YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 45

45
राजाच्या लग्नासंबंधी गीत
मुख्य गवयासाठी; शोशन्नीम (भूकमले) ह्या चालीवर गायचे कोरहाच्या मुलांचे मस्कील (बोधपर स्तोत्र); प्रेमगीत.
1माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे; राजाविषयी जे काव्य मी रचले ते मी म्हणून दाखवतो; माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे.
2मानवजातीत तू अति सुंदर आहेस; तुझ्या मुखात प्रसाद भरला आहे; ह्यामुळे देवाने तुला सर्वकाळ धन्यवादित केले आहे.
3हे वीरा, तू आपली तलवार कंबरेला बांध, आपले वैभव व आपला प्रताप धारण कर.
4सत्य, नम्रता व न्यायपरायणता ह्यांच्याप्रीत्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयशाली हो, म्हणजे तुझा उजवा हात तुला भयानक कृत्ये करण्यास शिकवील.
5तुझे बाण तीक्ष्ण आहेत; लोक तुझ्यापुढे चीत होतात; तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात शिरतात.
6तुझे राजासन देवाच्या राजासनासारखे युगानुयुगाचे आहे;1 तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे.
7तुला नीतिमत्त्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केला आहे.
8तुझ्या सर्व वस्त्रांना बोळ, ऊद व दालचिनी ह्यांचा सुगंध येत आहे; हस्तिदंती राजमंदिरातील तंतुवाद्ये तुला आनंदित करतात.
9तुझ्या सन्मान्य स्त्रियांमध्ये राजकन्या आहेत; ओफीरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे.
10अगे कन्ये, ऐक, लक्ष दे, कान लाव; तू आपले लोक व आपल्या बापाचे घर ही विसर,
11म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल; तो तुझा पती आहे, म्हणून त्याच्या चरणी लाग.
12सोराची कन्या तुला नजराणा आणील; धनवान लोक तुझे आर्जव करतील.
13राजकन्या आपल्या अंतःपुरात अगदी ऐश्वर्यमंडित आहे; तिची वस्त्रे भरजरी आहेत.
14तिला कशिद्याची वस्त्रे नेसवून राजाकडे मिरवत नेतील, तिच्यामागून चालणार्‍या कुमारींना तिच्या सख्या तुझ्याकडे आणतील.
15आनंदाने व उत्साहाने त्यांना मिरवतील, त्या राजमंदिरात प्रवेश करतील.
16तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले येतील; तू सर्व पृथ्वीवर त्यांना अधिपती करशील.
17तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील असे मी करीन, म्हणजे लोक युगानुयुग तुझे उपकारस्मरण करतील.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for स्तोत्रसंहिता 45