YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 94

94
दुर्जनाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना
1हे पारिपत्य करणार्‍या देवा, परमेश्वरा, हे पारिपत्य करणार्‍या देवा, तू आपले तेज प्रकट कर.
2हे पृथ्वीच्या न्यायाधीशा, ऊठ; गर्विष्ठांना त्यांचे प्रतिफल दे.
3हे परमेश्वरा, दुर्जन कोठवर ― दुर्जन कोठवर जयोत्सव करतील?
4ते बडबड करतात, उद्धटपणे बोलतात, सर्व दुष्कर्मी फुशारकी मारतात;
5हे परमेश्वरा, ते तुझ्या लोकांचा चुराडा करतात, तुझ्या वतनाला पिडतात.
6ते विधवा व उपरे ह्यांचा जीव घेतात, अनाथांना ठार मारतात.
7ते म्हणतात, “परमेश पाहत नाही, याकोबाचा देव लक्ष देत नाही.”
8अहो पशुतुल्य लोकहो, लक्ष द्या; मूर्खांनो, तुम्ही कधी शहाणे व्हाल?
9ज्याने कान घडवला तो ऐकणार नाही काय? ज्याने डोळा बनवला तो पाहणार नाही काय?
10जो राष्ट्रांचा शास्ता, मानवांचा ज्ञानदाता, तो शासन करणार नाही काय?
11मानवाचे विचार वायफळ आहेत हे परमेश्वर जाणतो.
12हे परमेशा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस तो धन्य;
13त्याला तू विपत्काली आराम देशील, तोपर्यंत दुर्जनाकरिता खांच खणली जाईल.
14कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही; तो आपले वतन सोडून देणार नाही.
15न्याय नीतिमानाकडे वळेल आणि सरळ मनाचे सर्व जन तो अनुसरतील.
16माझ्यासाठी दुष्कर्म्यांविरुद्ध कोण उठेल? अनीती करणार्‍यांविरुद्ध माझ्यासाठी कोण उभा राहील?
17परमेश्वर मला साहाय्य झाला नसता तर माझ्या जिवाची वस्ती नि:शब्दस्थानी केव्हाच झाली असती.
18“माझा पाय घसरला,” असे मी म्हणालो, तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या दयेने मला आधार दिला.
19माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करते.
20न्याय करण्याच्या मिषाने, उपद्रव योजून अन्याय करणार्‍या न्यायासनाचा तुझ्याशी काही संबंध असेल काय?
21ते नीतिमानाच्या जिवावर घाला घालतात, ते निर्दोष्यांस देहान्त शिक्षा देतात;
22पण परमेश्वर मला उंच गडासारखा आहे; माझा देव मला आश्रयाचा दुर्ग आहे.
23तो त्यांची अनीती त्यांच्यावरच उलटवील; त्यांच्या दुष्टपणामुळे तो त्यांना नाहीसे करील; आमचा देव परमेश्वर त्यांना नाहीसे करील.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in