YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 69

69
संकटसमयी केलेली आरोळी
मुख्य गवयासाठी; शोशन्नीम (भूकमले) ह्या चालीवर गायचे दाविदाचे स्तोत्र.
1हे देवा, मला वाचव; कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन भिडले आहे.
2मी खोल दलदलीत रुतलो आहे, तेथे उभे राहण्यास आधार नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, आणि लोंढा माझ्यावरून जात आहे.
3आरोळी मारता मारता मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे; आपल्या देवाची वाट पाहता पाहता माझे डोळे शिणले आहेत.
4विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहेत; अन्यायाने माझ्याशी वैर करणारे, माझा जीव घेऊ पाहणारे, बलिष्ठ आहेत; मी हरण केले नव्हते तेही मला द्यावे लागले.
5हे देवा, तू माझे मूर्खपण जाणतोस; आणि तुझ्यापुढे माझी पातके लपलेली नाहीत.
6हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतीक्षा करतात त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये; हे इस्राएलाच्या देवा, जे तुझा शोध करतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये.
7कारण तुझ्यासाठी मी निंदा सोसली आहे; लज्जेने माझे मुख व्याप्त झाले आहे;
8मी आपल्या भावांना नवखा, माझ्या सहोदरांना परका असा झालो आहे.
9कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, निंदा करणार्‍यांनी केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे.
10मी उपास करून शोक केला, तेच माझ्या निंदेस कारण झाले.
11मी गोणपाटाचे कपडे चढवले, तेव्हा मी त्यांच्या उपहासाचा विषय झालो.
12वेशीत बसणारे माझ्याविषयी बोलत असतात, मी मद्यपी लोकांच्या गीतांचा विषय झालो.
13मी तर, हे परमेश्वरा, तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करतो; हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपण सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे.
14चिखलातून मला काढ, मला रुतू देऊ नकोस; मला माझ्या द्वेष्ट्यांपासून मुक्त कर व खोल पाण्यातून मला काढ.
15पाण्याचा लोंढा माझ्यावरून जाऊ देऊ नकोस; दलदलीत मला खचू देऊ नकोस; गर्तेच्या जाभाडात मला गुंतून पडू देऊ नकोस.
16हे परमेश्वरा, माझे ऐक, कारण तुझे वात्सल्य उत्तम आहे; आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझ्याकडे वळ.
17आपल्या दासापासून तू आपले मुख लपवू नकोस; कारण मी संकटात आहे; माझे सत्वर ऐक;
18माझ्या जिवाजवळ येऊन त्याचा उद्धार कर; माझे वैरी पाहून माझा उद्धार कर.
19माझी निंदा, माझी फजिती आणि माझी अप्रतिष्ठा तू जाणतोस; माझे सर्व शत्रू तुझ्यापुढे आहेत.
20निंदा होत असल्यामुळे माझे हृदय भग्न झाले आहे; मी अगदी बेजार झालो आहे; माझी कीव करणारा कोणी आहे की काय हे मी पाहिले, पण कोणी आढळला नाही; माझे कोणी समाधान करील म्हणून मी वाट पाहिली, पण कोणी आला नाही.
21त्यांनी मला अन्न म्हणून विष खायला दिले, तहान भागवण्यास मला आंब दिली.
22त्यांच्यापुढे मांडलेले ताट त्यांना पाश असे होवो, ते निश्‍चिंत असता त्यांना ते जाळे असे होवो.
23त्यांना दिसेनासे व्हावे म्हणून त्यांच्या डोळ्यांवर अंधारी येवो; तू त्यांची कंबर सदा खचव.
24तू त्यांच्यावर आपल्या क्रोधाचा मारा कर, तुझा कोपाग्नी त्यांना गाठो.
25त्यांची वस्ती ओसाड पडो, त्यांच्या डेर्‍यात कोणी न राहो.
26कारण ज्याला तू शिक्षा केलीस त्याच्या पाठीस ते लागतात; तू ज्यांना घायाळ केले आहेस त्यांच्या दु:खात ते भर घालतात.
27त्यांच्या अन्यायात भर टाक; तुझ्या न्यायपरायणतेचा लाभ त्यांना न होवो.
28जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत, नीतिमानांबरोबर त्यांची नावनिशी न होवो.
29मी तर दीन व दुःखी आहे; हे देवा, तू सिद्ध केलेले तारण मला उच्च स्थानी नेऊन ठेवील.
30गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन. त्याचे उपकारस्मरण करून त्याचा महिमा वर्णीन.
31ते बैलांपेक्षा, शिंगे असलेल्या व दुभागलेल्या खुरांच्या गोर्‍ह्यापेक्षा परमेश्वराला आवडेल.
32दीन हे पाहून हर्ष करतील. देवाचा शोध करणार्‍यांनो, तुमच्या हृदयात नवजीवन येवो.
33कारण परमेश्वर दरिद्र्यांचे ऐकतो; बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना तो तुच्छ मानत नाही.
34आकाश, पृथ्वी, समुद्र, व त्यांत संचार करणारे सर्व प्राणी त्याचे स्तवन करोत.
35कारण देव सीयोनेचे तारण करील, तो यहूदाची नगरे बांधील; लोक तेथे राहतील व ते त्यांच्या ताब्यात येईल.
36ते त्यांच्या दासांच्या संततीचेही वतन होईल; ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते त्यात वस्ती करतील.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in