YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 71

71
वृद्धाची प्रार्थना
1हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे; मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस.
2तू आपल्या न्यायनीतीने माझा उद्धार कर; माझ्याकडे आपला कान लाव व माझे तारण कर;
3मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी निवासाचा खडक हो; माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस. कारण तू तर माझा गड व माझा दुर्ग आहेस.
4हे माझ्या देवा, दुर्जनाच्या हातातून मला मुक्त कर, अन्यायी व निर्दय ह्यांच्या तावडीतून मला मुक्त कर.
5कारण, हे प्रभू, परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहेस; माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस.
6जन्मापासून तूच माझा आधार आहेस; मातेच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याणकर्ता आहेस; मी तुझी स्तुती निरंतर करीन.
7पुष्कळ लोकांना मी आश्‍चर्याचा विषय झालो आहे; तरी तू माझा खंबीर आश्रय आहेस.
8माझ्या मुखात तुझे स्तुतिस्तोत्र सदा राहो; त्यातून दिवसभर गौरवपर शब्द निघोत.
9उतारवयात माझा त्याग करू नकोस; माझी शक्ती क्षीण होत चालली असता मला सोडू नकोस.
10कारण माझे वैरी माझ्याविषयी बोलतात आणि माझ्या जिवावर टपणारे एकत्र मिळून मसलत करतात.
11ते म्हणतात, “देवाने ह्याला सोडले आहे; ह्याच्या पाठीस लागा, ह्याला धरा; कारण ह्याला सोडवणारा कोणी नाही.”
12हे देवा, माझ्यापासून दूर असू नकोस; हे माझ्या देवा, माझ्या साहाय्यासाठी त्वरा कर.
13माझ्या जिवाला अपाय करणारे लज्जित होऊन नष्ट होवोत; माझे अनिष्ट करू पाहणारे निंदेने व अप्रतिष्ठेने व्याप्त होवोत.
14मी तर नित्य आशा धरून राहीन आणि तुझे स्तवन अधिकाधिक करत जाईन.
15माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि तू सिद्ध केलेल्या तारणाच्या कृत्यांचे दिवसभर वर्णन करील; त्यांची संख्या मला कळत नाही.
16प्रभू परमेश्वराच्या महत्कृत्यांचे मी वर्णन करत येईन; तुझ्या, केवळ तुझ्याच, नीतिमत्त्वाचे मी निवेदन करीन.
17हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस; आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णन केली आहेत.
18मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांना तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नकोस.
19हे देवा, तुझे नीतिमत्त्व गगनापर्यंत पोहचले आहे. हे देवा, तू महत्कृत्ये केली आहेत; तुझ्यासारखा कोण आहे?
20तू मला अनेक भारी संकटे भोगायला लावलीस, तरी तू माझे पुनरुज्जीवन करशील, आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील.
21तू माझे महत्त्व वाढव आणि माझ्याकडे वळून माझे सांत्वन कर.
22मी तर सतारीवर तुझे स्तुतिस्तोत्र गाईन, हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन; हे इस्राएलाच्या पवित्र प्रभू, मी वीणेवर तुझी स्तोत्रे गाईन.
23मी तुझी स्तोत्रे गाताना माझे ओठ व तू मुक्त केलेला माझा जीवही आनंदाने गजर करील.
24माझी जीभही दिवसभर तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील; कारण माझे वाईट करू पाहणारे लज्जित व फजीत झाले आहेत.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in