रोमकरांस पत्र 11
11
देवाने इस्राएली लोकांचा सर्वस्वी त्याग केला नाही
1तर मी विचारतो, ‘देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय?’ कधीच नाही! कारण मीही इस्राएली, अब्राहामाच्या कुळातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे.
2देवाला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ‘त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही.’ एलीयाच्या बाबतीत शास्त्र काय म्हणते हे तुम्हांला ठाऊक नाही काय? इस्राएलाविरुद्ध देवाजवळ त्याने अशी विनंती केली की,
3“हे प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना जिवे मारले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या; आणि मी एकटाच राहिलो आहे आणि माझा प्राण घेण्यास ते पाहतात.”
4परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? “ज्यांनी बआल दैवतापुढे गुडघे टेकले नाहीत अशी सात हजार माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत.”
5तसेच हल्लीच्या काळीसुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे;
6आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मांनी नाही; नाहीतर कृपा ही कृपा असणार नाही. [पण जर ते कर्माने असेल तर मग कृपा नाही, असली तर कर्म हे मग कर्म नाही.]
7तर मग काय? जे मिळवण्यासाठी इस्राएल जोराचा प्रयत्न करत आहे ते त्याला मिळाले नाही; पण निवडलेल्या लोकांना मिळाले; आणि बाकीचे कोडगे झाले.
8“आजच्या दिवसापर्यंत देवाने त्यांना मंद बुद्धी,
पाहता येऊ नये असे डोळे, व ऐकता येऊ नये
असे कान दिले,” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे झाले.
9दावीदही म्हणतो,
“त्यांचे मेज त्यांना फास व सापळा, अडखळण
व प्रतिफळ असे होवो.
10त्यांना दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय
होवोत, आणि तू त्यांची पाठ नेहमी वाकव.”
11तर मी विचारतो, त्यांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? कधीच नाही! तर त्यांच्या ठायी ‘ईर्ष्या निर्माण होण्यासाठी’ त्यांच्या अपराधाने परराष्ट्रीयांचे तारण झाले आहे.
12आता त्यांचा अपराध ही जर जगाची संपत्ती आणि त्यांचा र्हास ही जर परराष्ट्रीयांची सधनता आहे, तर त्यांची भरती झाल्यास ती सधनता कितीतरी अधिक होईल!
परराष्ट्रीयांचे तारण : कलम लावण्याचे उदाहरण
13पण आता तुम्हा परराष्ट्रीयांना मी हे सांगतो. ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो;
14ह्यात माझा उद्देश हा की, जे माझ्या हाडामांसाचे आहेत त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करून त्यांच्यातील कित्येकांना तारावे.
15कारण त्यांचा अव्हेर हा जर जगाचा समेट ठरतो तर त्यांचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यांतून जिवंत होणे ठरणार ना?
16कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील.
17आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्यांच्या जागी कलमरूपे लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास,
18तर त्या फांद्यांहून मी मोठा आहे अशी बढाई मारू नकोस. मारशील तर हे लक्षात ठेव की, तू मुळाला आधार दिलेला नाहीस, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे.
19मग तू म्हणशील की, “माझे कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकण्यात आल्या.”
20बरे, अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली, तर अहंकार बाळगू नकोस, भीती बाळग;
21कारण जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाहीत तर तो तुलाही राखणार नाही.
22देवाची ममता व कडकपणा पाहा; पतन झालेल्यांविषयी कडकपणा आणि तुझ्याविषयी देवाची ममता; पण तू त्याच्या ममतेत राहशील तर; नाहीतर तूही छेदून टाकला जाशील.
23आणि ते अविश्वासात न राहिले तर तेही कलमरूपे लावण्यात येतील; कारण त्यांचे पुन्हा कलम लावण्यास देव समर्थ आहे.
24जे मूळचे रानटी जैतुनाचे झाड त्यातून तुला कापून तुझे कलम सृष्टिक्रम सोडून चांगल्या जैतुनात लावले, तर ह्या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या त्यांचे कलम आपल्या जैतुनात किती विशेषेकरून लावण्यात येईल?
सर्वांवर ममता करणे हाच देवाचा अंतिम हेतू
25बंधुजनहो, तुम्ही आपणांला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की, परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएल लोक अंशत: कोडगे झालेले आहेत;
26ह्या रीतीने सर्व इस्राएल लोकांचे तारण होईल; शास्त्रात असे लिहिलेले आहे,
“मुक्त करणारा सीयोनेतून येईल;
तो याकोबापासून अभक्ती दूर करील;”
27“जेव्हा मी त्यांची पापे हरण करीन,
तेव्हा त्यांच्याबरोबर हाच माझा करार होईल.”
28सुवार्तेच्या दृष्टीने पाहता तुमच्यामुळे ते शत्रू आहेत; परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजांमुळे प्रियजन आहेत.
29कारण देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारणाचा अनुताप होत नाही.
30ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हांला त्यांच्या आज्ञाभंगाने दया प्राप्त झाली आहे,
31त्याप्रमाणे तुमच्यावरील ममतेने त्यांनाही आता ममता प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे.
32त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोंडवाड्यात कोंडून ठेवले आहे.
33अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!
34“प्रभूचे मन कोणी ओळखले
अथवा त्याचा मंत्री कोण होता?”
35“अथवा त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून
घेईल असा कोण आहे?”
36कारण सर्वकाही त्याच्याचपासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रीत्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
Currently Selected:
रोमकरांस पत्र 11: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.