स्तोत्रसंहिता 116
116
मृत्यूपासून सुटका झाल्याबद्दल उपकारस्तुती
1मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी विनवणी ऐकतो.
2त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे, म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करीन.
3मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टले, मला अधोलोकाच्या यातना झाल्या, मला उपद्रव व क्लेश झाले,
4तेव्हा मी परमेश्वराच्या नावाचा धावा करून म्हणालो, “हे परमेश्वरा, तुला मी विनवतो की माझा जीव मुक्त कर.”
5परमेश्वर कृपाळू व न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे.
6परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझा उद्धार केला.
7हे माझ्या जिवा, तू आपल्या विश्रामस्थानी परत ये, कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत.
8तू माझा जीव मरणापासून, माझे डोळे अश्रूंपासून, माझे पाय ठेचाळण्यापासून वाचवले आहेत.
9जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन.
10“मी फार पीडित आहे,” असे मी म्हणतो; तरी देवावर माझी श्रद्धा आहे.
11मी अधीरपणे म्हणालो की, “सर्व माणसे लबाड आहेत.”
12परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ?
13मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नावाचा धावा करीन.
14परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन.
15परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे.
16हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा दास आहे; मी तुझा दास, तुझ्या दासीचा पुत्र आहे; तू माझी बंधने सोडली आहेत.
17मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ करीन, परमेश्वराच्या नावाचा धावा करीन.
18परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन.
19परमेश्वराच्या घराच्या अंगणात, हे यरुशलेमा, तुझ्यामध्ये ते फेडीन. परमेशाचे स्तवन करा!1
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 116: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.