प्रकटी 7
7
एकशे चव्वेचाळीस हजारांवर शिक्का
1ह्यानंतर मी चार देवदूत ‘पृथ्वीच्या चार कोनांवर’ उभे राहिलेले पाहिले, ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे ‘चार वारे’ अडवून धरत होते.
2मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता; ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपवले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला,
3“आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या ‘कपाळांवर’ आम्ही ‘शिक्का मारीपर्यंत’ पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका.”
4ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली; इस्राएल लोकांच्या सर्व वंशांपैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला.
5यहूदा वंशापैकी बारा हजारांवर
शिक्का मारण्यात आला;
रऊबेन वंशापैकी बारा हजारांवर;
गाद वंशापैकी बारा हजारांवर;
6आशेर वंशापैकी बारा हजारांवर;
नफताली वंशापैकी बारा हजारांवर;
मनश्शे वंशापैकी बारा हजारांवर;
7शिमोन वंशापैकी बारा हजारांवर;
लेवी वंशापैकी बारा हजारांवर;
इस्साखार वंशापैकी बारा हजारांवर;
8जबुलून वंशापैकी बारा हजारांवर;
योसेफ वंशापैकी बारा हजारांवर;
बन्यामिन वंशापैकी बारा हजारांवर
शिक्का मारण्यात आला.
स्वर्गातील उद्धार पावलेल्यांचा साक्षात्कार
9ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हातांत झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकर्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला.
10ते उच्च स्वराने म्हणत होते :
“राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून
व कोकर्याकडून, तारण आहे!”
11तेव्हा राजासन, वडीलमंडळ व चार प्राणी ह्यांच्याभोवती सर्व देवदूत उभे होते, ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले :
12“आमेन; धन्यवाद, गौरव, ज्ञान,
उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ
हे युगानुयुग आमच्या देवाचे आहेत! आमेन.”
13तेव्हा वडीलमंडळापैकी एकाने मला म्हटले, “शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले?”
14मी म्हटले, “प्रभो, हे तुला ठाऊक आहे.” तो मला म्हणाला, “मोठ्या ‘संकटातून’ येतात ते हे आहेत; ह्यांनी ‘आपले झगे’ कोकर्याच्या ‘रक्तात धुऊन’ शुभ्र केले आहेत.
15ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत;
ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात
आणि ‘राजासनावर बसलेला’ त्यांच्यावर
आपला मंडप विस्तृत करील.
16ते ह्यापुढे ‘भुकेले असे होणार नाहीत,
व तान्हेलेही होणार नाहीत;
त्यांना सूर्य किंवा कोणतीही उष्णता
बाधणार नाही.’
17कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा
त्यांचा ‘मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या
पाण्याच्या झर्यांजवळ नेईल; आणि देव त्यांच्या
डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील.”’
Currently Selected:
प्रकटी 7: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.