YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 144

144
सुटका आणि समृद्धीसाठी प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र.
1परमेश्वर जो माझा दुर्ग त्याचा धन्यवाद होवो; तो माझ्या हातांना लढायला शिकवतो; माझ्या बोटांना युद्ध करायला शिकवतो.
2तो माझा दयानिधी, माझा दुर्ग, माझा गड, माझा मुक्तिदाता, माझी ढाल आहे; मी त्याचा आश्रय धरतो; तो माझ्या प्रजाजनांना माझे अंकित करतो.
3हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावीस? मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याच्याकडे लक्ष पुरवावेस?
4मनुष्य श्वासवत आहे; त्याचे आयुष्य नश्वर छायेसारखे आहे.
5हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर; पर्वतांना स्पर्श कर म्हणजे ते धुमसतील.
6वीज पाडून त्यांची दाणादाण कर; तू आपले बाण सोडून त्यांची धांदल उडव.
7वरून आपले हात लांब कर; व महापुरांतून, परक्यांच्या हातातून, मला सोडवून मुक्त कर.
8त्यांचे मुख असत्य बोलते; त्यांचा उजवा हात असत्याचा हात आहे.
9हे देवा, मी तुला नवे गीत गाईन; दशतंतू वीणेवर मी तुझे स्तोत्र गाईन;
10तूच राजांना तारण देणारा आहेस; तूच आपला सेवक दावीद ह्याला दुष्टांच्या तलवारीपासून मुक्त करणारा आहेस.
11मला परक्यांच्या हातातून सोडवून मुक्त कर; त्यांचे मुख असत्य बोलते; त्यांचा उजवा हात असत्याचा हात आहे.
12आमचे पुत्र आपल्या तारुण्याच्या भरात उंच वाढलेल्या रोपांसारखे असावेत; आमच्या कन्या राजवाड्यांच्या कोपर्‍यात कोरलेल्या खांबांसारख्या असाव्यात;
13आमची भांडारे भरलेली असावीत; त्यांतून सर्व प्रकारच्या वस्तू मिळाव्यात; आमच्या कुरणांत आमची मेंढरे सहस्रपट, दशसहस्रपट वाढावीत;
14आमचे बैल लादलेले असावेत; दरोडे, धरपकड व आकांत हे आमच्या रस्त्यांत नसावेत;
15अशी ज्या लोकांची स्थिती असेल ते धन्य! ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते धन्य!

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for स्तोत्रसंहिता 144