स्तोत्रसंहिता 51
51
शुद्धतेसाठी प्रार्थना
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र; त्याने बथशेबेशी समागम केल्यानंतर नाथान संदेष्टा त्याच्याकडे आला तेव्हाचे.
1हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक.
2मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर.
3कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे.
4तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे; म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील, व निवाडा करशील तेव्हा नि:स्पृह ठरशील.
5पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे.
6पाहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते; तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे.
7एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन; मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन.
8आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे; म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्लासतील.
9माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव; माझे सर्व अपराध काढून टाक.
10हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.
11तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नकोस; आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस.
12तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे; आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर;
13म्हणजे मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन; आणि पातकी तुझ्याकडे वळतील.
14हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करील.
15हे प्रभू, माझे ओठ उघड; म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील.
16तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता; होमबलीही तुला प्रिय नाही.
17देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा; हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.
18तू प्रसन्न होऊन सीयोनेचे हित कर, यरुशलेमेचे कोट बांधून काढ;
19म्हणजे नीतिमत्त्वपूर्वक केलेले यज्ञ, होमबली, निःशेष होमबली तुला आवडतील; मग ते तुझ्या वेदीवर गोर्हे अर्पण करतील.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 51: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.