YouVersion Logo
Search Icon

1 शमु. 22

22
1मग दावीद तेथून निघून अदुल्लाम गुहेत पळून गेला त्याचे भाऊ व त्याच्या बापाचे घरचे सर्व हे ऐकून तेथे खाली त्याच्याकडे गेले. 2कोणी अडचणीत पडलेले कोणी कर्जदार व कोणी त्रासलेले असे सर्व त्याच्याकडे एकत्र मिळाले आणि तो त्यांचा सरदार झाला; सुमारे चारशे माणसे त्याच्याजवळ होती. 3दावीद तेथून मवाबातील मिस्पा येथे जाऊन मवाबाच्या राजाला म्हणाला, “मी तुला विनंती करतो परमेश्वर माझ्यासाठी काय करील हे मला कळेल तोपर्यंत माझ्या आई-वडीलांना तुझ्याजवळ येऊन राहू दे.” 4मग त्याने त्यांना मवाबाच्या राजाकडे आणले आणि दावीद गडात वस्तीस होता तोपर्यंत ते त्याच्याजवळ राहिले. 5मग गाद भविष्यवादी दावीदाला म्हणाला, “गडात राहू नको तर तू निघून यहूदा देशात जा.” तेव्हा दावीद निघून हरेथ रानात आला.
नोब येथील याजकांचा शौल वध करतो
6दावीद व त्याच्याबरोबरची माणसे यांचा शोध लागला असे शौलाने ऐकले. शौल तर रामातल्या गिब्यात एशेल झाडाखाली बसला होता; त्याचा भाला त्याच्या हातात होता व त्याचे सर्व चाकर उभे होते. 7तेव्हा शौल आपल्याजवळ जे आपले चाकर उभे होते त्यांना म्हणाला, “अहो बन्यामिनी लोकांनो ऐका हा इशायाचा मुलगा तुम्हा प्रत्येकाला शेते व द्राक्षमळे देणार आहे काय? तो तुम्हा सर्वांना हजाराचे व शंभराचे सरदार करणार आहे काय? 8म्हणून तुम्ही सगळे माझ्यावर फितुरी करीत आहा आणि माझा मुलगा इशायाच्या मुलाशी करार करतो तेव्हा मला कोणी कळवीत नाही आणि तुम्हातला कोणी माझ्यासाठी दुखीत होत नाही आणि माझ्या मुलाने माझ्या चाकराला आजच्यासारखे माझ्यासाठी टपून बसायला चेतवले आहे हे कोणी मला कळवीत नाही.” 9मग दवेग अदोमी जो शौलाच्या चाकरांसोबत उभा होता, त्याने उत्तर देऊन म्हटले, “मी इशायाच्या मुलाला नोब येथे अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याच्याकडे येताना पाहिले; 10त्याने त्याच्यासाठी परमेश्वरास विचारले व त्यास अन्न दिले आणि गल्याथ पलिष्टी याची तलवार त्यास दिली.” 11तेव्हा राजाने अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याजक याला व त्याच्या वडिलाच्या सर्व घराण्यातले जे याजक नोब येथे होते त्यांना बोलवायला माणसे पाठवली आणि ते सर्व राजाकडे आले. 12तेव्हा शौलाने म्हटले, “अहीटूबाच्या मुला आता ऐक.” तो म्हणाला, “माझ्या प्रभू मी येथे आहे.” 13शौल त्यास म्हणाला, “तू आणि इशायाचा मुलगा अशा तुम्ही दोघांनी माझ्यावर फितुरी केली तू त्यास भाकर व तलवार दिली आणि त्याच्यासाठी देवापाशी विचारले यासाठी की, त्याने आजच्यासारखे माझ्यावर उठून माझ्यासाठी टपून बसावे?” 14तेव्हा अहीमलेखाने राजाला उत्तर देऊन म्हटले, “तुझ्या सर्व चाकरांमध्ये दावीदासारखा कोण विश्वासू आहे? तो राजाचा जावई आहे व एकांती तुझ्याजवळ मसलतीला येत असतो व तुझ्या घरात प्रतिष्ठीत आहे. 15आजच मी त्याच्यासाठी परमेश्वरास विचारू लागलो काय? असे करणे माझ्यापासून दूर असो; राजाने आपल्या दासास किंवा माझ्या वडिलाच्या घराण्यातील कोणाला अपराध लावू नये कारण या सर्वांतले अधिक उणे काहीच तुझ्या दासास ठाऊक नाही.” 16राजा म्हणाला, “अहीमलेखा, तुला खचित मरण पावले पाहिजे; तुला व तुझ्या वडिलाच्या घराण्यातील सर्वांना मरण पावले पाहिजे” 17मग राजा आपणाजवळ जे शिपाई उभे होते त्यांना म्हणाला, “परमेश्वराच्या याजकांच्या अंगावर जाऊन त्यांना मारा कारण त्यांनीही दावीदाचा पक्ष धरला आहे; आणि तो पळाला असे त्यांना कळले असता त्यांनी मला कळवले नाही.” परंतु राजाचे चाकर परमेश्वराच्या याजकांवर तुटून पडायला आपले हात पुढे करीनात. 18मग राजाने दवेगाला म्हटले, “तू याजकांच्या अंगावर चालून जा. तेव्हा दवेग अदोमी याजकांच्या अंगावर जाऊन तुटून पडला.” त्या दिवशी त्याने तागाचे एफोद नेसलेल्या पंच्याऐंशी मनुष्यांना जिवे मारले. 19त्याने याजकांचे नोब नगर याचा तलवारीच्या धारेने नाश केला; पुरुष स्त्रिया बालके व तान्ही बाळे, आणि गुरे, आणि गाढवे आणि मेंढरे ही त्याने तलवारीच्या धारेने जिवे मारली. 20तेव्हा अहीटूबाचा मुलगा अहीमलेख याचा अब्याथार नांवाचा एक मुलगा सुटून दावीदाकडे पळून गेला. 21शौलाने परमेश्वराच्या याजकांना जिवे मारले हे अब्याथाराने दावीदाला कळवले. 22तेव्हा दावीदाने अब्याथाराला म्हटले, “दवेग अदोमी येथे होता, त्याच दिवशी मला समजले की, तो शौलाला खचित सांगेल. मी तुझ्या वडिलाच्या घराण्याच्या सर्व मनुष्यांस मरणास कारण झालो आहे. 23माझ्याजवळ राहा भिऊ नको; कारण जो मला जिवे मारायला पाहतो तोच तुला जिवे मारायला पाहतो आहे. पण माझ्याजवळ तुझे रक्षण होईल.”

Currently Selected:

1 शमु. 22: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in