YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 7

7
आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रार्थना
बन्यामिनी कूश ह्याच्या बोलण्यामुळे दाविदाने परमेश्वराला गाइलेले क्षोभस्तोत्र.
1हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा आश्रय केला आहे; माझ्या पाठीस लागणार्‍या सर्वांपासून माझे रक्षण कर, मला सोडव;
2नाहीतर सिंहाप्रमाणे तो मला फाडून टाकील; मला सोडवणारा कोणी नाही म्हणून तो माझे तुकडेतुकडे करील.
3हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी असे काही केले असेल, माझ्या हातून अन्याय घडला असेल,
4माझ्याशी मिळूनमिसळून असणार्‍यांचे मी वाईट केले असेल, (उलट मी तर निष्कारण झालेल्या माझ्या वैर्‍याला सोडवले आहे,)
5तर वैरी माझ्या पाठीस लागो, मला गाठो, माझा जीव मातीत तुडवो, आणि माझा गौरव धुळीस मिळवो.
(सेला)
6हे परमेश्वरा, तू क्रोधाविष्ट होऊन ऊठ; माझे शत्रू संतापले असता त्यांच्याविरुद्ध उभा राहा; माझ्यासाठी जागृत हो. तू न्यायाची योजना केलीच आहेस;
7तुझ्याभोवती लोकांचा समुदाय गोळा होवो. तू त्यांच्यावर उच्च स्थानी आरूढ हो.
8परमेश्वर लोकांचा न्याय करतो; माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे व माझ्या ठायी असलेल्या सात्त्विकतेप्रमाणे, हे परमेश्वरा, माझा न्याय कर.
9दुष्टाची दुष्टाई नष्ट होवो, नीतिमानाला तू खंबीर कर; न्यायी देव मने व अंतःकरणे पारखणारा आहे.
10सरळ मनाच्यांना तारणार्‍या देवाने माझी ढाल धरली आहे.
11देव न्यायी न्यायाधीश आहे; तो प्रतिदिनी रोष दाखवणारा देव आहे.
12कोणी मनुष्य वळला नाही तर त्याच्याविरुद्ध तो आपली तलवार पाजळतो, त्याने धनुष्य वाकवून सज्ज केले आहे.
13त्याच्यासाठी त्याने प्राणघातक शस्त्रे सिद्ध केली आहेत; त्याने आपले अग्निबाण तयार केले आहेत.
14पाहा, तो मनुष्य दुष्कर्माच्या वेणा देतो; उपद्रवाची गर्भधारणा करतो व असत्याला प्रसवतो.
15त्याने खड्डा खणून खोल केला; आणि तोच त्या खड्ड्यात पडला.
16त्याने केलेला उपद्रव त्याच्याच शिरी पडेल; त्याचा जुलूम त्याच्याच माथी येईल.
17परमेश्वराच्या न्यायपरायणतेमुळे मी त्याची स्तुती करीन; परात्पर परमेश्वराच्या नावाचे स्तोत्र गाईन.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for स्तोत्रसंहिता 7