स्तोत्रसंहिता 80
80
इस्राएल लोकांना परत आणण्यासाठी काकळूत
मुख्य गवयासाठी; शोशन्नीम (भूकमले) ह्या चालीवर गायचे आसाफाचे साक्षरूपी स्तोत्र.
1हे इस्राएलाच्या मेंढपाळा, जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवतोस, तो तू कान दे; जो तू करूबारूढ आहेस तो तू आपले तेज प्रकट कर.
2एफ्राईम, बन्यामीन व मनश्शे ह्यांच्यासमक्ष तू आपला पराक्रम दाखव, आणि आम्हांला तारायला ये.
3हे देवा, तू आम्हांला परत आण; आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू.
4हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे लोक प्रार्थना करीत असता तू कोठवर कोपायमान राहणार?
5तू त्यांना अश्रुरूप अन्न खायला दिले आहे आणि त्यांना माप पुरे भरून आसवे प्यायला दिली आहेत.
6तू आम्हांला आमच्या शेजार्यांच्या कलहास कारण करतोस; आणि आमचे वैरी आमचा यथेच्छ उपहास करतात.
7हे सेनाधीश देवा, तू आम्हांला परत आण; तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू.
8मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणला; आणि राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लावला.
9तू त्यासाठी जागा तयार केलीस आणि त्याने मूळ धरून देश व्यापला.
10त्याच्या छायेने पर्वत, आणि त्याच्या फांद्यांनी देवाचे गंधसरू आच्छादित झाले.
11त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले फाटे त्या1 नदीपर्यंत लांबवले.
12त्याची कुंपणे तू का मोडलीस? त्यामुळे वाटेने येणारेजाणारे सगळे त्याची द्राक्षे तोडतात.
13रानडुकर त्याची नासधूस करतो, जीवजंतू त्यावर आपला निर्वाह करतात.
14हे सेनाधीश देवा, तू मागे फीर असे आम्ही तुला विनवतो. स्वर्गातून दृष्टी लावून पाहा व ह्या द्राक्षवेलाचे संगोपन कर;
15जे रोप तू आपल्या उजव्या हाताने लावले, जी शाखा तू स्वतःसाठी मजबूत केली तिचे संगोपन कर.
16ती अग्नीने जळाली आहे, ती तोडलेली आहे; तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे लोक नष्ट होतात.
17तुझ्या उजव्या हाताकडे असलेल्या पुरुषावर, तू आपल्यासाठी बलवान केलेल्या मानवपुत्रावर तुझा हात राहो;
18म्हणजे आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही; आमच्या जिवात जीव आण म्हणजे आम्ही तुझ्या नावाचा धावा करू.
19हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हांला परत आण; तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 80: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.