YouVersion Logo
Search Icon

रोमकरांस पत्र 5

5
विश्वासाचे परिणाम
1ह्यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे.
2आपण ज्या कृपेमध्ये आहोत, तिच्यात आपला प्रवेशही त्याच्या द्वारे विश्वासाने झाला आहे; आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो.
3इतकेच नाही, तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर,
4धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते;
5आणि ‘आशा लाजवत नाही;’ कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.
ख्रिस्ताच्या मृत्यूने प्रकट झालेली देवाची प्रीती
6आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला.
7नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा; चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील;
8परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला.
9तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेषेकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत.
10कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने आपण विशेषेकरून तारले जाणार आहोत;
11इतकेच केवळ नाही, तर ज्याच्या द्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान बाळगतो.
आदामाकडून मृत्यू, ख्रिस्ताकडून जीवन
12एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.
13कारण नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच; पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही.
14तथापि, आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही त्याने राज्य केले; आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे.
15परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही; कारण ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरता विशेषेकरून विपुल झाली.
16आणि पाप केलेल्या एकाच मनुष्याच्या द्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही; कारण ज्याचा परिणाम दंडाज्ञा तो न्याय एकाच मनुष्यापासून झाला, पण ज्याचा परिणाम नीतिमान ठरणे ते कृपादान पुष्कळ अपराधांपासून झाले.
17कारण जर त्या एकाच इसमाच्या द्वारे, त्या एकाच इसमाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्त्वाचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात, ते विशेषेकरून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील.
18तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्त्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते.
19कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील.
20शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला; तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली.
21अशासाठी की, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या द्वारे राज्य करावे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in