YouVersion Logo
Search Icon

प्रकटी 4

4
स्वर्गाचा साक्षात्कार
1ह्यानंतर मी पाहिले तो पाहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणार्‍या ‘कर्ण्याच्या’ ध्वनीसारखी होती; ती म्हणाली, “इकडे ‘वर ये’ म्हणजे ‘ज्या गोष्टी’ ह्यानंतर ‘घडून आल्या पाहिजेत’ त्या मी तुला दाखवीन.”
2लगेचच मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा पाहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते, आणि ‘त्या राजासनावर कोणीएक बसलेला होता.’
3जो बसलेला होता तो दिसण्यात यास्फे व सार्दि ह्या रत्नांसारखा होता. ‘राजासनाभोवती’ दिसण्यात पाचूसारखे ‘मेघधनुष्य होते.’
4राजासनाभोवती चोवीस आसने होती; आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यांवर सोन्याचे मुकुट घातलेले चोवीस वडील बसलेले होते.
5राजासनाच्या आतून ‘विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या’ आणि पेटलेल्या सात मशाली राजासनापुडे जळत होत्या; त्या देवाचे सात आत्मे आहेत.
6राजासनापुढे ‘स्फटिकासारखा’ जणू काय काचेचा समुद्र होता; ‘आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या चार बाजूंना’ पुढे व मागे ‘अंगभर डोळे असलेले चार प्राणी’ होते.
7‘पहिला प्राणी सिंहा’सारखा, ‘दुसरा गोर्‍ह्या’सारखा, ‘तिसरा माणसाच्या तोंडा’सारखा व ‘चौथा प्राणी उडत्या गरुडा’सारखा होता.
8त्या चारही प्राण्यांना ‘प्रत्येकी सहा-सहा पंख असून ते प्राणी’ आतून ‘बाहेरून सर्वांगी, डोळ्यांनी भरलेले’ होते; आणि,
“पवित्र, पवित्र, पवित्र, जो होता, ‘जो आहे’
व जो येणार तो ‘सर्वसमर्थ प्रभू देव,”’
असे ते रात्रंदिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाहीत.
9‘राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे’ त्याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्तुती करतात,
10तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील ‘राजासनावर जो बसलेला’ त्याच्या पाया पडतात; जो ‘युगानुयुग जिवंत’ त्याला नमन करतात; आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात,
11“हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य
ह्यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस;
कारण तू सर्वकाही निर्माण केलेस,
तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in