YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 18:1-24

स्तोत्रसंहिता 18:1-24 MARVBSI

हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करतो; तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरूज आहे. स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो. मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले, नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले. अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्यूचे पाश माझ्यावर आले. मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली; त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली. तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली, पर्वताचे पाये डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता. त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता, त्याच्या मुखातून ग्रासणारा अग्नी निघत होता, त्यामुळे निखारे धगधगत होते. आकाश लववून तो खाली उतरला; त्याच्या पायांखाली निबिड अंधकार होता. तो करूबारूढ होऊन उडाला, त्याने वायूच्या पंखांनी वेगाने उड्डाण केले. त्याने आपणाला काळोखाने आच्छादून घेतले, त्याने आपणाला आकाशातील मेघमय अंधाराचा, दाट ढगांचा मंडप केला. त्याच्यापुढील तेजाने घनमेघांमधून गारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले. परमेश्वराने आकाशात गर्जना केली, परात्पराची वाणी झाली, गारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले. त्याने आपले बाण सोडून त्यांची दाणादाण केली; त्याने विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली. तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या धमकीने, तुझ्या नाकपुड्यांतील श्वासाच्या सोसाट्याने जलाशयाचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाये उघडे पडले. त्याने वरून हात लांब करून मला धरले, आणि मोठ्या जलाशयातून मला बाहेर काढले. माझा बलाढ्य वैरी व माझे द्वेष्टे ह्यांच्या हातून मला त्याने सोडवले, कारण ते माझ्यापेक्षा अति बलिष्ठ होते. माझ्या विपत्काली ते माझ्यावर चालून आले तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला. त्याने मला प्रशस्त स्थली बाहेर आणले; तो माझ्याविषयी संतुष्ट होता म्हणून त्याने मला सोडवले. परमेश्वराने माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे मला फळ दिले; माझ्या हातांच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिले. कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो, मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही. त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत, मी त्याच्या विधींचा त्याग केला नाही. मी त्याच्या दृष्टीने सात्त्विकतेने वागत असे आणि मी अनीतीपासून स्वतःला अलिप्त राखले. म्हणून परमेश्वराने माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे, त्याच्या नजरेस आलेल्या माझ्या हातांच्या निर्मलतेप्रमाणे, मला प्रतिफळ दिले.