YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 19

19
देवाची कृत्ये आणि त्याचे नियम
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र.
1आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते
2दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.
3वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही.
4तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमतो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे.
5शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो; तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो.
6आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसर्‍या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो; त्याच्या उष्णतेपासून काहीएक सुटत नाही.
7परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते; परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो.
8परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात; परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते.
9परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे; परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य आहेत.
10ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहेत, ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणार्‍या मधापेक्षा गोड आहेत.
11शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो; ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते.
12स्वत:च्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषांपासून मला मुक्त कर.
13तसेच धिटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर; त्यांची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन. आणि महापातकापासून अलिप्त राहीन.
14हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असे असोत.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in