रोमकरांस पत्र 13
13
अधिकार्यांच्या आज्ञा पाळण्याविषयी सूचना
1प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकार्यांच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही; जे अधिकारी आहेत ते देवाने नेमलेले आहेत.
2म्हणून जो अधिकाराला आड येतो, तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो; आणि आड येणारे आपणांवर दंड ओढवून घेतील.
3कारण चांगल्या कामाला अधिकार्यांची भीती असते असे नाही, तर वाईट कामाला असते. तेव्हा अधिकार्याची भीती नसावी अशी तुझी इच्छा असल्यास चांगले ते कर म्हणजे त्याच्याकडून तुझी प्रशंसा होईल;
4कारण तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. पण जर तू वाईट करशील तर त्याची भीती बाळग; कारण तो तलवार व्यर्थ धारण करत नाही; तर क्रोध दाखवण्याकरता वाईट करणार्याचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे.
5म्हणून क्रोधामुळे केवळ नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळेही अधीन राहणे अगत्याचे आहे.
6ह्या कारणास्तव तुम्ही करही देता; कारण अधिकारी देवाची सेवा करणारे आहेत व ते ह्याच सेवेत तत्पर असतात.
7ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या; ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या; ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या; ज्याचा धाक धरायचा त्याचा धाक धरा व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा.
बंधुप्रेम
8एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका; कारण जो दुसर्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे.
9कारण “व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, लोभ धरू नकोस,” ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश, “जशी आपणावर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” ह्या वचनात आहे.
10प्रीती शेजार्याचे काही वाईट करत नाही म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय.
ख्रिस्तदिनाचे आगमन
11समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे; कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे.
12रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे; म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावीत आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी.
13दिवसाढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे.
14तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा, आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका.
Currently Selected:
रोमकरांस पत्र 13: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.