रोमकरांस पत्र 9
9
इस्राएली लोकांच्या अविश्वासाबद्दल पौलाचे दु:ख
1मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही; माझी सदसद्विवेकबुद्धीही पवित्र आत्म्यामध्ये माझ्याबरोबर साक्ष देते की,
2मला मोठा खेद वाटतो व माझ्या अंत:करणामध्ये अखंड वेदना आहेत.
3कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती.
4ते इस्राएली आहेत; दत्तकपणा, ईश्वरी तेज, करारमदार, नियमशास्त्रदान, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत;
5महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे, तो सर्वांवर असून युगानुयुग धन्यवादित देव आहे; आमेन.
देवाने दिलेली वचने व्यर्थ झाली नाहीत
6तरी देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही; कारण इस्राएल वंशातले ते सर्व इस्राएल आहेत असे नाही.
7आणि ते अब्राहामाचे संतान आहेत म्हणून ते सर्व त्याची मुले आहेत असे नाही, तर “इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील.”
8म्हणजे देहाद्वारे झालेली मुले देवाची मुले आहेत असे नाही तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात.
9कारण, “पुढे ह्याच सुमारास मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल,” ह्या शब्दांत ते अभिवचन दिलेले होते.
10इतकेच नव्हे, तर रिबकाही एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून गरोदर राहिल्यावर,
11मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरेवाईट केले नव्हते, तेव्हा निवडीसंबंधाने देवाचा जो संकल्प असतो, म्हणजे जो कर्मांमुळे नव्हे, तर पाचारण करणार्याच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा,
12म्हणून तिला सांगण्यात आले की, “वडील धाकट्याची सेवा करील.”
13त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की, “मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला.”
देव अन्यायी नाही
14तर आपण काय म्हणावे? देवाच्या ठायी अन्याय आहे काय? कधीच नाही!
15कारण तो मोशेला म्हणतो, “ज्या कोणावर मी दया करतो त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा करतो त्याच्यावर मी करुणा करीन.”
16ह्यावरून हे इच्छा बाळगणार्यावर नव्हे किंवा धावपळ करणार्यावर नव्हे, तर दया करणार्या देवावर अवलंबून आहे.
17शास्त्रलेख फारोला असे सांगतो, “मी तुला पुढे केले आहे ते ह्याचकरता की, तुझ्याकडून मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे.”
18ह्यावरून त्याच्या इच्छेस येईल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याच्या इच्छेस येईल त्याला तो ‘कठीण हृदयाचे करतो.’
देव सर्वाधिपती आहे
19ह्यावर तू मला म्हणशील, तर मग तो अजून दोष का लावत असतो? कारण त्याच्या संकल्पाला कोण आड आला आहे?
20हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडवणार्याला, “तू मला असे का केलेस,” असे म्हणेल काय?
21किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय?
22आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले,
23,24आणि ज्या आपल्याला केवळ यहूद्यांतून नव्हे तर परराष्ट्रीयांतूनही पाचारण झाले, त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी असे त्याला वाटत असले, तर काय?
25तो होशेयाच्या पुस्तकात हेही म्हणतो की,
“जे माझे लोक नव्हत
त्यांना मी आपले लोक म्हणेन,
आणि जी प्रिय नाही तिला ‘माझी प्रिय’ म्हणेन.”
26“आणि असे होईल की, ‘तुम्ही माझे लोक नाही’
असे जेथे म्हटले होते तेथे त्यांना
‘जिवंत देवाचे पुत्र’ असे म्हणण्यात येईल.”
27यशयाही इस्राएलाविषयी असे पुकारतो की,
“जरी इस्राएल लोकांची संख्या
समुद्राच्या वाळूसारखी असली,
तरी अवशेष मात्र तारण पावेल;
28कारण प्रभू आपले न्यायाचे वचन आटोपते घेऊन
व समाप्त करून पृथ्वीवर ते सिद्धीस नेईल.”
29त्याप्रमाणे यशयाने पूर्वी म्हटले,
“जर सेनाधीश प्रभूने आमच्यासाठी
बीज राहू दिले नसते,
तर आम्ही सदोमासारखे झालो असतो,
व गमोराप्रमाणे बनलो असतो.”
नीतिमत्त्व प्राप्त न होण्याचे कारण
30तर मग आपण काय म्हणावे? असे की, जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नव्हते त्यांना नीतिमत्त्व म्हणजे विश्वासाच्या द्वारे मिळणारे नीतिमत्त्व प्राप्त झाले.
31परंतु इस्राएल लोक नीतिमत्त्वाच्या नियमामागे लागले होते तरी ते त्या नियमापर्यंत जाऊन पोहचले नाहीत.
32का नाहीत? कारण विश्वासाने नव्हे तर कर्मांनी कार्य होईल असे समजून ते त्याच्यामागे लागले. ‘अडवणुकीच्या धोंड्यावर’ ते ठेचाळले;
33त्याप्रमाणे शास्त्रात लिहिले आहे,
“पाहा, अडवणुकीचा धोंडा व अडखळण्याचा खडक
मी सीयोनात ठेवतो; त्याच्यावर जो विश्वास ठेवील
तो फजीत होणार नाही.”
Currently Selected:
रोमकरांस पत्र 9: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.