स्तोत्रसंहिता 116:1-11
स्तोत्रसंहिता 116:1-11 MARVBSI
मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी विनवणी ऐकतो. त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे, म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करीन. मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टले, मला अधोलोकाच्या यातना झाल्या, मला उपद्रव व क्लेश झाले, तेव्हा मी परमेश्वराच्या नावाचा धावा करून म्हणालो, “हे परमेश्वरा, तुला मी विनवतो की माझा जीव मुक्त कर.” परमेश्वर कृपाळू व न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे. परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझा उद्धार केला. हे माझ्या जिवा, तू आपल्या विश्रामस्थानी परत ये, कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत. तू माझा जीव मरणापासून, माझे डोळे अश्रूंपासून, माझे पाय ठेचाळण्यापासून वाचवले आहेत. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन. “मी फार पीडित आहे,” असे मी म्हणतो; तरी देवावर माझी श्रद्धा आहे. मी अधीरपणे म्हणालो की, “सर्व माणसे लबाड आहेत.”