प्रकटी 21
21
नवे आकाश व नवी पृथ्वी
1नंतर मी ‘नवे आकाश व नवी पृथ्वी’ ही पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही.
2तेव्हा मी ‘पवित्र नगरी, नवी यरुशलेम’, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवर्यासाठी ‘शृंगारलेल्या नवरीप्रमाणे’ सजवलेली होती.
3आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी : “‘पाहा,’ देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर ‘देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि’ देव स्वतः ‘त्याच्याबरोबर राहील.’
4‘तो’ त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रू पुसून टाकील;’ ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट हे नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.”
5तेव्हा ‘राजासनावर बसलेला’ म्हणाला, “‘पाहा, मी’ सर्व गोष्टी ‘नवीन करतो.”’ तो म्हणाला, “लिही; कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत.”
6तो मला म्हणाला, “झाले! मी अल्फा व ओमेगा, म्हणजे प्रारंभ व शेवट आहे. मी ‘तान्हेल्याला जीवनाच्या’ झर्याचे ‘पाणी फुकट’ देईन.
7जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील; ‘मी त्याचा देव होईन, आणि तो माझा पुत्र होईल.’
8परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”
स्वर्गीय यरुशलेम
9नंतर शेवटल्या ‘सात पीडांनी’ भरलेल्या सात वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा सात देवदूतांपैकी एक देवदूत येऊन माझ्याबरोबर बोलला; तो म्हणाला, “ये, नवरी म्हणजे कोकर्याची स्त्री मी तुला दाखवतो.”
10तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने ‘मला’ मोठ्या ‘उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम’ देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली.
11तिच्या ठायी ‘देवाचे तेज’ होते; तिची कांती अति मोलवान रत्नासारखी होती; ती स्फटिकाप्रमाणे लखलखणार्या यास्फे खड्यासारखी होती;
12तिला मोठा उंच तट होता; त्याला बारा ‘वेशी’ होत्या, आणि वेशींजवळ बारा देवदूत होते. त्या वेशींवर ‘नावे’ लिहिलेली होती; ती ‘इस्राएलाच्या संतानाच्या’ बारा ‘वंशांची’ होती.
13‘पूर्वेकडे तीन वेशी; उत्तरेकडे तीन वेशी; दक्षिणेकडे तीन वेशी; व पश्चिमेकडे तीन वेशी होत्या.’
14नगरीच्या तटाला बारा पाये होते, त्यांच्यावर कोकर्याच्या बारा प्रेषितांची बारा नावे होती.
15जो माझ्याबरोबर बोलत होता त्याच्याजवळ नगरीचे, तिच्या वेशींचे व तिच्या तटाचे मोजमाप घेण्यासाठी सोन्याचा ‘बोरू’ होता.
16नगरी ‘चौरस’ होती; तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती; त्याने नगरीचे माप बोरूने घेतले. ते सहाशे कोस भरले; तिची लांबी, रुंदी व उंची समान होती.
17मग त्याने त्याच्या ‘तटाचे माप घेतले’ ते माणसाच्या हाताने एकशे चव्वेचाळीस हात भरले; माणसाचा हात म्हणजे देवदूताचा हात.
18तिचा ‘तट यास्फे’ रत्नाचा होता; आणि नगरी शुद्ध काचेसारखी शुद्ध सोनेच होती.
19नगरीच्या तटाचे ‘पाये’ वेगवेगळ्या ‘मूल्यवान रत्नांनी’ शृंगारलेले होते. पहिला पाया यास्फे, दुसरा नीळ, तिसरा शिवधातू, चौथा पाचू,
20पाचवा गोमेद, सहावा सार्दि, सातवा लसणा, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकींथ, बारावा पद्मराग अशा रत्नांचे ते होते.
21बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या; एकेक वेस एकेका मोत्याची होती. नगरीतील मार्ग पारदर्शक काचेसारखा शुद्ध सोनेच होता.
22त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव व कोकरा हेच तिचे मंदिर होते.
23नगरीला ‘सूर्यचंद्राच्या प्रकाशाची’ आवश्यकता नाही; कारण ‘देवाच्या तेजाने’ ती ‘प्रकाशित केली आहे;’ आणि हाच कोकरा तिचा दीप आहे.
24‘राष्ट्रे’1 तिच्या ‘प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे’ आपले ‘वैभव’ व सन्मान तिच्यात आणतात.
25तिच्या ‘वेशी दिवसा बंद होणारच नाहीत; रात्र’ तर तेथे नाहीच.
26‘राष्ट्राचे वैभव’ व प्रतिष्ठा तिच्यात आणतील;
27‘तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी’ आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम ह्यांचा ‘प्रवेश होणारच नाही’ तर कोकर्याच्या ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा’ मात्र होईल.
Currently Selected:
प्रकटी 21: MARVBSI
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.