पराक्रमी हातातून आम्हास कोण सोडवील? ज्यांने मिसऱ्यांना रानांत सर्व वेगळ्याप्रकारच्या पीडांनी मारले तो परमेश्वर हाच आहे. 9अहो पलिष्ट्यांनो धैर्य धरा, व शूर व्हा; जसे इब्री तुमचे दास झाले तसे तुम्ही त्यांचे दास होऊ नये म्हणून शूर होऊन लढा.” 10पलिष्टी लढले, आणि तेव्हा इस्राएलांचा पराभव झाला. ते प्रत्येकजण आपापल्या घराकडे पळून गेले व फार खूप मोठी हानी झाली कारण इस्राएलांचे तीस हजार पायदळ सैन्य मारले गेले. 11आणि त्यांनी देवाचा कोश घेतला आणि एलीचे दोन मुले हफनी व फिनहास हे मरण पावले. 12त्यादिवशी एक बन्यामिनी पुरुष आपली वस्त्रे फाडून आपल्या मस्तकावर धूळ घालून सैन्यांतून शिलो येथे धावत आला. 13आणि तो आला तेव्हा पाहा एली रस्त्याच्या बाजूला आपल्या आसनावर बसून वाट पाहत होता कारण देवाच्या कोशाकरिता काळजीने त्याचे मन कांपत होते; आणि त्या मनुष्याने नगरात येऊन ते वर्तमान सांगितले तेव्हा सर्व नगर मोठ्याने ओरडू लागले. 14आणि एलीने ओरडण्याचा आवाज ऐकून म्हटले, “हा गोंगाटाचा शब्द काय आहे?” मग त्या मनुष्याने उतावळीने येऊन एलीला सांगितले. 15तेव्हा एली अठ्ठ्याण्णव वर्षाचा होता आणि त्याचे डोळे मंद झाल्याने त्यास दिसत नव्हते? 16आणि तो पुरुष एलीला म्हणाला, “मी सैन्यातून पळून आलो.” मग हा म्हणाला, “माझ्या मुला काय झाले आहे?” 17तेव्हा ज्याने वर्तमान आणले होते, त्याने उत्तर देऊन म्हटले, “इस्राएल पलिष्ट्यापुढून पळाले व लोकांचा मोठा वध झाला आणि तुझे दोघे पुत्र हफनी व फिनहास हे मरण पावले आणि देवाचा कोश शत्रूने पळवून नेलेला आहे.” 18आणि असे झाले की, त्याने देवाच्या कोशाचा उल्लेख केला, इतक्यात हा आपल्या आसनावरून दाराच्या बाजूला मागे पडला. तो म्हातारा व जाड पुरुष असल्याने त्याची मान मोडून तो मेला. त्याने चाळीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला होता. 19तेव्हा त्याची सून फिनहासाची पत्नी गरोदर होती ती प्रसूत होणार होती; देवाचा कोश नेलेला आहे व आपला सासरा व आपला पती हे मरण पावले आहेत असे वर्तमान ऐकताच ती लवून प्रसूत झाली कारण तिला कळा लागल्या होत्या. 20आणि तिच्या मरणाच्या वेळेस ज्या बाया तिच्याजवळ उभ्या होत्या त्यांनी तिला म्हटले, “भिऊ नको, कारण तू पुत्राला जन्म दिला आहे.” परंतु तिने उत्तर केले नाही व लक्ष दिले नाही. 21तिने मुलाचे नांव ईखाबोद असे ठेवून म्हटले की, “इस्राएलापासून वैभव निघून गेले आहे!” कारण देवाचा कोश पळवून नेलेला होता, आणि तिचा सासरा व तिचा पती हे मरण पावले होते. 22आणि ती म्हणाली, “इस्राएलापासून वैभव गेले आहे, कारण देवाचा कोश नेलेला आहे.”

Currently Selected:

1 शमु. 4: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in