स्तोत्रसंहिता 33
33
उत्पन्नकर्त्याची व संरक्षकाची महती
1अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जयजयकार करा; सरळ माणसांना स्तुतिगान शोभते.
2वीणेवर परमेश्वराचे उपकारस्मरण करा; दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा.
3त्याच्यापुढे नवे गीत गा; जयघोष करीत कुशलतेने वाद्ये वाजवा;
4कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे; त्याची सर्व कृती सत्याची आहे.
5त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत; परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.
6परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले; त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले.
7तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करतो; महासागराचे निधी साठवतो.
8अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो; जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत.
9कारण तो बोलला आणि अवघे झाले; त्याने आज्ञा केली आणि सर्वकाही स्थिर झाले.
10राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो; लोकांचे संकल्प निष्फळ करतो.
11परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते; त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात.
12ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य!
13परमेश्वर आकाशातून पाहतो; सर्व मानवजातीला तो निरखतो.
14तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणार्या सर्वांना न्याहाळून पाहतो.
15त्या सर्वांची हृदये घडणारा व त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे.
16कोणीही राजा मोठ्या सैन्यबलाने जय पावतो असे नाही; वीरपुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही.
17जयप्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय; त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करता येणार नाही.
18पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात,
19त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते.
20आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करीत आहे; आमचे साहाय्य व ढाल तोच आहे.
21त्याच्या ठायी आमच्या हृदयाला आनंद आहे, कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे.
22हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे. म्हणून आमच्यावर तुझी कृपादृष्टी असो.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 33: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.