YouVersion Logo
Search Icon

जखर्‍या 12

12
यरुशलेमेचा भावी उद्धार
1इस्राएलाविषयी परमेश्वराची वाणी : आकाश पसरणारा, पृथ्वीचा पाया घालणारा व मनुष्याच्या अंतर्यामी आत्मा निर्माण करणारा परमेश्वर म्हणतो :
2“पाहा, मी यरुशलेमेस तिच्या सभोवतालच्या सर्व राष्ट्रांना भेलकंडवणार्‍या कटोर्‍यासारखे करतो; यरुशलेमेला घेरतील तेव्हा यहूदाचीही तीच गत होईल.1
3त्या दिवशी असे होईल की सर्व राष्ट्रांना भारी होईल अशा पाषाणासारखे मी यरुशलेमेस करीन; जे कोणी तो उचलतील ते स्वतःला जखम करून घेतील; पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तिच्याविरुद्ध जमतील.
4परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी मी प्रत्येक घोड्यास बुजवीन व त्यावरील स्वारास वेडे करीन; मी आपले डोळे उघडून यहूदाच्या घराण्याकडे पाहीन व राष्ट्रांच्या प्रत्येक घोड्यास अंधत्व आणीन.
5तेव्हा यहूदाचे सरदार आपल्या मनात म्हणतील की, ‘यरुशलेमेचे रहिवासी आपला देव सेनाधीश परमेश्वर ह्याच्या योगे मला पाठबळासारखे आहेत.’
6त्या दिवशी मी यहूदाच्या सरदारांना लाकडाखालच्या आगटीसारखे, पेंढ्याखालच्या जळत्या मशालीसारखे करीन; ते उजवीकडील व डावीकडील सभोवतालच्या सर्व राष्ट्रांना खाऊन टाकतील; यरुशलेम आपल्या पूर्वीच्या जागी म्हणजे यरुशलेमेच्या जागी पुन्हा वसेल.
7परमेश्वर प्रथम यहूदाचे डेरे वाचवील, म्हणजे दाविदाच्या घराण्याचे वैभव आणि यरुशलेमनिवासी जनांचे वैभव यहूदावर वरचढ व्हायचे नाही.
8त्या दिवशी परमेश्वर यरुशलेमनिवाशांचे रक्षण करील; त्या दिवशी त्यांच्यातला निर्बल दाविदासमान होईल; व दाविदाचे घराणे देवासमान म्हणजे अर्थात त्यांच्या अग्रगामी परमेश्वराच्या दिव्यदूतासमान होईल.
9त्या दिवशी असे होईल की, यरुशलेमेवर चढाई करून येणार्‍या सर्व राष्ट्रांचा नाश करण्याची मी खटपट करीन;
10आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरुशलेमेच्या रहिवाशांवर कृपा व विनवणी ह्यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि ज्या मला त्यांनी विंधले त्या माझ्याकडे2 ते पाहतील; एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्याच्यासाठी शोक करतील; ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करतो तसा ते त्याबद्दल खेद करतील.
11त्या दिवशी मगिद्दोनाच्या खोर्‍यातील हदाद्रीमोनाच्या आकांताप्रमाणे यरुशलेमेत मोठा आकांत होईल.
12देश आक्रंदन करील, प्रत्येक कुटुंब वेगवेगळे आक्रंदन करील; इकडे दाविदाचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग; इकडे नाथानाचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग;
13इकडे लेवीचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग; इकडे शिमीचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग;
14उरलेल्या सर्व घराण्यांतले लोक वेगळे व त्यांचा स्त्रीवर्ग वेगळा असे ते आक्रंदन करतील.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for जखर्‍या 12