YouVersion Logo
Search Icon

1 करिं. 9

9
आपल्या स्वतःच्या हक्कांवर पाणी सोडून पौलाने घालून दिलेले उदाहरण
1मी स्वतंत्र नाही काय? मी प्रेषित नाही काय? मी आपल्या प्रभू येशूला पाहिले नाही काय? प्रभूच्या ठायी तुम्ही माझे काम आहात ना? 2जरी मी इतरांकरता प्रेषित नसलो, तरी निःसंशय मी तुमच्याकरता आहे कारण तुम्ही प्रभूमध्ये माझ्या प्रेषितपणाचा शिक्का आहात. 3माझी चौकशी करणार्‍यांना हे माझे प्रत्युत्तर आहे: 4आम्हास खाण्यापिण्याचा अधिकार नाही काय? 5इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ किंवा केफा, हे करतात त्याप्रमाणे आम्हास कोणी विश्वासी बहीण पत्नी करून घेऊन, बरोबर नेण्याचा अधिकार नाही काय? 6किंवा केवळ मला आणि बर्णबाला काम न करण्याचा अधिकार नाही काय? 7स्वतःच्या खर्चाने सैनिक म्हणून सेवा करणारा असा कोण आहे? कोण द्राक्षमळा लावतो आणि त्याचे फळ खात नाही? किंवा कोण कळप राखतो आणि कळपाच्या दुधातून पीत नाही? 8मी या गोष्टी लोकरीतीस अनुसरून सांगतो काय? नियमशास्त्र हेच सांगत नाही काय? 9कारण, मोशेच्या नियमशास्त्रात लिहिले आहे की, ‘मळणी करीत असलेल्या बैलाला मुसके घालू नको.’ देव केवळ बैलांची काळजी करतो काय? 10किंवा सर्वस्वी आपल्याकरता तो हे म्हणतो? हे निःसंशय आपल्याकरता लिहिले आहे म्हणजे जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करतो त्याने आपण वाटेकरी होऊ या आशेने करावी. 11आम्ही तुमच्यात जर आत्मिक गोष्टी पेरल्या आहेत, तर आम्ही तुमच्या दैहिक गोष्टींची कापणी केल्यास त्यामध्ये मोठे काय आहे? 12जर दुसरे तुमच्यावरील या अधिकाराचे वाटेकरी होतात, तर आम्ही विशेषेकरून का होऊ नये? आणि तरी आम्ही या अधिकाराचा उपयोग केला नाही, पण ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला आम्ही अडखळण करू नये म्हणून, आम्ही सर्व गोष्टी सहन करतो. 13जे निवास्थानाचा भवनातील पवित्र वस्तूंची सेवा करतात ते भवनातील अन्न खातात आणि जे वेदीपुढे उभे राहतात ते वेदीचे भागीदार होतात, हे तुम्ही जाणत नाही काय? 14प्रभूने त्याचप्रमाणे आज्ञा दिली आहे की, जे शुभवर्तमानाची घोषणा करतात त्यांचा शुभवर्तमानावर निर्वाह व्हावा, 15पण ह्यातील कोणत्याच गोष्टीचा मी कधी उपयोग केला नाही किंवा माझ्यासाठी तसे करावे म्हणून मी या गोष्टी लिहिल्या नाहीत कारण हे माझे अभिमान मिरवणे कोणी निरर्थक करण्यापेक्षा मला मरणे बरे वाटेल. 16कारण जरी मी शुभवर्तमान सांगतो, तरी अभिमान मिरवण्यास मला कारण नाही कारण मला हे करणे भाग आहे; मी शुभवर्तमान सांगणार नाही, तर मला हाय. 17कारण, मी हे स्वेच्छेने केले, तर मला वेतन मिळेल, पण माझ्या इच्छेविरुद्ध असेल, तर माझ्यावर हा कारभार सोपविला गेला आहे. 18तर मग माझे वेतन काय? एवढेच की, मी शुभवर्तमान सांगताना, ते फुकट सांगावे आणि शुभवर्तमानाविषयीच्या माझ्या अधिकाराचा मी दुरुपयोग करू नये.
लोकांस प्राप्त करून घेण्याच्या कामी त्याची आस्था
19कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असलो तरी अधिक लोक मिळवावेत म्हणून मी सर्वाचा दास झालो. 20मी यहूद्यांना मिळविण्यास, यहूद्यांना यहुद्यांसारखा झालो; मी नियमशास्त्राधीन नसलो तरी मी नियमशास्त्राधीन असलेले मिळविण्यास, नियमशास्त्राधीन असल्यासारखा झालो. 21(मी देवाच्या नियमाबाहेर नाही, पण ख्रिस्ताच्या नियमाखाली असल्यामुळे) मी नियमशास्त्राधीन नसलेले मिळविण्यास, नियमशास्त्राधीन नसलेल्यांना नियमशास्त्राधीन नसल्यासारखा झालो. 22आणि मी दुर्बळ असलेले मिळविण्यास, दुर्बळांना दुर्बळासारखा झालो. मी सर्वांना सर्व झालो आहे, म्हणजे सर्वकाही करून मी कित्येकांचे तारण करावे. 23आणि मी हे सर्वकाही शुभवर्तमानाकरीता करतो, म्हणजे मीही तिच्यात सहभागी व्हावे.
विजयाला अवश्य असा प्रयत्न
24शर्यतीत धावणारे सगळेच धावतात पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून असे धावा की, ते तुम्ही मिळवाल. 25स्पर्धेसाठी मेहनत करणारा प्रत्येक मनुष्य प्रत्येक गोष्टीत संयमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी करतात, पण आपण अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करतो. 26म्हणून तसा मी धावतो, निरर्थक नाही, मी तसे मुष्टिप्रहार करतो, हवेवर प्रहार करणार्‍यासारखे नाही. 27पण मी माझे शरीर दाबाखाली दास्यात ठेवतो; नाही तर, दुसर्‍यांना घोषणा केल्यावर मी स्वतः, काही कारणाने, कसोटीस न उतरलेला होईन.

Currently Selected:

1 करिं. 9: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in