स्तोत्रसंहिता 42
42
भाग दुसरा
देवप्राप्तीचा ध्यास
मुख्य गवयासाठी; कोरहाच्या मुलांचे मस्कील (बोधपर स्तोत्र).
1हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलपते तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे.
2माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे; मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन?
3“तुझा देव कोठे आहे?” असे ते मला सतत म्हणतात, म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत.
4लोकसमुदाय सण पाळीत असे तेव्हा त्यांच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले; आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे त्यांना मी कसा मिरवत नेई, हे आठवून माझ्या जिवाचे पाणी पाणी होते.
5हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन.
6हे माझ्या देवा, माझा जीव आतल्या आत खिन्न झाला आहे, म्हणून यार्देनेच्या व हर्मोनाच्या प्रदेशात व मिस्हाराच्या डोंगराजवळ मी तुझे स्मरण करतो.
7तुझ्या धबधब्यांच्या आवाजाने जणू काय लोंढा लोंढ्याला बोलावत आहे; तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले आहेत.
8तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रकट करील; मी रात्री त्याचे गीत, माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहीन.
9देव जो माझा खडक त्याला मी म्हणेन, “तू मला का विसरलास? वैर्याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेषाने मी का फिरावे?”
10“तुझा देव कोठे आहे?” असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करतात; ह्यामुळे माझ्या हाडांचा चुराडा होतो.
11हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 42: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.